भारतीय युवा संघाची विजयी सलामी

यू 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : बांगलादेशवर 84 धावांनी मात : सामनावीर आदर्श सिंग, कर्णधार उदय सहारनची शानदार अर्धशतके वृत्तसंस्था/ ब्लोमफांऊटेन, द.आफ्रिका भारताने 19 वर्षांखीलल वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने बांगलादेशला धुळ चारत या युवा वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली आहे. सामनावीर आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने […]

भारतीय युवा संघाची विजयी सलामी

यू 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : बांगलादेशवर 84 धावांनी मात : सामनावीर आदर्श सिंग, कर्णधार उदय सहारनची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ ब्लोमफांऊटेन, द.आफ्रिका
भारताने 19 वर्षांखीलल वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने बांगलादेशला धुळ चारत या युवा वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली आहे. सामनावीर आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 251 धावा केल्या. भारताच्या 252 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशचा डाव 167 धावांत गुंडाळला आणि 84 धावांनी विजय साकारला. या विजयासह टीम इंडियाला 2 गुण मिळाले आहेत. भारतीय संघाचा पुढील सामना दि. 25 रोजी आयर्लंडविरुद्ध होईल.
दक्षिण आफ्रिकेतील मॅनगॉंग ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकांतच अर्शीन कुलकर्णीच्या रूपाने भारताने पहिली विकेट गमावली. अर्शीन 7 धावा काढून तंबूत परतला. यानंतर आठव्या षटकात मुशीर खानही (3) स्वस्तात बाद झाल्याने भारताची 2 बाद 31 अशी स्थिती होती. पण, त्यानंतर आदर्श सिंग व उदय सहारन यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी साकारली. ही मजबूत भागीदारी चौधरी मोहम्मद रिझवानने 32 व्या षटकात मोडली. त्याने आदर्शची विकेट घेतली. आदर्शने 96 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. यानंतर भारतीय फलंदाजांना कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही. उर्वरित खेळाडूंनी छोटे-छोट्या धावांचे योगदान दिले. आदर्शनंतर कर्णधार सहारन 39 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. 94 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 64 धावा करणाऱ्या सहारनला महफुजुर रहमान रब्बीने बाद केले. याशिवाय, सचिन धसने 20 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. राज लिंबानी 2 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाने 50 षटकांत 7 बाद 251 धावा केल्या. बांगलादेशकडून मारुफ मृधाने 43 धावांत 5 गडी बाद केले. याशिवाय कर्णधार महफूजुर रहमान रब्बी आणि चौधरी मोहम्मद रिझवान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
बांगलादेश 167 धावांत ऑलआऊट
252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची पहिली विकेट 38 धावांवर पडली. झीशान आलम 17 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. राज लिंबानीच्या चेंडूवर मुरुगन अभिषेकने अप्रतिम झेल घेतला. बांगलादेशची दुसरी विकेट 39 धावांवर पडली. चौधरी मोहम्मद रिझवान खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. सौम्या पांडेने त्याला क्लीन बोल्ड केले. सौम्या पांडेने सलग दोन षटकांत विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर आणले. त्याने रिझवान पाठोपाठ सिबलीला क्लीन बोल्ड केले. सिबलीने 35 चेंडूत 14 धावा केल्या. अहार अमीनच्या बांगलादेशला चौथा धक्का बसला. यानंतर ठराविक अंतराने त्यांच्या विकेट गेल्याने बांगलादेशचा डाव 45.5 षटकांत 167 धावांवर ऑलआऊट झाला. बांगलादेशकडून मोहम्मद शिहाबने सर्वाधिक 77 चेंडूत 54 धावा केल्या. भारताकडून सौम्या पांडने 24 धावांत 4 गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 7 बाद 251 (आदर्श सिंग 76, उदय सहारन 64, सचिन धस नाबाद 26, मारुफ 43 धावांत 5 बळी).
बांगलादेश 45.4 षटकांत सर्वबाद 167 (मोहम्मद शाहिब 54, शेख परवेज नाबाद 15, अरिफुल इस्लाम 41, सौम्या पांडे 24 धावांत 4 बळी, मुशीर खान 2 बळी).