सातार्‍याच्या बदल्यात राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा

सातार्‍याच्या बदल्यात राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा

मुंबई/नाशिक; Bharat Live News Media वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचे दिल्लीत निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा असली, तरी स्वतः अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनाच लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची तयारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचे समजते. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. या घडामोडींमुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. मात्र, उदयनराजे भोसले यांनी हा मतदारसंघ मागताना भाजपकडूनच निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत पेच निर्माण झाला होता. तिकिटासाठी उदयनराजे भोसले हे तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या झालेल्या चर्चेत उदयनराजेंसाठी ही जागा भाजपला सोडण्यावर एकमत झाले.
सातारा भाजपला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीने माढा आणि नाशिक मतदारसंघांवर दावा केला आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ऐनवेळी छगन भुजबळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, अशी चर्चा महायुतीच्या गोटात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माढा लोकसभेसाठी आग्रही असला, तरी हा मतदारसंघ भाजप सोडण्याची शक्यता कमी आहे.
आज पुण्यात बैठक
नाशिक मतदारसंघाबाबत आलेल्या या नव्या ट्विस्टमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिकच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि. 27) पुण्यात बैठक बोलावली आहे. पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, माझे नाव तुम्हीच चर्चेत आणले. भुजबळ कुटुंबाला उमेदवारी पाहिजे, अशी मागणी केलेली नाही. शिवसैनिकांनी अस्वस्थ होऊ नये, मीदेखील तुमच्यातून आलोय, असे सांगत, उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे संकेतही भुजबळांनी दिले आहेत.
सातार्‍याच्या बदल्यात जागा मिळावी : भुजबळ
छगन भुजबळ यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना, सातार्‍याची जागा भाजपने घेतली असल्यामुळे त्याबदल्यात राष्ट्रवादीला एक जागा मिळावी, ही चर्चा खरी असल्याचे सांगून, नाशिकच्या जागेवरील चर्चेला बळकटी दिली आहे. जागावाटपाबाबत प्रफुल्ल पटेल, अजित पवारांसोबत बैठक होत आहे. मात्र, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही.
Latest Marathi News सातार्‍याच्या बदल्यात राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा Brought to You By : Bharat Live News Media.