‘अतिदक्षता’ रुग्णालयाच्या कामाला गती

50 खाटांचा सुसज्ज विभाग सहा महिन्यांत सेवेत होणार दाखल : केंद्राकडून 16 कोटी निधीची तरतूद बेळगाव : आकाराने मोठ्या असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यासह शेजारील महाराष्ट्र व गोवा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गोरगरिबांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आयुष्मान भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालयात 50 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू […]

‘अतिदक्षता’ रुग्णालयाच्या कामाला गती

50 खाटांचा सुसज्ज विभाग सहा महिन्यांत सेवेत होणार दाखल : केंद्राकडून 16 कोटी निधीची तरतूद
बेळगाव : आकाराने मोठ्या असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यासह शेजारील महाराष्ट्र व गोवा येथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गोरगरिबांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आयुष्मान भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालयात 50 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच सदर सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 16 कोटी 63 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य व केंद्र सरकारकडून गोरगरीब नागरिकांसाठी अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून माफक दरात, तसेच मोफत उपचार देण्याची सोय केली आहे. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना गैरसोय भासू नये, त्यासाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्हा रुग्णालयाच्या व्याप्तीमध्ये तालुका व इतर रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमधील रुग्णांसह शेजारील महाराष्ट्र व गोवा येथून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णांना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच अपघातादरम्यान जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार करण्याची सोय व्हावी, गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने केंद्र सरकारकडून 50 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या आवारात 50 खाटांच्या अतिदक्षता रुग्णालयाची इमारत उभारण्याचे काम 2022 पासून गतीने सुरू आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये काम पूर्ण करून सदर सेवा रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
येत्या सहा महिन्यांमध्ये सेवा देणार
जिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सेवा दिल्या जात असल्याने रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत 50 खाटांच्या अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात येत असून येत्या सहा महिन्यांमध्ये काम पूर्ण करून सदर सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
– बिम्स संचालक डॉ. अशोक शेट्टी