पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठमधुन ३० मार्चला लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार
नवी दिल्ली; प्रशांत वाघाये : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्चपासुन लोकसभा प्रचाराला सुरुवात करणार आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठमधून ते भाजपच्या प्रचाराची सुरुवात करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मेरठमधील सभा ही भाजपची पहिली सभा असणार आहे. या सभेच्या माध्यमातून देशभरात प्रचाराचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपा करणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्या पाठोपाठ प्रचाराचा धडाका सुरू होत आहे. या लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ हे भाजपचे लक्ष्य आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचाराची सुरुवात उत्तर प्रदेशच्या मेरठमधून एका मोठ्या सभेद्वारे करणार आहेत. रामायणात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल मेरठमध्ये भाजपचे उमेदवार आहेत.
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेले राज्य आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत.देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असेही बोलले जाते. २०१४ मध्ये भाजपला उत्तर प्रदेशात ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या. मात्र २०१९ मध्ये हा आकडा घसरून ६२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी उत्तर प्रदेशसह अन्य भागातही जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे भाजपचे लक्ष्य असणार आहे. दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध इंडिया आघाडीद्वारे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहे तर मायावतींचा बहुजन समाज पक्ष स्वतंत्र लढणार आहे. भाजपने राम मंदिर निर्माणाचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण केल्यानंतर भाजपला उत्तर प्रदेशासह देशभरात मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवण्याची अपेक्षा आहे. यावेळी भाजपसोबत जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाची युती आहे. आशा आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील भाजपला त्यांचा फायदा होऊ शकतो.
Latest Marathi News पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठमधुन ३० मार्चला लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार Brought to You By : Bharat Live News Media.