विंडीजची मालिकेत विजयी आघाडी

सामनावीर हिली मॅथ्यूज : 68 धावा व 2 बळी वृत्तसंस्था/ कराची पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे सोमवारी झालेल्या सामन्यात विंडीजच्या महिला क्रिकेट संघाने यजमान पाक महिला संघाचा केवळ 2 धावांनी पराभव करत 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या तिसऱ्या सामन्यात विंडीजच्या हिली मॅथ्यूजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या तिसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून […]

विंडीजची मालिकेत विजयी आघाडी

सामनावीर हिली मॅथ्यूज : 68 धावा व 2 बळी
वृत्तसंस्था/ कराची
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे सोमवारी झालेल्या सामन्यात विंडीजच्या महिला क्रिकेट संघाने यजमान पाक महिला संघाचा केवळ 2 धावांनी पराभव करत 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या तिसऱ्या सामन्यात विंडीजच्या हिली मॅथ्यूजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या तिसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 5 बाद 132 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 20 षटकात 8 बाद 130 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ 2 धावांनी गमवावा लागला. सध्या विंडीजचा महिला क्रिकेट संघ पाकच्या दौऱ्यावर 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे.
विंडीजच्या डावामध्ये सलामीची फलंदाज आणि कर्णधार हिली मॅथ्यूजने 49 चेंडूत 10 चौकारांसह 68, कॅम्पबेलने 38 चेंडूत 31, नेशनने 13 चेंडूत 10, हेन्रीने 10 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 11 धावा केल्या. विंडीजला 10 अवांतर धावा मिळाल्या. पाकने अचूक गोलंदाजी करून विंडीजला फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळविले. विंडीजच्या डावामध्ये केवळ 11 चौकार नोंदविले गेले. मॅथ्यूज आणि कॅम्पबेल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी केली. पाकतर्फे फातिमा सनाने 2 धावांत 2 तर तुबा हसन आणि कर्णधार निदा दार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये सिद्रा अमीनने 58 चेंडूत 7 चौकारांसह 63 धावा जमविताना जाफर समवेत सलामीच्या गड्यासाठी 9 षटकात 64 धावांची भागिदारी केली. जाफरने 22 चेंडूत 1 चौकारांसह 19 धावा जमविल्या. मुनीबा अल्लीने 13 चेंडूत 12, निदा दादने 11 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. विंडीजच्या गोलंदाजांनी पाकची तळाची फळी झटपट गुंडाळली. पाकच्या डावात 12 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे हिली मॅथ्यूज व फ्लेचर यांनी प्रत्येकी 2 तर कॉनेल आणि अॅलेनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकचे 2 फलंदाज धावचीत झाले.
संक्षिप्त धावफलक – विंडीज 20 षटकात 5 बाद 132 (हिली मॅथ्यूज 68, कॅम्पबेल 31, नेशन 10, हेन्री नाबाद 11, अवांतर 10, फातिमा सना 2-22, तुबा हसन, निदा दार प्रत्येकी 1 बळी), पाक 20 षटकात 8 बाद 130 (सिद्रा अमीन 63, आवेशा जाफर 19, मुनिबा अली 12, निदा दार 17, अवांतर 9, मॅथ्यूज 2-22, फ्लेचर 2-20, कॉनेल 1-26, अॅलेनी 1-18).