अजित पवारांसमोर आव्हानांची मालिका; अनेक राजकीय तिढे सोडवायला लागणार

अजित पवारांसमोर आव्हानांची मालिका; अनेक राजकीय तिढे सोडवायला लागणार

सुहास जगताप

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळविले, पक्षाचे ते आता सर्वोच्च नेते झालेले आहेत; तरीही त्यांचा स्वजिल्हा असलेल्या पुणे जिल्ह्यातच त्यांच्यासमोर राजकीय आव्हानांची मोठी मालिका उभी राहिली आहे.  लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अनेक  विधानसभा मतदारसंघांतील राजकीय तिढे अजित पवार यांची डोकेदुखी ठरणार आहेत,  याची चुणूक आता दिसू लागली आहे. अजित  पवार यांनी पक्षाचे एकमुखी नेतृत्व स्वीकारले असले तरी खुद्द बारामती  लोकसभा मतदारसंघातील  राजकीय तिढे ते कसे सोडविणार, हे त्यांच्यासमोरचे मोठे  आव्हान आहे.

पवार घराणे अखंड असताना अनेकांना  कात्रजचा घाट दाखविण्याचे प्रयोग झाले आहेत. आता अडचणीत ते सर्व प्रयोग  उलटण्याची वेळ आली आहे. त्या वेळी ज्यांच्याशी खेळ केले, त्यांचीच मदत घरातील  युद्धात अजित पवार यांना घ्यावी लागणार आहे. लोकसभेला  मदत केल्यानंतर विधानसभेला पवारांची मदत होत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे, तसेच आता तीन पक्ष एकत्र असल्याने विधानसभेच्या आपल्या उमेदवारीचे काय होणार? याची चिंता अजित पवार यांच्या खंद्या समर्थकांसह मित्रपक्षांतील  नेत्यांना लागली असल्याने ते अतिशय आक्रमक झाले आहेत. आपल्या आणि मित्रपक्षांतील विधानसभा उत्सुकांना कसली आश्वासने देऊन अजित पवार लोकसभेच्या कामाला लावणार, यात त्यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी लागणार आहे.

बारामती  लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार, हे   निश्चित झालेले आहे. अशावेळी या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील  राजकीय तिढे वाढू लागले आहेत. अजित पवारांसमोर ही फार मोठी  डोकेदुखी ठरू शकते. याची सुरुवात  नेहमीप्रमाणे इंदापूर विधानसभा मतदारसंघापासूनच झाली आहे. चारवेळा लोकसभा निवडणुकीनंतर  विधानसभा निवडणुकीला झालेल्या  फसवणुकीमुळे तेथील भाजप नेते तसेच माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या वेळी लोकसभेला मदत  पाहिजे असल्यास विधानसभेत पाठिंबा, मदतीची ‘गॅरंटी’ द्या, असा रोखठोक सवालच  त्यांनी अजित पवार यांच्यासमोर ठेवला  आहे.  पुरंदर-हवेलीमध्ये गेल्या वेळचा इतिहास बघता तेथील शिवसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांनाही विधानसभेसाठी अजित पवारांच्या मदतीचा शब्द हवा आहे, तसे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविले आहे.

दौंडमध्ये अजित पवार यांचे खंदे समर्थक माजी आमदार रमेश थोरात यांनी जाहीरपणे काही बोलून दाखविले नसले तरी ते देखील विधानसभेला इच्छुक आहेत. त्यांनाही अजित पवार यांना काही ठाम सांगावे लागेलच. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनाही लोकसभेला मदत केल्यानंतर विधानसभेला पवारांचा आशीर्वाद असलेल्या बंडखोरांशी सामना करावा लागला आहे. त्यांनाही अजित पवार यांना खात्री द्यावी लागेल. खुद्द बारामतीमध्येही एरवी अजित पवार यांच्या डोळ्याला डोळा न भिडवणारे ऐनवेळी आपल्या अटी, शर्ती घेऊन उभे राहण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातही अशीच स्थिती आहे. जुन्नरमध्ये अजित पवार यांचे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढविण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे या दोघांनाही लोकसभेला आपल्या उमेदवाराचा प्रचार करायला लावण्यासाठी काय आश्वासने द्यायची, हा मोठा प्रश्न अजित पवार यांना सोडवावा लागणार आहे.

खेड-आळंदीतील भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी तेथील अजित पवार यांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे अजिबात पटत नाही. तेथे आत्ताच मोठे फ्लेक्सवॉर सुरू झाले आहे. या सर्वांना एकत्र करून कामाला लावण्यासाठी अजित पवार यांना कसरत करावी लागेल.
शिरूर मतदारसंघात आणखी एक डोकेदुखी अजित पवारांच्या पाठीशी लागली आहे. तेथे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन लोकसभेची उमेदवारी देण्याचा विचार सध्या सुरू आहे. परंतु, याला अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अतिशय उत्सुक असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी जोरदार विरोध केला आहे.

आढळरावांना उमेदवारी देण्यापेक्षा जागाच भाजपला सोडा आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणीच त्यांनी करून टाकली आहे. त्यामुळे भोसरीचे विलास लांडे आणि महेश लांडगे यांना कसे शांत करायचे? याबद्दलही अजित पवारांना विचार करावा लागेल. या दोघांचाही संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघावर प्रभाव आहे, त्यामुळे ही पवारांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरू शकते. महायुतीतील भाजप-शिवसेना या पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, अजित पवार वरचढ होऊ नयेत, यासाठी त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून मिळणारे छुपे पाठबळ, त्यातच स्वपक्षातील नेत्यांची आगामी राजकीय भविष्याची चिंता, या गुंत्यातून अनेक कठीण समस्या अजित पवार यांच्यासमोर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहू
लागल्या आहेत.
तीन तिगाडी, काम बिघाडी
महायुतीत  तीन पक्ष एकत्र असल्याने तालुकापातळीवर विधानसभा इच्छुकांमध्ये जसा  संघर्ष आहे, त्यापेक्षाही जास्त संघर्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती,  नगरपालिकापातळीवर आहे. या महायुतीत आगामी निवडणुकीत आपल्याला उमेदवारी  मिळेल का? जागा सुटेल का? आता कोणाला मदत केली तर फायदा होईल? अशी गणिते या  पातळीवरील नेतेही मांडू लागले आहेत.

हेही वाचा

पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्‍या क्रमांकावर
तापमानवाढ रोखण्यासाठी बर्फवृष्टीचा प्रस्ताव विचाराधीन
मँचेस्टर पोलिस खात्यात 6 फुटी अश्व!

Latest Marathi News अजित पवारांसमोर आव्हानांची मालिका; अनेक राजकीय तिढे सोडवायला लागणार Brought to You By : Bharat Live News Media.