‘एपीके फाईल’ सावधान, रक्कम गायब होईल!
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा : विदेशातून भारतीयांची फसवणूक, तपास अधिकाऱ्यांसमोरही प्रश्नचिन्ह
रमेश हिरेमठ /बेळगाव
बँक ग्राहकांच्या खात्यातील पैसे परस्पर हडपण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. सध्या सुरू असलेल्या ‘एपीके फाईल्स’ फसवणुकीने सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरू आहे. या नव्या पद्धतीने तपास अधिकाऱ्यांसमोरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ‘तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे’, ‘मोबाईल सीमकार्डची मुदत संपली आहे’, ‘ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवा, भरपूर नफा मिळवा’ असे सांगत सावजांना ठकवणारी गुन्हेगारीची पद्धत आता जुनी झाली. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ या प्रकारालाही एपीके फाईल्सने मागे टाकले आहे. गुन्हेगारीच्या या नव्या पद्धतीत अत्यंत सहजपणे एखाद्याच्या बँक खात्यात सायबर गुन्हेगारांना शिरता येते. गेल्या सहा महिन्यांत डिजिटल अरेस्ट आणि ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक या नावे बेळगावसह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक झाली आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांची रक्कम परत मिळविणे सायबर क्राईम विभागाला कठीण जात आहे. डिजिटल अरेस्टच्या प्रकारात तर गुन्हेगार सावजाचा मेंदूच काबीज करतात. ‘विमानतळावर तुमचे पार्सल आले आहे. त्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ, शस्त्रs, सीमकार्ड आहेत. आंतरराष्ट्रीय तस्करीत तुमचा हात आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी तुम्हाला अटक करण्यासाठी उद्या तुमच्या घरी येतात’ असे सांगत सावजाला एकाच जागी खिळवून ठेवून ‘बेअब्रू होणे टाळायचे असेल तर आमच्या बँक खात्यावर दंडाची रक्कम जमा करा. आताच्या आता तुमचे प्रकरण निस्तरून टाकू’ असे सांगितले जाते.
डिजिटल अरेस्ट
कारवाई टाळण्यासाठी सावज मोठ्या प्रमाणात रक्कम गुन्हेगारांच्या बँक खात्यात जमा करते. तोपर्यंत त्यांना विचार करायलाही गुन्हेगार वेळ देत नाहीत. त्यामुळेच या प्रकाराला डिजिटल अरेस्ट असे म्हणतात. सध्या रिमोट अॅक्सेस टूल (आरएटी) साहाय्याने एपीके फाईल्स किंवा अॅप तयार करून बँक ग्राहकांना ठकविण्यात येत आहे. एपीके म्हणजेच अँड्रॉईड अॅप्लीकेशन पॅकेज फाईल किंवा अॅपच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून बँक खात्यांना जो मोबाईल क्रमांक जोडलेला आहे, त्या क्रमांकावर एक मेसेज येतो. पूर्वीप्रमाणे ग्राहकाकडून कसलीच माहिती घेण्याची सायबर गुन्हेगारांना आता गरज उरली नाही. बँक ग्राहकाने केवळ त्या मेसेजवर जरी क्लिक केले तरी त्या मोबाईलची सूत्रे सायबर गुन्हेगारांकडे वळतात.
मेसेजवर किंवा लिंकवर क्लिक करू नका
बँक ग्राहकांना येणारे टेक्स्ट मेसेजही सायबर गुन्हेगारांच्या मोबाईलवरच येऊ लागतात. त्यामुळे सहजपणे ओटीपी घेऊन इंटरनेट मोबाईल बँकिंग अॅप्लीकेशनच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम गुन्हेगार आपल्या खात्यात वळविताना दिसत आहेत. त्यामुळेच एपीके फाईल किंवा अॅपच्या माध्यमातून येणाऱ्या मेसेजवर किंवा लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. जर चुकून एपीके फाईलवर क्लिक केले तर त्वरित मोबाईल स्वीच ऑफ करून तुमच्या बँकेशी संपर्क साधून इंटरनेट मोबाईल बँकिंगची व्यवस्था त्वरित बंद करा, अशी सूचनाही करण्यात आली आहे. फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच 1930 या क्रमांकावर सायबर क्राईम हेल्पलाईनशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्याची सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे करण्यात झारखंडमधील जामतारा हे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थानमधूनही गुन्हेगार असे गुन्हे करू लागले. आता केवळ भारतातच नव्हे तर कंबोडिया, लाओस, म्यानमार हे देशही सायबर क्राईमचे हब बनू लागले असून कंबोडिया व म्यानमारमध्ये बसून भारतीय नागरिकांना ठकविण्याचे प्रकार वाढले आहेत. कर्नाटकासह देशभरात घडणाऱ्या एकूण सायबर गुन्हेगारी प्रकरणांतील निम्म्याहून अधिक प्रकरणे याच देशातून घडवली जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे भारतीयांना गंडविण्यासाठी भारतीय तरुणांचीच भरती केली जात आहे.
तपासाचे आव्हानच
गेल्या सहा महिन्यांपासून ट्रेडिंग अॅप स्कॅम, डेटिंग स्कॅम, पिग बुचरिंग स्कॅम वाढले आहेत. हे सर्व गुन्हे परदेशातून केले जात असून एका कंबोडियात पाच हजारहून अधिक भारतीय तरुण यासाठी कार्यरत असल्याची माहिती सायबर क्राईम विभागाला मिळाली आहे. सायबर गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हानच उभे केले असून गुन्हेगारांनी पोलिसांसोबतच सर्वसामान्यांचीही डोकेदुखी वाढविली आहे.
9 क्रमांक दाबा…
गेल्या आठवडाभरापासून आणखी एक नवा प्रकार सुरू झाला आहे. ‘आपण टेलिकॉममधून बोलत आहोत. दोन तासात तुमचा रजिस्टर्ड मोबाईल बंद होणार आहे. तो पुढे सुरू ठेवण्यासाठी 9 क्रमांक दाबा’ असा रेकॉर्डेड कॉल येतो. त्याच्यावर विश्वास ठेवून आपले सीमकार्ड बंद होऊ नये म्हणून जर ग्राहकाने 9 क्रमांक दाबला तर त्याचा मोबाईल थेट सायबर गुन्हेगारांना कनेक्ट होतो. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब व्हायला सुरू होते.
Home महत्वाची बातमी ‘एपीके फाईल’ सावधान, रक्कम गायब होईल!
‘एपीके फाईल’ सावधान, रक्कम गायब होईल!
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा : विदेशातून भारतीयांची फसवणूक, तपास अधिकाऱ्यांसमोरही प्रश्नचिन्ह रमेश हिरेमठ /बेळगाव बँक ग्राहकांच्या खात्यातील पैसे परस्पर हडपण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. सध्या सुरू असलेल्या ‘एपीके फाईल्स’ फसवणुकीने सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरू आहे. या नव्या पद्धतीने तपास अधिकाऱ्यांसमोरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ‘तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे’, ‘मोबाईल सीमकार्डची मुदत संपली आहे’, ‘ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवा, भरपूर नफा मिळवा’ […]