आईवडिलांसाठी वेळ द्यायला हवाच!

सचिन पिळगावकर यांचे मत : पुस्तक महोत्सवातील सुसंवाद झाला रंगतदार पणजी : आईविषयीच्या प्रेम आणि पालकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा भाव सचिन पिळगावकर यांनी अतिशय साध्या पण अर्थपूर्ण शब्दांत मांडला. ‘मी आजही रात्रीचं जेवण आईसोबतच घेतो. आपल्या पालकांना आपल्याकडून फार काही नको असतं, फक्त थोडासा वेळ हवा असतो. तोच वेळ नसेल तर जगण्यात अर्थ काय? असा प्रŽ त्यांनी उपस्थित केला. पालकांसाठी वेळ काढणं गरजेचं असल्याचं […]

आईवडिलांसाठी वेळ द्यायला हवाच!

सचिन पिळगावकर यांचे मत : पुस्तक महोत्सवातील सुसंवाद झाला रंगतदार
पणजी : आईविषयीच्या प्रेम आणि पालकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा भाव सचिन पिळगावकर यांनी अतिशय साध्या पण अर्थपूर्ण शब्दांत मांडला. ‘मी आजही रात्रीचं जेवण आईसोबतच घेतो. आपल्या पालकांना आपल्याकडून फार काही नको असतं, फक्त थोडासा वेळ हवा असतो. तोच वेळ नसेल तर जगण्यात अर्थ काय? असा प्रŽ त्यांनी उपस्थित केला. पालकांसाठी वेळ काढणं गरजेचं असल्याचं मत सचिन पिळगावकर यांनी ठामपणे सांगितलं.
गोवा पुस्तक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या संवादाने उपस्थित रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अमित भाटिया यांनी सचिन पिळगावकर यांच्याशी संवाद साधला. या सत्रात त्यांनी आपल्या आयुष्याचा, सिनेप्रवासाचा आणि गोव्याशी असलेल्या भावनिक नात्याचा मनमोकळा उलगडा केला. वाचन आणि लेखन ही केवळ सवय नसून आपली सांस्कृतिक ओळख आहे, ती टिकवायची असेल तर अशा साहित्यिक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन ही काळाची गरज ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
संस्कृतीचा फरक जाणवतो
हिंदी आणि मराठी चित्रपटांकडे पाहिलं तर संस्कृतीचा फरक स्पष्ट जाणवतो. मराठी चित्रपटांत मातीचा सुगंध, जीवनमूल्ये आणि समाजाची खरी प्रतिमा ठळकपणे दिसते. फिल्म मेकिंग ही एक प्रवासासारखी प्रक्रिया आहे. जशी आई गर्भधारणेचा काळ बाह्य रूपाकडे न पाहता मनापासून एन्जॉय करते, तसाच प्रत्येक टप्पा जगण्याचा आनंद दिग्दर्शक घेत असतो. जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होतो, तेव्हा तो आनंद शब्दांच्या पलीकडे जातो. हाच संस्कृतीचा धागा जपण्यासाठी निरीक्षण, संवाद आणि माणसांशी नातं जोडणं महत्त्वाचं आहे. दररोज किमान दोन नवीन माणसांशी संवाद साधा, त्यांच्यातील एक तरी वेगळं, शिकवणारं काहीतरी शोधा. हा सल्ला केवळ जीवन समृद्ध करणारा नाही, तर लेखन-वाचनाला नवी दिशा देणारा आहे. अशाच संवेदनशीलतेतून आपली संस्कृती जिवंत राहते, असेही ते म्हणाले. सचिन यांनी “कौन देश मैं चला रे’ हे गाणं गात वातावरण अधिक भावनिक आणि स्मरणीय केलं. त्यांच्या सुरेल आवाजात कार्यक्रमाचा शेवट झाला आणि रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारी आठवण उमटली.
’सचिन’ नावाने ओळखला जाणारा एकटाच
साडेचार वर्षांचे असताना उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्कारापासून आपल्या कारकिर्दीची सुऊवात झाल्याचं सचिन यांनी सांगितलं. त्यानंतर अखंडपणे सुरू राहिलेला हा प्रवास आज सहा दशकांपर्यंत पोहोचला आहे. ’मास्टर सचिन’ म्हणून ओळख मिळाल्याने आपण कधीच आडनाव लावलं नाही आणि ‘सचिन’ या एकाच नावाने ओळखला जाणारा मी एकटाच आहे, असा उल्लेख त्यांनी हसत केला. अवघ्या सहा वर्षांचे असताना वडिलांच्या प्रिंटिंग प्रेसला लागलेल्या आगीतून परिस्थितीशी सामना कसा करायचा, हे आयुष्याने शिकवलं. परिस्थिती माणसाला घडवते आणि जगायला शिकवते, हा धडा तेव्हाच मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.
आपण ज्या भाषेत काम करतो, त्या भाषेवर पूर्ण प्रभुत्व असणं अत्यावश्यक असल्याचं मत सचिन यांनी या संवादात ठामपणे मांडलं. पूर्वी लोक आपली विद्या, अनुभव मुक्तपणे एकमेकांशी शेअर करत होते; मात्र आज काही कमी होईल या भीतीने देण्याची वृत्ती कमी झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. उर्दू भाषेबद्दल विशेष ओढ असल्याची कबुली देत, ती भाषा आत्मसात करण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांविषयी त्यांनी सांगितलं. मोठ्या, अनुभवी लोकांच्या सहवासातून शिकण्यासारखं खूप काही मिळतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण आयुष्यभर सोबत राहतात, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.
लक्ष्मीकांत बेर्डे : माणूस म्हणून मोठे
आयुष्यातील जिवलग मित्र म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उल्लेख करताना सचिन भावूक झाले. केवळ कलाकार म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही तो तितकाच मोठा होता, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
गोव्याविषयीची आपुलकी अधिक घट्ट केली
माझी मूळ ओळख गोव्याची आहे आणि ती ओळख केवळ आठवणींत नव्हे, तर जगण्यातही जपायची आहे. पिळगावमध्ये स्वत:चे घर उभारण्याचा निर्णय घेत गोव्याशी असलेली आपुलकी अधिक घट्ट केली असून, पुढील काळात गोव्यातील कलाकार, तंत्रज्ञ आणि स्थानिक लोकांसोबत चित्रपट निर्मिती करण्याची ग्वाही ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते सचिन पिळगावकर यांनी दिली आहे.
पालकांनी वाचलं तर मुलं वाचनाकडं वळतात
वाचनाची सवय आयुष्य बदलू शकते, कारण माणूस कसा दिसतो यापेक्षा त्याची दृष्टी, समज आणि अनुभव अधिक उजळ असतात. काय वाचायचं याची निवड जाणीवपूर्वक करावी, कारण बदल हा एकमेव शाश्वत सत्य आहे. आज वाचनाच्या सवयी बदलल्या आहेत. ई-पुस्तकांकडे कल वाढतो आहे, आणि हा बदल स्वीकारायलाच हवा. पुस्तकांपेक्षा माणसांनी घडवलेलं माझं आयुष्य अधिक महत्त्वाचं आहे. पालकांनी स्वत: वाचनाची सवय जोपासली तर मुलं आपोआप मूळ पुस्तकांकडे वळतात, असेही सचिन यांनी सांगितले.
’हाच माझा मार्ग’ चौथ्या आवृत्तीचे अनावरण; नव्या पुस्तकांचीही घोषणा….
सचिन पिळगावकर यांच्या आत्मकथन ’हाच माझा मार्ग’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे अनावरण या सत्रात करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी या आत्मकथनाची पार्श्वभूमी उलगडून सांगितली.  गाजलेल्या चित्रपट ’नवरा माझा नवसाचा 2’ च्या निर्मितीप्रक्रियेवर आधारित नवे पुस्तक येत्या चार महिन्यांत प्रकाशित होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.