किसान सभेच्या उपोषणास पाठिंबा; उन्हात 15 कि.मी.ची पायपीट
मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : हिरडा पिकाची नुकसानभरपाई शासनाकडून मिळविण्यासाठी मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर किसान सभेच्या पदाधिकार्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आदिवासी बांधवांसह शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. महत्त्वाचे म्हणजे भर उन्हात घोडेगाव ते मंचर सुमारे 15 किलोमीटर पायपीट करीत त्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जून 2020 मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत व नगदी रक्कम मिळवून देणार्या हिरड्याची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी मंचर येथे 5 दिवसांपासून किसान सभेचे प्रमुख डॉ. अमोल वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांनी उपोषण सुरू केले आहे.
उपोषणस्थळी आदिवासी बांधव तसेच इतर समाजातील बांधवांनीही भेटी देत पाठिंबा दर्शविला आहे, तरीही शासन जागे झाले नाही. या उपोषणास पाठिंबा मिळावा आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोडेगाव ते मंचर, असे सुमारे 15 किलोमीटर चालत मंचर येथे सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दिला. या पायी रॅलीत सुमारे 200 विद्यार्थी, युवक-युवती व हिरडा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हिरडाविषयक लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
मंचर येथे आज रास्ता रोको
किसान सभेने सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देणे, आंदोलनाची तीव्र ता वाढविणे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. 20) पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथील पिंपळगाव फाटा या ठिकाणी दुपारी 12 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते तसेच शेतकर्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभाकर बांगर यांनी केले.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यास उपोषण सोडू
हिरडा नुकसानभरपाईचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यावर आनंदाने उपोषण सोडू, अशी माहिती उपोषणकर्ते किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी सोमवारी (दि. 19) दिली. मागील पाच दिवसांपासून मंचर येथे सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत सोमवारी किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजयंती उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरडा नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. त्यांचे व यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरडा नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शासन निर्णय होईल, असा आम्हाला विश्वास आहे. हा निर्णय झाल्यावर आम्ही आनंदाने उपोषण सोडू, असे उपोषणकर्ते डॉ. अमोल वाघमारे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा
कांदा दरात दुपटीने वाढ! निर्यातबंदी उठविल्याचा सकारात्मक परिणाम
नागपूर : आम्हाला तूर्त आंदोलनाची गरज नाही : डॉ बबनराव तायवाडे
वडगाव दरेकरचे काम चार महिन्यांपासून बंदच : कोटी रुपये खर्च पाण्यात
Latest Marathi News किसान सभेच्या उपोषणास पाठिंबा; उन्हात 15 कि.मी.ची पायपीट Brought to You By : Bharat Live News Media.