लॉज इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

निपाणीत हॉटेल गोल्डन स्टारमधील घटना : पोलिसांकडून तपास सुरू निपाणी : लॉजच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना निपाणीत हॉटेल गोल्डन स्टार येथे शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. किरण गणपती भिर्डेकर-कांबळे (वय 46 रा. भीमनगर तिसरी गल्ली ) असे मृत कामगाराचे नाव आहे. सदर मृत्यू संशयास्पद वाटल्याने यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. […]

लॉज इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

निपाणीत हॉटेल गोल्डन स्टारमधील घटना : पोलिसांकडून तपास सुरू
निपाणी : लॉजच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना निपाणीत हॉटेल गोल्डन स्टार येथे शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. किरण गणपती भिर्डेकर-कांबळे (वय 46 रा. भीमनगर तिसरी गल्ली ) असे मृत कामगाराचे नाव आहे. सदर मृत्यू संशयास्पद वाटल्याने यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्गावर महात्मा गांधी रुग्णालयाच्यानजीक हॉटेल गोल्डन स्टार नामक लॉज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरण हा सदर लॉजमध्ये कामास होता. शुक्रवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास लॉजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मंदिरासमोर लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून एक व्यक्ती पडल्याचा आवाज झाला. त्याचवेळी तिथे असलेल्या नागरिकांनी लॉज व्यवस्थापकाला ही माहिती दिली. त्यानुसार व्यवस्थापक व अन्य कामगारांनी तिथे येऊन पाहताच सदर मृतदेह किरण याचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच सीपीआय बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमादेवी, सहाय्यक उपनिरीक्षक एम. जी.मुजावर, हवालदार शेखर असोदे, राजू दिवटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात देण्यात आला. किरण याच्या पश्चात पत्नी आहे. दरम्यान मृत्यू, आत्महत्या की घातपात? हे अद्याप स्पष्ट झाले नसून याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
लॉजमधील तीन युवतींची चौकशी
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी याठिकाणी 3 युवती आढळून आल्या. त्यांची तसेच लॉज व्यवस्थापक संजय माळी याचीही पोलिसांनी चौकशी केली. अन्य एक युवती फरार असून तिचाही पोलीस शोध घेत आहेत. याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र अजूनही याठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली नाही.