तडका : आता तुम्हीच राहिला होता
लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतशा अजब बातम्या समोर येत आहेत. महायुती, महाआघाडी, पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी, जागांची खेचाखेच, उमेदवारांचा सुरू झालेला प्रचार, खदखद, मळमळ, खुन्नस या सर्वांमध्ये एक आगळीवेगळी बातमी नाशिकमधून आली आहे. 10 आखाड्यांचे महंत एकत्र येत त्यांनी आपल्यापैकी एकाला लोकसभेसाठी उभे केले आहे. राजकीय नेत्यांच्या गदारोळात जनतेला धर्मसत्तेचा मोह होईल, हा साधू मंडळींचा अंदाज असावा. दहा आखाड्यांतील महंतांनी एकत्र येत आपल्यापैकी सिद्धेश्वर आनंदस्वामी यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. सदरील उमेदवार लवकरच प्रचाराला लागणार असून, त्यांच्या प्रचारासाठी या 10 आखाड्यांतील महंत प्रत्यक्ष जनतेमध्ये जाणार आहेत.
आधीच सत्ताधारी पक्ष हा ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी घोटाळा करून विजय मिळवतो, असा आरोप विरोधक करत आहेत. या आखाड्यातील महंतांच्या पाठीशी कुटुंब नावाचे लचांड नाही. सबब, कुठलाही व्यक्तिगत मोह नसणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचे मतदान नाशिक मतदारसंघात असले पाहिजे. हजारो कोटी रुपयांचा फंड आला तरी त्यामध्ये काही चोरी मारी साधू महाराज करणार नाहीत, याची खात्री आहे; कारण त्यांच्या गरजा कमी आहेत. अंगावर घालायला भगवी कफनी, हातामध्ये कमंडलू, राहण्यासाठी एखादा आश्रम किंवा झोपडी पण चालेल, असा उमेदवार भ्रष्टाचार करील तरी कशासाठी आणि करील तरी कोणासाठी, असा प्रश्न तुमच्या पुढे पडला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
सदरील महंत महोदय तुमच्या घरी प्रचाराला आले तर ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या न्यायाने तुम्ही त्यांचे स्वागतच करणार आहात. एरवी पण भारतीय लोक धर्मसत्तेचे अधिष्ठान असेल तिथे पैसे टाकत असतात. कुठलाही मोह नसणारे असे उमेदवार जागोजागी उभे राहिले तर राजकीय लोकांच्या कर्तृत्वाला (?) कंटाळलेली भारतीय जनता साधुसंतांना मतदान करेल, अशी शक्यता वाटते.
पुरातन ग्रंथांचे ज्ञान असल्यामुळे ही मंडळी पुढे सत्तासुद्धा चांगली राबवतील, हा मोहही भारतीय लोकांना होऊ शकतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा गोरखपूरमधील एक महंत आहेत. ते सलग पाच टर्म खासदार आणि नंतर सलग दोन टर्म मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अंगावरची भगवी कफनी एवढाच त्यांचा पोषाख आहे. सर्वसंगपरित्याग केलेले हे महंत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात जनतेच्या मनात घर करून आहेत. कठोर होऊन त्यांनी उत्तर प्रदेशातील गुंडगिरी मोडून काढली आहे. पाठीशी कोणता व्याप, कुटुंब आणि नातेवाईक नसल्यामुळे असे लोक निर्भय असतात आणि निर्भय असलेले लोक दुराचार करणार्यांवर कारवाई करण्यासाठी सक्षम असतात, हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आहे, असेच म्हणावे लागेल. मराठवाड्यात असेच एक महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. यापूर्वी त्यांनी एक लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यामुळे ते पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत.
Latest Marathi News तडका : आता तुम्हीच राहिला होता Brought to You By : Bharat Live News Media.