शिवा क्लिनिकचा व्यवसाय परवाना कायमचा रद्द करण्याची शिफारस

इतर दोन दवाखान्यांनाही नोटीस जारी : जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई बेळगाव : भडकल गल्ली येथील वादग्रस्त शिवा क्लिनिकचा परवाना कायमचा रद्द करण्याची शिफारस कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्थांची नोंदणी व तक्रार निवारण प्राधिकरणाने केली आहे. याबरोबरच क्लिनिक चालकाला 50 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध भागात बोगस डॉक्टरांविरुद्ध आरोग्य विभागाने कारवाई तीव्र केली […]

शिवा क्लिनिकचा व्यवसाय परवाना कायमचा रद्द करण्याची शिफारस

इतर दोन दवाखान्यांनाही नोटीस जारी : जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
बेळगाव : भडकल गल्ली येथील वादग्रस्त शिवा क्लिनिकचा परवाना कायमचा रद्द करण्याची शिफारस कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्थांची नोंदणी व तक्रार निवारण प्राधिकरणाने केली आहे. याबरोबरच क्लिनिक चालकाला 50 हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध भागात बोगस डॉक्टरांविरुद्ध आरोग्य विभागाने कारवाई तीव्र केली आहे. गेल्या मंगळवारी 25 जून रोजी भडकल गल्ली येथील शिवा क्लिनिकवर आरोग्य खाते व आयुष विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकून तपासणी केली होती. आयुर्वेदाच्या नावे नोंदणी असूनही अॅलोपॅथीची औषधे आढळून आल्याने या क्लिनिकला टाळे ठोकण्यात आले होते.
स्वत: जिल्हाधिकारी नितेश पाटील हे अध्यक्ष असलेल्या कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्थांची नोंदणी व तक्रार निवारण प्राधिकरणच्या न्यायालयात यासंबंधी चर्चा झाली. शिवा क्लिनिक चालकांविरुद्ध आलेल्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी तीन पथके पाठविण्यात आली होती. याचवेळी गांधीनगर येथील चिरायु आयुष थेरपी सेंटर व गुरुकृपा हॉस्पिटलमध्येही तपासणी करण्यात आली आहे.
शिवा क्लिनिक डॉ. एस. ए. देवनगावी यांच्या नावे नोंदणी झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात भलतेच ते चालवतात. या क्लिनिकमध्ये उमेश आचार्य हे होते. शक्तीवर्धक, सौंदर्यवर्धक औषधे, टॅटू रिमूव्हर, मल्टीपॅरा मॉनिटर आदी वैद्यकीय उपकरणेही तेथे आढळून आली आहेत. कर्नाटक खासगी वैद्यकीय संस्थांची नोंदणी कायदा 2007, 2009 व दुरुस्ती कायदा अधिसूचना 2018 च्या नियमांचा स्पष्टपणे उल्लंघन झाल्यामुळे शिवा क्लिनिकची नोंदणी कायमची रद्द करण्याची शिफारस कर्नाटक वैद्यकीय मंडळाला करण्याबरोबरच 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबरोबरच चिरायु आयुष थेरपीचे रामू पंडित यांनीही वैद्यकीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांना 50 हजार रुपयांचा दंडाचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. चिरायु आयुष थेरपी सेंटर व गुरुकृपा इस्पितळाला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नोटीस दिली असून या नोटिसीला योग्य उत्तर दिले नाही तर या दोन्ही संस्थांची नोंदणीही कायमची रद्द करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.