पाकिस्तानच्या नाविक तळावर हल्ला

6 जण ठार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नाविक वायुतळावर मोठा हल्ला झाला आहे. या तळाचे नाव पीएनएस सिद्दिक असे आहे. हल्ला करणाऱ्यांनी तळात घुसून अनेक स्फोट केले असून गोळीबारही केला आहे. या हल्ल्यात एका पाकिस्तानी नौसैनिकासह पाचजण ठार झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने […]

पाकिस्तानच्या नाविक तळावर हल्ला

6 जण ठार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नाविक वायुतळावर मोठा हल्ला झाला आहे. या तळाचे नाव पीएनएस सिद्दिक असे आहे. हल्ला करणाऱ्यांनी तळात घुसून अनेक स्फोट केले असून गोळीबारही केला आहे. या हल्ल्यात एका पाकिस्तानी नौसैनिकासह पाचजण ठार झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. हल्लेखोरांची संख्या पाच होती आणि त्या सर्वांना ठार करण्यात आले आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे.
या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या परिसराची नाकेबंदी करण्यात आली. वेळीच कारवाई केल्याने या तळाची विशेष हानी झाली नाही, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी केला आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या तळाचा मोठा भाग या हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेला हा एका आठवड्यातील दुसरा तर या वर्षातील तिसरा मोठा हल्ला आहे.
चिनी गुंतवणुकीच्या विरोधात
पाकिस्तानच्या सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तान या भागांमध्ये चीन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. पण या गुंतवणुकीचा लाभ या भागांमधील लोकांना मिळण्याऐवजी पंजाब आणि सिंध या भागांमधील लोकांना मिळत आहे. बलुचिस्तान आणि सरहद्द प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात खनीज संपत्ती असून पाकिस्तानचे सरकार या संपत्तीचे शोषण करीत आहे, असा आरोप बलुचिस्तानी नागरिकांचा आहे. बलुचिस्तानला पाकिस्तानच्या जोखडातून स्वतंत्र करण्यासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना करण्यात आली असून ही संघटना चीनच्या गुंतवणुकीच्या विरोधात आहे. त्यामुळे या संघटनेने आतापर्यंत अनेक चिनी आस्थापनांवरही हल्ले केले आहेत. बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या वायव्य भागात पाकिस्तानी लष्कराने चालविलेल्या अत्याचारांच्या विरोधातही ही संघटना लढत आहे.
आणिबाणी लागू
मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात आणिबाणी लागू करण्यात आली आहे. हल्ल्याच्या चौकशीचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला असून काही जणांची धरपकड करण्यात आल्याचे वृत्त आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने 29 जानेवारीला माच या शहरावर हल्ला केला होता. तसेच 20 मार्चला ग्वादर बंदरावरही हल्ला केला होता. ग्वादर बंदराचे व्यवस्थापन पाकिस्तानने चीनकडे सोपविले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडॉर प्रकल्पात या बंदराची भूमिका महत्त्वाची आहे. या बंदरावर आणि चीनच्या या भागातील काही प्रकल्पांवर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लहान हल्लेही स्थानिक गटांकडून करण्यात आले आहेत.
खैबर भागात अशांतता
पाकिस्तानच्या वायव्येला असणाऱ्या खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान ही संघटना या भागात सक्रिय असून या संघटनेच्या गटांनी या भागांमध्ये अनेक हल्ले केले आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न पाकिस्तान देशाची निर्मिती झाल्यापासूनच करण्यात येत असून अलिकडच्या काळात जोर वाढला आहे.
दूरगामी परिणाम होणार
पाकिस्तानच्या वायव्य भागातील घडामोडींचा त्या देशाच्या इतर भागांवरही व्यापक परिणाम होत आहे. पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था दुर्बल झाल्याचे हे लक्षण असल्याची टीका होत आहे. या हल्ल्यामुळे सिंध आणि पंजाब प्रांतांमधील सरकारी आस्थापनांची सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली असून लष्करी तळांना अधिक संरक्षण देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी प्रशासनाने दिली आहे.
पाकिस्तानच्या कृतीचेच फळ
ड वायव्य भागात पाकिस्तानी प्रशासनाच्या अत्याचारांविरोधात संतापाची भावना
ड बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना झाली बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी
ड वायव्य भागातील चीनच्या प्रभावाला स्थानिक नागरिकांकडून सातत्याने विरोध
ड अलिकडच्या काळात चीन आस्थापनांवर स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात हल्ले