महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीगिरांची झोळी रिकामीच!
पुरुषावर बक्षिसांचा वर्षाव, महिलांना दुजाभाव कशासाठी?
फिरोज मुलाणी / औंध
फुलगांव, धाराशिवला महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लांवर चारचाकी गाडी शिवाय लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली. याउलट चंद्रपुरातील महाराष्ट्र केसरी विजेत्या महिलांच्या बक्षिसांची झोळी अद्यापही रिकामीच आहे. कुस्ती क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढे येऊन महिला मल्लांच्या पाठीवर बक्षिसांची थाप मारण्याची गरज आहे.
पुरुष गटाप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने गतवर्षापासून महिला वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. ही स्पर्धा सुरू करुन परिषदेने कुस्तीत महिला आणि पुरुष असा भेदभाव न करता महाराष्ट्र केसरी सर्वोच्च किताब देऊन महिलांचा सन्मान केला आहे. 2023 मध्ये कुस्तीगीर परिषदेने सांगलीला तर अस्थायी समितीच्या माध्यमातून कुस्तीगीर संघाने कोल्हापूरला स्पर्धा घेतली होती. किताब विजेत्या महिलांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. अलीकडे कुस्तीगीर संघाने फुलगांवला तर परिषदेने धाराशिवला पुरुष गटातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली होती. आयोजकांनी विजेत्या मल्लांना चारचाकी गाडी शिवाय रोख रक्कम देऊन सन्मान केला होता. त्याशिवाय कुस्ती क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी रोख रक्कम देऊन महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
पुरुष गटाच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना तुटपुंज्या बक्षिसावर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला वाकुल्या दाखवत असली तरी शिरोळच्या अमृताने मात्र मानाची गदा जिंकून कुस्तीपंढरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कोल्हापूरच्या पोरी लाल मातीत भारी ठरल्या असल्या तरी आपल्या लेकीच्या कौतुकासाठी अद्याप तरी कोल्हापूरकरांनी खिशात हात घातला असल्याचे ऐकिवात नाही. लाल मातीत मर्दुमकी दाखवणाऱ्या महिला मल्लांना देखील खुराकासाठी खर्चाची आवश्यकता असते. अनेकदा चांगली कामगिरी केली तरी प्रायोजक भेटत नसल्याने महिला मल्लांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समाजातील उद्योजक अथवा मोठमोठ्या कंपन्यांनी लाल मातीत पदकाचा रतीब घालणाऱ्या महिला मल्लांना दत्तक घेऊन त्यांच्या खुराकासाठी आर्थिक पाठबळ दिले तर कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राच्या महिला मल्ल देखील पुढचा पल्ला गाठतील असा विश्वास कुस्ती प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.
तुटपुंज्या बक्षिसावर पैलवान कसे घडणार
मोठ्या किताबाच्या स्पर्धेत किताब विजेते आणि उपविजेते शिवाय प्रत्येक गटातील चॅम्पियन मल्लांना आयोजकांनी चांगले बक्षीस देऊन गौरव केला पाहिजे. तुटपुंज्या बक्षिसाच्या रकमेत जाण्यायेण्याच्या खर्चाची देखील सोय होत नाही. आयोजक आणि कुस्तीगीर परिषदेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तरच पुढील काळात मल्ल मोठ्या स्पर्धेत सहभागी होतील नुसते पदक गळ्यात घालून आणि कोरड्या कौतुकाने पैलवान कसे घडतील असा सवाल विजेत्या मल्लांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.
कुस्ती जिवंत ठेवायची असेल तर पैसा हवाच!
आज महागाईच्या काळात एखादा मल्ल पोसणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. खुराकाचा खर्च भागवताना कुटुंबाची आर्थिक परवड होते. अशा स्थितीत देखील पोटाला चिमटा घेऊन काही पालक मंडळी आपल्या मुलांना कुस्तीच्या आखाड्यात पाठवतात. लाल मातीतले हत्ती पोसताना आर्थिक ओढाताण होते त्यामुळे कुस्ती जिवंत ठेवायची असेल तर पैसा हवाच असे मत काही पालकांनी व्यक्त केले.
Home महत्वाची बातमी महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीगिरांची झोळी रिकामीच!
महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीगिरांची झोळी रिकामीच!
पुरुषावर बक्षिसांचा वर्षाव, महिलांना दुजाभाव कशासाठी? फिरोज मुलाणी / औंध फुलगांव, धाराशिवला महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लांवर चारचाकी गाडी शिवाय लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली. याउलट चंद्रपुरातील महाराष्ट्र केसरी विजेत्या महिलांच्या बक्षिसांची झोळी अद्यापही रिकामीच आहे. कुस्ती क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढे येऊन महिला मल्लांच्या पाठीवर बक्षिसांची थाप मारण्याची गरज आहे. पुरुष गटाप्रमाणे महाराष्ट्र […]