हलगा-मच्छे बायपासचे काम सुरूच

जमीन सपाटीकरणामुळे पिकांचे नुकसान : शेतकऱ्यांतून संताप बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पोलीस संरक्षण घेत हे काम करण्यात येत आहे. न्यायालयात स्थगिती असतानाही काम सुरू करण्यात आले असून त्याविरोधात आम्ही पुन्हा न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांवर दडपशाही करत हे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. […]

हलगा-मच्छे बायपासचे काम सुरूच

जमीन सपाटीकरणामुळे पिकांचे नुकसान : शेतकऱ्यांतून संताप
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पोलीस संरक्षण घेत हे काम करण्यात येत आहे. न्यायालयात स्थगिती असतानाही काम सुरू करण्यात आले असून त्याविरोधात आम्ही पुन्हा न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांवर दडपशाही करत हे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. या रस्त्यामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. इतरांनाच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्याला नुकसानभरपाई दिली आहे, त्यांच्या जमिनीतून रस्ता करा. भलत्याच्याच जमिनीतून रस्ता केला जात आहे, असा आरोपही शेतकऱ्यांतून होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अलारवाडपासून युद्धपातळीवर हे काम करण्यात येत असून त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र पोलीस संरक्षण घेत काम केले जात आहे. येळ्ळूर-वडगाव रस्त्यापर्यंत सपाटीकरण केले जात आहे. काही शेतकऱ्यांची पिके होती. त्या पिकांवर जेसीबी फिरविण्यात आला आहे. मातीचा भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही हे काम करण्यात येत आहे. पुन्हा न्यायालयातून कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्थगिती मिळविणारच, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची सुपिक जमीन जात  आहे. त्यामुळे त्या कुटुंबातून हळहळ व्यक्त होत आहे. ज्यांची जमीन गेली नाही त्या शेतकऱ्यांनी पैसे घेतले आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल करा, अशी मागणीही इतर शेतकऱ्यांतून होत आहे.