कार अपघातात तरुणी ठार

चालकासह दोन तरुणी गंभीर जखमी : कारची विद्युतखांबाला धडक वार्ताहर /सांबरा सांबरानजीकच्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विद्युतखांबाला धडक देऊन त्यानंतर फरफटत जाऊन शेतामध्ये पडली. या अपघातात एक तरुणी ठार झाली तर चालकासह अन्य दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सुमारे साडेबारा ते एकच्या सुमारास घडली आहे. या अपघातात […]

कार अपघातात तरुणी ठार

चालकासह दोन तरुणी गंभीर जखमी : कारची विद्युतखांबाला धडक
वार्ताहर /सांबरा
सांबरानजीकच्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विद्युतखांबाला धडक देऊन त्यानंतर फरफटत जाऊन शेतामध्ये पडली. या अपघातात एक तरुणी ठार झाली तर चालकासह अन्य दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सुमारे साडेबारा ते एकच्या सुमारास घडली आहे. या अपघातात मयत झालेली तरुणी व अन्य सर्व जखमी सांबरा विमानतळावरील इंडिगो एअरलाईन्सचे कर्मचारी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काजल मोहन सियानी (वय 26) राहणार हुबळी हिचा खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये चालक सुजीन सुदर्शन (वय 24, रा. कांडमकोडा, कन्याकुमारी, तामिळनाडू), नाझमीन अझरुद्दीन मुल्ला (वय 22, रा. गोवा) व रितू मारुती पाटील (वय 22, रा. खणगाव खुर्द,  ता. बेळगाव) हे सर्व गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत.
70 ते 80 फूट कार फरफटत गेली
याबाबत घटनास्थळावरून व पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, टी. एन. 75 झेड 1686 या क्रमांकाच्या हुंडाई मॅगना कारमधून हे सर्वजण रात्री उशिरा बेळगावहून सांबऱ्याकडे येत होते. सांबरा गावच्या आधी बेळगाव-बागलकोट रस्त्यावरील नाला ओलांडल्यानंतर असलेल्या धोकादायक वळणावर चालक सुजीन सुदर्शन याचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युतखांबाला जोराची धडक दिली. तेथून सुमारे 70 ते 80 फूट कार फरफटत जाऊन शेतामध्ये थांबली. ही धडक इतक्या जोराची होती की कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी त्या युवतींची पादत्राणे व इतर साहित्य पडले होते. या अपघातातील मयत झालेली तरुणी व इतर जखमी हे सर्वजण सांबरा येथील महादेवनगर व गणेशनगर परिसरामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहतात. ज्या ठिकाणी अपघात झाला तेथून काही मिनिटांच्या अंतरावरच त्यांचे घर होते. घटनेची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची फिर्याद मारीहाळ पोलीस स्थानकात देण्यात आली आहे.
धोकादायक वळण अन् अपघात
सांबरा गावानजीक असलेल्या धोकादायक वळणावर मागील तीन-चार वर्षांमध्ये अशाच प्रकारचे तीन-चार अपघात घडले आहेत. मात्र या ठिकाणी सूचना फलक किंवा संरक्षक कठडा नसल्याने वारंवार असे अपघात घडत आहेत. यासाठी संबंधित खात्याने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत घटनास्थळी अनेकांनी व्यक्त केले.