कामगारांनी विचारपूर्वक मतदान करावे

ख्रिस्तोफर फोन्सेका यांचे आवाहन : कामगार दिनानिमित्त पणजीत रॅली पणजी : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कामगारवर्गाने राष्ट्राच्या हिताचा विचार करून मतदान करावे. कामगारांचे हित कोण लक्षात घेतो, कोण अन्याय करतो आणि कामगारवर्गाच्या मागण्यांसाठी कोण लढतो, हे पाहूनच योग्य त्या उमेदवाराला मते द्यावीत, असे आवाहन कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले आहे. कामगार दिनानिमित्त ‘आयटक’ या कामगार […]

कामगारांनी विचारपूर्वक मतदान करावे

ख्रिस्तोफर फोन्सेका यांचे आवाहन : कामगार दिनानिमित्त पणजीत रॅली
पणजी : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कामगारवर्गाने राष्ट्राच्या हिताचा विचार करून मतदान करावे. कामगारांचे हित कोण लक्षात घेतो, कोण अन्याय करतो आणि कामगारवर्गाच्या मागण्यांसाठी कोण लढतो, हे पाहूनच योग्य त्या उमेदवाराला मते द्यावीत, असे आवाहन कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले आहे. कामगार दिनानिमित्त ‘आयटक’ या कामगार संघटनेतर्फे राजधानी पणजीत रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. आझाद मैदानावर सभा घेण्यात आली. त्यावेळी आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका बोलत होते. ते म्हणाले की कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असून सरकारची एकंदरीत धोरणेही कामगारविरोधी आहेत. त्यामुळे कामगारवर्गाचा आवाज दबला जात असून त्यांना न्याय मिळत नसल्याची टीका फोन्सेका यांनी केली.
गोव्यातील कामगारवर्गाला 7 मे रोजी मतदानाच्या माध्यमातून सुवर्णसंधी मिळणार असून मते वाया घालवू नका तर ती सत्कारणी लावा. विचारपूर्वक मतदान करा. कामगारांची अवस्था खराब असून किमान वेतनही दिले जात नाही. त्यातून खर्च भागत नाही. कामगारवर्ग विकासासाठी पुरेसा निधी देण्यात येत नाही. त्यातील तरतूद वाढवण्याऐवजी कमी करण्यात येते. या सर्वांचा परिणाम कामगारांवर होतो. गोव्यात महिला कामगारांची संख्या वाढत नाही. उलट ती कमी होत असून त्यांना कमी वेतन देण्यात येते. ते पडवडणारे नाही. याकडे सरकारने लक्ष देऊन कामगारांची पिळवणूक थांबवावी, असे फोन्सेका यांनी सांगितले.
गोव्यातील औषध कंपन्यांतील कामगारवर्गावर अन्याय होत असून त्या कंपन्या कामगारविरोधी कारवाया करतात. त्यामुळे अनेक कामगारांना घरी बसावे लागते. ज्यांनी घरी बसवले त्यांना लोकसभेत पाठवायचे की घरी बसवायचे हे ठरवा, असे आवाहन ‘माकप’ नेते अजित अभ्यंकर यांनी केले. ते म्हणाले की नफ्यात-तोट्यात असलेल्या कंपन्या सरकारला, राजकीय पक्षांना मोठ्या देणग्या देतात आणि गैरव्यवहार करायला मोकळ्या होतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही, असेही अभ्यंकर यांनी लक्षात आणून दिले. हक्क्कांसाठी कामगारांनी संघटीत व्हावे, असे त्यांनी नमूद केले. सभेपूर्वी पणजीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यात कामगारांनी घोषणाबाजी केली. शेवटी आझाद मैदानावर सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावर प्रसन्ना उटगी, राजू मंगेशकर, सुहास नाईक व इतर नेतेमंडळी उपस्थित उपस्थित होती.