स्वच्छतागृह असूनही अडचण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात : धायरी येथील चित्र

स्वच्छतागृह असूनही अडचण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात : धायरी येथील चित्र

धायरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी गावात सार्वजनिक शौचालयाची (स्वच्छतागृह) दुरवस्था झाली आहे. हे स्वच्छतागृह म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती आहे. विजयनगरसमोर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाशेजारी हे स्वच्छतागृह आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुरुषांसाठी व महिलांसाठी महापालिकेकडून हे शौचालय बांधण्यात आले आहे, परंतु त्याची सध्या बिकट अवस्था झाली आहे.महापालिका प्रशासनाने स्वच्छतागृहाची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
या स्वच्छतागृहातील दरवाजे तुटलेले आहेत. पाण्याची लाईन व नळकोंडाळे येथून गायब करण्यात आले आहे. आतील सर्व भांडी फुटलेली आहेत. बेसिन वायरिंग तुटून पडलेले आहे. या शौचालयात जाण्यासाठी एक बोळ आहे. या बोळीतूनच छोटासा रस्ता आहे. परंतु या शौचालयात जाण्याच्या रस्त्यावर मैलापाण्याचे डबके साचले आहे. या डबक्यात झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे या शौचालयात जाण्याचा रस्ताच बंद झाला आहे. या ठिकाणी असलेलेे शौचालय म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा परिसर मोठ्या लोकसंख्येचा आहे. तसेच बाजारपेठही आहे. रायकर मळा परिसरातून स्मशानभूमी, खडक चौक, धारेश्वर मंदिर, चव्हाण शाळा बाजूकडून नर्‍हे बाजूकडे जातो.
यामुळे या रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरात हे एकमेव सार्वजनिक शौचालय आहे. त्याचीही अशी दुरवस्था झाली असल्याने येथील नागरिक, कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची मोठी कुचंबणा होत आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे साथीच्या आजारात मोठी वाढ होऊन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
तीन वर्षांपासून शौचालय वापराविना पडून आहे. याची मोठी दुरवस्था झाली आहे. परिसरात मोठे मैला पाण्याचे तळेच साठले आहे. त्यामुळे नागरिकांना, महिलांना या शौचालयात जाताच येत नाही. यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. याकरिता या शौचालयाची दुरुस्ती त्वरित करून नागरिकांची अडचण दूर करावी. अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– बाप्पूसाहेब पोकळे, सामाजिक कार्यकर्ते
या परिसरात असलेल्या सोसायट्यांचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या सोसायट्यांची लवकरच पाहणी करून संबंंधितांना नोटिसा देण्यात येतील. हे पाणी थांबल्यानंतर या शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल.
– संदीप खलाटे, सहायक आयुक्त

हेही वाचा

बलुचींचा प्रकोप !
रांजण घाट रस्त्याची चाळण : पर्यटक, नागरिकांची गैरसोय
काळजी घ्या ! उष्माघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक; 15 दिवसांत 13 रुग्ण

Latest Marathi News स्वच्छतागृह असूनही अडचण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात : धायरी येथील चित्र Brought to You By : Bharat Live News Media.