प्रशासन चांदी उद्योजकांच्या पाठीशी राहणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे
हुपरी : अमजद नदाफ : आचारसंहिता काळात हुपरी परिसरातील चांदी उद्योजक मार्गदर्शन केलेल्या नियमानुसार व्यापार करीत असताना एखादा अधिकारी संशयावरून चांदी माल जप्त करत असेल तर कोल्हापूर जिल्हा प्रशासन चांदी उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. चांदी उद्योजकांच्या प्रतिनिधीसोबत बोलवलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यामुळे आचारसंहिता काळात चांदी उद्योग सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. तसेच ऐन हंगामात उद्योग चालू राहिल्यामुळे कारागिरावरील बेकारीचे संकट ही टळले आहे. या निर्णयाने चांदी उद्योजकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात सर्वप्रथम दैनिक Bharat Live News Mediaनें आवाज उठवला होता.
सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे. त्यानंतर जवळपास वर्षभर जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका व विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूकीदरम्यान आचारसंहिता काळात निवडणुका निष्पक्षपणे व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाकडून जागोजागी तपासणी नाके उभारले जातात. हुपरी परिसरातील चांदी उद्योजक देशभरातील सरांफानी दिलेल्या ऑर्डर प्रमाणे तयार केलेले दागिने पोहोच करतात. त्यावेळी तपासणी नाक्यावरील अधिकारी आवश्यक कागदपत्रे असूनसुद्धा दागिने मतदारांना वाटप करायला घेऊन जात आहेत. या संशयावरून जप्त करतात. जप्त केलेले दागिने परत मिळवण्यासाठी चांदी उद्योजकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे निवडणूक काळात चांदी उद्योजक व्यापार, उद्योग बंद करून घरी बसणे पसंत करतात.
याबाबत हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशनने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जीएसटी विभाग प्रमुखांची भेट घेऊन आचारसंहिता काळात नेमकी कोणती कागदपत्रे सोबत असतील तर चांदी माल जप्त केला जाणार नाही. याबाबत लेखी मार्गदर्शन करण्याची मागणी केली होती. या विषयावर चांदी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यासोबत विस्तृत चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी चांदी माल वाहतूक दरम्यान आवश्यक कागदपत्राचे लेखी पत्र दिले आहे. त्याचबरोबर कागदपत्रे असूनसुद्धा देशात कोठेही माल जप्त करीत असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण केंद्रात फोन केल्यास कोल्हापूर प्रशासन चांदी उद्योजकांना योग्य ते सहकार्य करेल. याची ग्वाही दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेडगे यांच्यासह फाऊंडेशन संचालक मोहन खोत, अॅड. जितेंद्र देशमुख, कृष्णात बोरचाटे (सीए ), चेतन देशपांडे (सीएस ) विलासराव जाधव, अजित पाटील, शामराव शिंदे, निरंजन रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
GST उपायुक्त चांदी उद्योजकांना मार्गदर्शन करणार
आचारसंहिता काळात चांदी उद्योजकांना व्यापाराला जाताना येणाऱ्या अडचणी समजून घेणे व व्यापार करताना घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी वस्तू सेवा कर विभागाचे सहआयुक्त प्रसाद गोरसे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हुपरी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
Latest Marathi News प्रशासन चांदी उद्योजकांच्या पाठीशी राहणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे Brought to You By : Bharat Live News Media.