रातुम विद्यापीठात वातावरण तापले; नमो महासंमेलनादरम्यान पोलिसांकडून सौम्य लाठीमार, अनेकांना अटक

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसराजवळील विद्यापीठाच्या मैदानावर सोमवारी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नमो युवा महासंमेलन आयोजित करण्यात आले. शैक्षणिक परिसराचा राजकीय वापर नको यावरून काही विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. यात युवक काँग्रेस, शिवसेना-ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंच्या कक्षासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कुलगुरूंना भेटण्याचा हट्ट केला असता तो नाकारण्यात आल्याने वातावरण तापले. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही आंदोलक जखमींही झाले तर अनेकांना अटक करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अबकी बार,मोदी सरकार 400 पार… हा आपला संदेश तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटनांच्या सभा, मेळाव्यांना मैदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी काही अटी व शर्ती घालून देण्यात आल्या. विद्यापीठ यासाठी शुल्कही आकारणार आहे.
मात्र,विरोधकांनी शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यास विरोध केला. राष्ट्रवादीच्या विदर्भ विद्यार्थी प्रमुख माधुरी पालीवाल, एनएसयुआयचे पांडे, राहुल हनवते असे अनेकजण या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी प्रथम आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते समजून घेण्याच्या मन:स्थितीन नसल्याने अखेर बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले.
Latest Marathi News रातुम विद्यापीठात वातावरण तापले; नमो महासंमेलनादरम्यान पोलिसांकडून सौम्य लाठीमार, अनेकांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.
