प्रतिज्ञापत्र दिल्यास ईडी-सीबीआय चौकशी नाही; माजी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
तीन वर्षांपूर्वी 100 कोटींच्या कथित आरोपावेळी प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यास तुमची ईडी-सीबीआय चौकशी हाेणार नाही, अशी ऑफर भाजपच्या विदर्भातील मोठ्या नेत्याने दिली होती. पण, प्रतिज्ञापत्रातील मुद्दे पाहता, तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात पडले असते, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी (दि. २) केला. तसेच १०० काेटींचे आराेप खोटे असल्यानेच शासन न्या. चांदीवाल यांचा अहवाल दाबत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत भाजप व राज्य सरकारवर निशाणा साधला. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ॲटेलिया प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला. 100 कोटी वसुलीचा आरोपही माझ्यावर करण्यात आला. मात्र, उच्च न्यायालयाने आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे निकालत म्हटले आहे. तसेच निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या अहवालातूनही याबाबत अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे दीड वर्षापासून शासन चांदीवाल अहवाल दाबत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा करूनही कोणताच प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळे सरतेशेवटी अहवाल जनतेसमोर यावा याकरिता न्यायालयात दाद मागणार असल्याचे देशमुख म्हणाले.
100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपानंतर भाजपच्या विदर्भातील वरिष्ठाने आपल्यावर दबाव टाकला. त्या नेत्याने त्याच्या विश्वासूंमार्फत माझ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. पण, प्रतिज्ञापत्रातील चार मुद्दे बघता तत्कालीन मविआ सरकारमधील वरिष्ठांबद्दल आरोप असल्याचे मला लक्षात आले. त्यामुळे प्रतिज्ञापत्र लिहून देण्यास नकार देताच, दुसऱ्या दिवसापासून माझ्या घरावर छापेसत्र सुरू झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रतिज्ञापत्राबद्दल खासदार शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर माहिती असल्याचा दावा करतानाच योग्य वेळी प्रतिज्ञापत्रातील मुद्दे व संबंधित नेत्याचे नाव जगासमोर उघड करू, असा इशारा देशमुख यांनी दिला.
अजित पवारांनाच विचारा
महायुतीत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही भाजपने प्रतिज्ञापत्र लिहून घेतले का, असा प्रश्न देशमुख यांना विचारला. त्यावर, याबाबत अजित दादांनाच विचारा असा उपराेधिक टाेला त्यांनी लगावला. महाराष्ट्रासह देशभरात भाजप फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण करत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारणाच्या घसरलेल्या पातळीबद्दल देशमुख यांनी चिंता व्यक्त केली.
जागा वाटपाचा तिढा नाही
लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा असल्याचा मुद्दा देशमुख यांनी खोडून काढला. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ हे जागानिहाय चर्चा करत आहेत. त्यामध्ये प्रत्येक पक्षात उमेदवारांची पार्श्वभूमी पाहून त्यानुसार जागा वाटप केले जात आहे. वंचितलादेखील त्यांच्या अपेक्षेनुसार जागा सोडण्यात येतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
Latest Marathi News प्रतिज्ञापत्र दिल्यास ईडी-सीबीआय चौकशी नाही; माजी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट Brought to You By : Bharat Live News Media.
