पुन्हा लक्ष्य विश्वविजयाचे
रोहितच्या नेतृत्वात पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याची संधी : 2023 चा वचपा काढण्याची टीम इंडिया सज्ज
वृत्तसंस्था/ मुंबई, नवी दिल्ली
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत अफलातून कामगिरी केली होती. भारताने सलग 10 सामने जिंकत जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाकडे वळवल्या होत्या. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रोहित शर्मासह कोट्यावधी भारतीयांचे डोळे विश्वविजयातील अंतिम सामन्यात पाणावले होते. मात्र, आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वविजयाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. गत वनडे विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढून भारताला टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची नामी संधी असणार आहे.
बीसीसीआयने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. अनुभवी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. याशिवाय, अनुभवी विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांचीही संघात वर्णी लागली आहे. दुसरीकडे, कार अपघातानंतर ऋषभ पंतचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. याचबरोबर संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे, अर्शदीप सिंग हे खेळाडू प्रथमच आयसीसीच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
बुमराह, अर्शदीप, सिराजकडे वेगवान माऱ्याची धुरा
विश्वचषक संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे. याशिवाय आवेश खान आणि खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. फिरकीची धुरा रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये बुमराहसह चहल, कुलदीप, अर्शदीप चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत.
केएल राहुल, इशान किशन, अय्यरकडे दुर्लक्ष
2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार होता, पण यंदा त्याला संघात स्थानही मिळवता आले नाही. याशिवाय, बीसीसीआयने फटकारुनही रणजी क्रिकेट स्पर्धेत सहभागी न होणाऱ्या इशान किशन व श्रेयस अय्यर या दोघांनाही संघात स्थान मिळवता आलेले नाही. शुभमन गिल आणि रिंकू सिंग यांना राखीव खेळाडूमध्ये स्थान देण्यात आले आहे. तसेच रिंकू सिंगप्रमाणे मागील काही दिवसांपासून रवी बिश्नोई टी-20 संघाचा नियमित सदस्य राहिला. त्याने प्रभावी कामगिरीही केली. पण त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.
अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होणार असून पाच गटात या संघांची विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ अ गटात असून भारतासह पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा व अमेरिका यांचाही या गटात समावेश आहे. 5 जून रोजी टीम इंडियाचा सलामीचा सामना आयर्लंडविरुद्ध होईल.
ऋषभ पंतला थेट वर्ल्डकपमध्ये संधी
गेल्या 17 महिन्यापासून एकही सामना न खेळणाऱ्या ऋषभ पंतला टी-20 वर्ल्डकपचे तिकीट मिळाले आहे. भारतीय निवडकर्त्यांनी पंत आणि संजू सॅमसनचा टीम इंडियात यष्टीरक्षक म्हणून समावेश केला आहे. पंत तब्बल 17 महिन्यांनंतर भारतीय संघात परतला आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर टीम इंडियातून बाहेर होता. तो नुकताच आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानात परतला असून आता तो टीम इंडियाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सज्ज
टीम इंडिया जगज्जेता होण्यासाठी जून महिन्यात मैदानावर उतरणार आहे. यंदा सामना टी-20 विश्वचषकाचा असणार आहे. मात्र, 140 कोटी भारतीयांना पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकायचा असून एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढायचा आहे. त्यासाठी, टीम इंडिया सज्ज झाली आहे. 2007 मध्ये भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकला होता, यानंतर एकदाही भारतीय संघाला जेतेपद मिळवता आलेले नाही. यंदा भारतीय संघ जेतेपद मिळवण्याच्या निर्धाराने उतरेल, यात शंका नाही.
टी 20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने
5 जून – भारत वि आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून – भारत वि पाकिस्तान. न्यूयॉर्क
12 जून – भारत वि यूएसए, न्यूयॉर्क
15 जून – भारत वि कॅनडा, फ्लोरिडा.
गतविजेत्या इंग्लंडची घोषणा, बटलरकडे नेतृत्वाची कमान
लंडन : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. जोस बटलरकडे नेतृत्वाची कमान सोपवली असून त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने मागील टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. याशिवाय, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन यांचे पुनरागमन झाले आहे. विश्वचषकात इंग्लंड आपला पहिला सामना 4 जून रोजी स्कॉटलंडविरुद्ध खेळेल.
टी 20 वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, मार्क वुड.
दक्षिण आफ्रिकेची धुरा मार्करमकडे
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मंगळवारी टी-20 वर्ल्डकपसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. अनुभवी एडन मार्करमकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. याशिवाय, क्विन्टॉन डीकॉक, हेन्रिक क्लासेन व डेव्हिड मिलर या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. आफ्रिकन संघ आपला पहिला सामना दि. 3 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध न्यूयॉर्कमध्ये खेळेल. आतापर्यंत एकदाही आफ्रिकेला टी-20 वर्ल्डकप ज्ंिाकता आलेला नाही, यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्यांची कामगिरी कशी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टी-20 वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकन संघ – एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, नॉर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्ज.
राखीव खेळाडू – नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.