फडणवीस हेच सगळ्यांवरील औषध, त्यांनी प्रेमानं जवळ घेवून समजावलं की विषयच संपला : चंद्रकांत पाटील
बारामती: Bharat Live News Media वृत्तसेवा : आमच्याकडे महाराष्ट्राला समजावणारे देवेंद्र फडणवीस नावाचे मोठे औषध आहे. ते प्रेमाने जवळ घेवून बसले की सगळे विषय संपतात. त्यांची मात्रा सगळ्यांना लागू पडते. त्यामुळे सगळे ‘नाॅर्मल’ला येतील. पुढची ‘गॅरंटी’ प्रत्येकाला हवी आहे. ती दिली की पुढच्या आठवड्यात तुम्हाला सगळे एकत्र दिसतील, असे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
बारामतीत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी रात्री फोन करत पुतण्याचा विवाह असल्याने आजच्या बैठकीला येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय गैरसमज नको म्हणून माझ्या वतीने बैठकीत माहिती द्या, असेही मला सांगितले असल्याचे पाटील म्हणाले.
विजय शिवतारे यांनी बंडाचे निशाण फडकावल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री त्यांची योग्य ती समजूत काढतील. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही.
मावळची जागा कोणी लढवायची हे अद्याप ठरलेले नाही. ती जागा शिवसेनेकडे गेली तरी बाळा भेगडे असो की अन्य आमचे पदाधिकारी त्यांचे काम करतील. राजकारणात इच्छा व्यक्त कऱण्यात गैर काही नाही. सध्या तेथे काही लोक इच्छा व्यक्त करत असतील. पण ज्या दिवशी उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी भेगडे हे सुद्धा बारणे यांचा जयजयकार करतील, असे पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला, आता त्यांच्याबरोबर कसे जुळवून घेणार असा प्रश्न तुम्ही विचारत आहात. पण राजकारणात कायम तराजू सोबत ठेवायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलके आहे हे बघायचे असते. आता आम्हाला शरद पवार यांचा पराभव महत्त्वाचा वाटतो
२०१९ ला जनतेने भाजप-शिवसेनेला १६१ चा आकडा गाठून दिला असतानाही फूट पाडली गेली. केंद्रातील दोन वजनदार नेत्यांनाही आम्ही तुमच्यासोबत सरकार स्थापन करतो आहे, असे सांगत झुलवत ठेवले गेले. हे सगळे हिशोब चुकते करण्याची संधी आता आम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे. ती यंदा जरूर पूर्णत्वाला जाईल. शरद पवार यांचा पराभव हेच आमचे ध्येय आहे, असेही मत पाटील यांनी सांगितले. समोरील पैलवानाने काही दिवसानंतर न लढताच हरलो असे घोषित केले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असेही पाटील म्हणाले.
आता घर फोडल्याचे आरोप होतात, मग २०१९ ला शिवसेनेला सोबत घेणे ही फूट नव्हती का. त्यातून भाजपचे नव्हे तर राज्यातील जनतेचेचे नुकसान शरद पवार यांनी केले.
जग ज्यांना मानते अशा केंद्रातील दोन नेत्यांनाही त्यांनी झुलवत ठेवले. आम्ही तुमच्यासोबत सरकार स्थापन करत असल्याचे सांगितले. पण ते केले नाही. आता यानिमित्ताने शरद पवार यांचा हिशोब चुकता करू. अजित पवार घमेंडीने वागतात आणि अन्य गोष्टींना आता काही अर्थ नाही. शरद पवार यांचा पराभव हेच आमचे अंतिम ध्येय आहे.
ना. पाटील पुढे म्हणाले, गत निवडणूकीत राष्ट्रवादी सोबत नसताना आम्हाला ५ लाख ३१ हजार मते मिळाली. त्यावेळी हर्षवर्धन पाटील तिकडे होते. आता ते सोबत आहेत. सध्या एकसंघ शिवसेना सोबत नसली तरी बहुतांश शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. आमची मागील मते तर कमी होण्याचे काही कारण नाही. विरोधी उमेदवाराला ६.५० लाख मते मिळाली होती. त्यातील निम्मी मते घेवून अजित पवार बाहेर पडले आहेत. अजित पवार यांची हक्काची दोन लाख मते धरली तरी आम्ही आठ लाखांच्या आसपास जावू. विरोधी उमेदवार ४.५० लाखांपर्यंत जाईल. मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे, महायुतीने केलेली कामे आमची जमेची बाजू आहे. त्यामुळे आम्ही बारामतीत प्रचंड मताधिक्याने विजयी होवू.
बारामतीचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्यातच जमा आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. ती लवकरच पूर्ण होईल असे सांगून ना. पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमामुळे आता मोठा वेळ हाती आहे. बऱयाच ठिकाणी उमेदवार घोषित केले आहेत. जेथे झाले नाहीत तेथेही हाती वेळ असल्याने अडचण नाही.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुती सोबत आहेत. पंकजा मुंडे व त्यांचे बहिण-भावाचे नाते आहे. देवेंद्र यांचे ते परममित्र आहेत. मैत्री पक्की असल्यावरच माणूस हक्काने भांडतो. त्यांना देवेंद्र सीट देतील किंवा पुढील शब्द देवून समाधान करतील.
छोट्या पक्षांना भाजप संपवत आहे हा संजय राऊत यांचा आरोप मान्य नाही. छोट्या पक्षांचे लोक मांडीला मांडी लावून बसतात, कामे करून घेतात मग पक्ष संपवतात हे खरे कसे, असा सवाल त्यांनी केला. शिवाय राज्यामध्ये मिडियाने काही लोकांना अनावश्यक मोठे केले आहे, त्यात राऊत येतात, असा टोला त्यांनी लगावला.
Latest Marathi News फडणवीस हेच सगळ्यांवरील औषध, त्यांनी प्रेमानं जवळ घेवून समजावलं की विषयच संपला : चंद्रकांत पाटील Brought to You By : Bharat Live News Media.