बहिणीबरोबर पाहिले…प्रियकराला संपवले

महांतेशनगर अंडरब्रिजखाली तरुणाचा स्व्रू ड्रायव्हरने भोसकून खून बेळगाव : न्यू गांधीनगर येथील एका तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करून खून करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी महांतेशनगर अंडरब्रिजखाली प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असून खुनानंतर काही तासातच पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. इब्राहिम ऊर्फ शोएब ख्वाजामैनुद्दीन चाऊस (वय 21) रा. गुलजार […]

बहिणीबरोबर पाहिले…प्रियकराला संपवले

महांतेशनगर अंडरब्रिजखाली तरुणाचा स्व्रू ड्रायव्हरने भोसकून खून
बेळगाव : न्यू गांधीनगर येथील एका तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करून खून करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी महांतेशनगर अंडरब्रिजखाली प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असून खुनानंतर काही तासातच पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. इब्राहिम ऊर्फ शोएब ख्वाजामैनुद्दीन चाऊस (वय 21) रा. गुलजार गल्ली, न्यू गांधीनगर असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुजम्मील मैनुद्दीन सत्तीगेरी (वय 23) रा. गुलाबशा गल्ली, न्यू गांधीनगर याला अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध माहितीनुसार खून झालेला इब्राहिम ऊर्फ शोएब हा न्यू गांधीनगर परिसरातील एका तरुणीवर प्रेम करीत होता. तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मागणीही घालण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दिला होता. त्याच तरुणीबरोबर गुरुवारी दुपारी 12 वाजता मोटारसायकलवरून जाताना ही घटना घडली आहे.
इब्राहिम ऊर्फ शोएब ज्या तरुणीवर प्रेम करीत होता, तिचा भाऊ मुजम्मील हा फोर्ट रोडवर दुचाकी वायरिंगचे काम करतो. गुरुवारी दुपारी महांतेशनगर परिसरात काम निघाल्याने तो महांतेशनगरला गेला होता. काही अवजारे लागणार म्हणून फोर्ट रोडला जाताना महांतेशनगर अंडरब्रिजखाली इब्राहिम ऊर्फ शोएब त्याला दिसला. सोबत मुजम्मीलची बहीणही होती. त्यावेळी ‘तुला किती वेळा सांगूनही माझ्या बहिणीबरोबर का फिरतोस?’ अशी विचारणा केली. यावेळी झालेल्या वादावादीनंतर स्क्रू ड्रायव्हरने इब्राहिमच्या पोटावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेतील इब्राहिमला जवळच्या खासगी इस्पितळात हलविण्यात आले. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यासंबंधी भादंवि 302 कलमान्वये माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.
मोटारसायकल नादुऊस्त झाल्याने…
इब्राहिम ऊर्फ शोएब मोटारसायकलवरून जात होता. त्याची मोटारसायकल महांतेशनगर अंडरब्रिजखाली नादुरुस्त झाली. त्याचवेळी कामानिमित्त महांतेशनगरला गेलेला संशयित आरोपी मुजम्मीलही तेथून जात होता. त्यावेळी त्याला इब्राहिम दिसला. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादावादीनंतर स्क्रू ड्रायव्हरने पोटावर हल्ला करून इब्राहिमचा खून करण्यात आला.