यवतमाळ : बंदुकीच्या धाकावर सराफा व्यापाऱ्यास लुटले; सदोबा सावळी येथील घटना
यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : आर्णी तालुक्यातील सदोबा सावळी येथील दुकान बंद करून दोन सराफा व्यावसायिक सोमवारी कारने आर्णीकडे येत होते. त्यांना रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवत तिघांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून घेतली. याप्रकरणी सराफा व्यावसायिकाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विशाल देवीदास लोळगे (रा. आर्णी) यांचे सदोबा सावळी येथे सोन्याचे दुकान आहे. यासोबतच रणजित काटे यांचेही सदोबा सावळीत दुकान आहे. हे दोन्ही व्यापारी सोमवारी सायंकाळी आर्णीकडे परत येत असताना त्यांच्या कारला पांढऱ्या रंगाच्या कारने ओव्हरटेक करून रस्त्यात अडविले. आर्णी शहरापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर असताना हा प्रकार घडला. कारमधून चार तरुण उतरले. त्यांचा चेहरा पूर्ण झाकलेला होता. सराफाच्या कारचा काच फोडून सराफाच्या डोळ्यावर मिरची पूड फेकली व नंतर बंदुकीचा धाक दाखविला. तसेच चाकूनेही वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत विशाल लोळगे यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेली बॅग चौघांनी हिसकावून घेतली व लगेच ते कारने पसार झाले. मागील शीटवर बसून असलेले रणजित काटे यांच्याकडे आरोपींचे लक्ष गेले नाही, त्यामुळे त्यांचा मुद्देमाल वाचला.
या घटनेनंतर आर्णी शहरातील सराफा थेट पोलिस ठाण्यावर धडकले. त्यांनी या वारंवार होणाऱ्या घटनांबाबत रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी रजनीकांत चिलुमुला, एलसीबीचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी तत्काळ आर्णीतील घटनास्थळाला भेट दिली. आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांनी सराफा व्यापाऱ्याला सोबत घेऊन आरोपींचा शोध घेतला.
Latest Marathi News यवतमाळ : बंदुकीच्या धाकावर सराफा व्यापाऱ्यास लुटले; सदोबा सावळी येथील घटना Brought to You By : Bharat Live News Media.