ओझर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मार्जार कुळातील प्राण्याला ठराविक संस्कार होतात ते मुळातच आपल्या आईकडून… कारण पित्याचे कर्तव्य फक्त जन्म देण्यापुरतेच असते… तिच्या भाळी मात्र जन्मतः हेही नव्हते. कारण तिची आई लीला हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला… आणि अवघ्या एक वर्षाची माया पोरकी झाली… आईचे छत्र हरपल्यानंतर माया स्वावलंबी झाली आणि थोड्याच दिवसांत तिने आपले स्वत:चे राज्य निर्माण केले आणि स्वकर्तृत्वावर निर्माण केलेल्या राज्याची ती अनभिषिक्त सम्राज्ञी झाली. हि वास्तव कथा आहे ताडोबातील अनभिषिक्त सम्राज्ञी राहीलेल्या माया नावाच्या वाघिणीची. तिचे नुकतेच निधन झाले. तिच्या आठवणी जागवल्या नाशिकचे वन्यजीव छायाचित्रकार अनंत (बाळा) सरोदे यांनी…
विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व तेथील वन्यजीव हे नेहमीच भारतातील वन्यजीवप्रेमी व पर्यटक आणि छायाचित्रकारांचे आवडते ठिकाण म्हणून ओळखले जाते. वनविभागाच्या उत्तम नियोजनामुळे या प्रकल्पात वाघांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो. याच अधिवासातील सर्वात आकर्षक आणि लोकप्रिय वाघीण म्हणून मायाची ओळख होती. वाघांच्या मानसशास्त्राचा विचार केला, तर एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर वाघ त्याच्यावर तातडीने ताव मारतात. याला अपवाद होती ती माया. कारण एका हरीणाच्या पिलाला तिने दोन दिवस सांभाळले. यावरूनच तिचे नाव माया पडल्याचे वन्यजीवप्रेमी सांगतात. लहानपणीच मातृछत्र हरपल्यानंतर मायाने पहिली शिकार केली, ती रानडुकराची. याच शिकारीत तिच्यातली ताकद आणि शिकारीतले कसब समोर आले. वाघ साधारणत: दोन वर्षांचे झाल्यानंतर स्वत: शिकार करण्यास शिकतात. परंतु मायाने हे कसब वयाच्या दीड वर्षातच आत्मसात केले. थोड्याच कालावधीत तिने पांढरपौनी तलाव, नवेगाव, कोलारा, ताडोबा तलाव या भागांवर आपली हुकूमत निर्माण केली. तब्बल एक तप माया या भागाची हुकूमाची राणी राहिली. इतकी वर्षे एकाच भागावर आपले एककलमी अस्तित्व ठेवणे तसे कठीणच… पण ती मुळातच अनभिषिक्त सम्राज्ञी होती.
मायाचे दर्शन आम्हाला झाले, ते २०१४ साली पंचधारा येथे वादळात पडलेल्या झाडांवर. ती निपचित पडलेली होती. अर्ध्या तासाने ती रुबाबात उठून आमच्यासमोर येऊन आमच्या गाडीपुढे चालू लागली. ती एकमेव वाघीण होती, जी पर्यटकांना हवी ती पोझ द्यायची. अगदी पर्यटकांच्या जीपसमोर येऊन उभी राहायची. तिचे पोट भरलेले असताना तिने कधीही विनाकारण शिकार केली नाही. आमच्या गाडीसमोर चालत असताना अचानक ती थांबली. तेव्हा समोरच गव्यांचा कळप होता. साधारणपणे गवे आणि वाघ समोरासमोर येताच वाघ गव्यावर हल्ला करतो. परंतु मायाने आपला रस्ता बदलला आणि ती चालू लागली. गरज नसताना शिकार न करणे व आपली ताकद वाया न घालवणे हे तिचे वैशिष्ट्य होते. विशेष म्हणजे त्यावेळेस माया गरोदर होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा मायाचे दर्शन झाले. यावेळेस तिच्यासोबत तिचे तीन बछडेदेखील होते. बछड्यांसह मायाचे हे प्रथम दर्शन आम्हाला झाले. आपल्या खेळकर स्वभावानुसार माया आणि तिचे तीन बछडे सुमारे तासभर आमच्या गाडीसमोर मनसोक्त खेळत होते. यावेळेस मायानेदेखील विविध पोझ आम्हाला दिल्या. त्यामुळेच आम्हालादेखील तिची मनसोक्त छायाचित्रे काढता आली. त्यानंतर प्रत्येक सफरीत मायाने आम्हाला दर्शन दिले. प्रत्येक सफरीत मायासोबत वेगवेगळे नर आम्हाला दिसले. यात गब्बर, मटकासूर, ताला, रुद्र, बलराम अशा अनेक नर वाघांचा सहवास तिला लाभला.
टायगर क्वीन ऑफ तारू
सन १९७३ ला वाघ वाचवा ही मोहीम सुरू झाली. या मोहिमेच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त व्याघ्र चित्रफीत तयार करण्यात आली होती. नल्लामुथ्थू या प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकाराने माया आणि तिच्या पिलावर ही चित्रफीत तयार केली असून लवकरच नल्लामुथ्थू यांचा मायावर आधारित एक माहितीपटदेखील येत आहे. वन्यजिवांबाबत प्रसिद्ध असलेल्या डिस्कव्हरी वाहिनीवर टायगर क्वीन ऑफ तारू ही डाॅक्युमेंटरी मायावरच आहे. ताडोबात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत चालणे ही मायाची खासियत होती. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यातील मछली वाघिणीनंतर ताडोबातील माया ही जगप्रसिद्ध वाघीण होती. याच मायामुळे ताडोबातील पर्यटन वाढले. परदेशी पर्यटकांचे खास आकर्षण ताडोबातील मायाच होती.
जून २०१४ पासून मायाने पाच वेळा शावकांना जन्म दिला. पर्यटकांची लाडकी माया गेल्या मेपासून जंगलात अचानक तुरळक दिसू लागली आणि शेवटचे तिचे दर्शन ऑगस्टमध्ये झाले. त्यानंतर माया कोणालाच दिसली नाही. 1 ऑक्टोबरला मायाचा शोध सुरू झाला. तिच्या शोधासाठी वनविभागाचे तब्बल 150 कर्मचारी पायी पेट्रोलिंग करत होते. अखेर खोल जंगलात तिचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आणि ताडोबातील एका अनभिषिक्त सम्राज्ञीचा अखेर अंत झाला.
शब्दांकन-: मनोज कावळे
हेही वाचा :
World Cup 2023 : भारताच्या पराभवानंतर बंगाल, ओडिशामधील दोन तरूणांनी जीवन संपवले
गुजरातमधून महाराष्ट्रात म्हशींची अवैध वाहतूक; पिंपळनेर पोलिसांची कारवाई
चटपटीत बटाटे
The post ताडोबातील अनभिषिक्त सम्राज्ञी ‘माया’ appeared first on पुढारी.
ओझर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मार्जार कुळातील प्राण्याला ठराविक संस्कार होतात ते मुळातच आपल्या आईकडून… कारण पित्याचे कर्तव्य फक्त जन्म देण्यापुरतेच असते… तिच्या भाळी मात्र जन्मतः हेही नव्हते. कारण तिची आई लीला हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला… आणि अवघ्या एक वर्षाची माया पोरकी झाली… आईचे छत्र हरपल्यानंतर माया स्वावलंबी झाली आणि थोड्याच दिवसांत तिने आपले स्वत:चे …
The post ताडोबातील अनभिषिक्त सम्राज्ञी ‘माया’ appeared first on पुढारी.