पुणे : थकीत फाईलसाठी धावाधाव; आयुक्तांच्या तंबीने बांधकाम विभागाची कार्यवाही
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या लेखापरीक्षण (ऑडिट) माध्यमातून निघालेल्या बांधकाम विभागातील 51 कोटींच्या थकीत रकमेच्या फाईल निकाली काढण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुटीच्या दिवशीही कर्मचारी त्यासाठी कामावर येत असून ऑडिटच्या त्रुटी आणि त्यावर खुलासा करण्याचे काम सुरू आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी गत आठवड्यात स्थायी समितीची बैठक घेतली. या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर ऑडिट विभागाने काढलेल्या प्रकरणातून 51 कोटींच्या थकीत रकमेचा प्रस्ताव ऑडिट उपसमितीच्या माध्यमातून स्थायी समितीसमोर आले होते. हे सर्व प्रस्ताव प्रामुख्याने बांधकाम विभागाशी निगडीत आहेत.
त्यावर आयुक्तांनी थेट खात्याचे अंतर्गत ऑडिट असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि त्या बदल्यात रक्कम कशी निघते अशी विचारणा केली होती. तसेच यावर खुलासा करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर ऑडिट विभागाने बांधकाम परवानगीसह विविध प्रकारच्या परवानगीच्या ज्या त्रुटी काढल्या आहेत आणि त्याबद्दल जी 51 कोटींची थकीत वसुली रक्कम दाखविली आहे, त्याचा निपटारा करण्यासाठी बांधकाम विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यासाठी शनिवार, रविवार आणि सोमवारी धूलिवंदन सुटीच्या दिवशीही काही अधिकारी आणि कर्मचारी पालिकेत कामावर होते. मंगळवारी बांधकाम विभागाचे अनेक अभियंते ऑडिट प्रकरणांचा निपटणारा करण्याच्या कामांत गुंतल्याचे चित्र दिसत होते. गेल्या काही वर्षांत पालिका आयुक्तांनी पहिल्यांदाच ऑडिट प्रकरणाच्या आक्षेपांवर लक्ष दिल्याने आता अन्य विभाग त्यांच्या निघालेल्या त्रुटींचे निराकरण करण्याच्या कामाला लागले आहेत.
पालिका चालविण्यासाठी उत्पन्न महत्त्वाचे आहे. स्थायी समितीच्या बैठकीत 51 कोटींची ऑडिटची रक्कम थकीत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे ते वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत.
– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे मनपा.
हेही वाचा
काँग्रेसकडून ‘वंचित’ला पाच जागांचा प्रस्ताव
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर अंतरवालासराटीत
पुणे : आळेफाटा येथील इमारतीमध्ये घुसला बिबट्या; दुचाकीस्वार जखमी
Latest Marathi News पुणे : थकीत फाईलसाठी धावाधाव; आयुक्तांच्या तंबीने बांधकाम विभागाची कार्यवाही Brought to You By : Bharat Live News Media.