विंडीजला पहिल्या डावात 41 धावांची आघाडी, हॉजचे शतक

डिसिल्वाचे नाबाद अर्धशतक, वोक्सचे 4 बळी वृत्तसंस्था/नॉटींगहॅम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत यजमान इंग्लंडने दुसऱ्या डावात 1 बाद 116 धावा जमवित विंडीजवर 75 धावांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी विंडीजने पहिल्या डावात 457 धावा जमवित इंग्लंडवर 41 धावांची बढत मिळविली होती. विंडीज संघातील हॉजने शानदार शतक (120) तर डिसिल्वाने नाबाद अर्धशतक […]

विंडीजला पहिल्या डावात 41 धावांची आघाडी, हॉजचे शतक

डिसिल्वाचे नाबाद अर्धशतक, वोक्सचे 4 बळी
वृत्तसंस्था/नॉटींगहॅम
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत यजमान इंग्लंडने दुसऱ्या डावात 1 बाद 116 धावा जमवित विंडीजवर 75 धावांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी विंडीजने पहिल्या डावात 457 धावा जमवित इंग्लंडवर 41 धावांची बढत मिळविली होती. विंडीज संघातील हॉजने शानदार शतक (120) तर डिसिल्वाने नाबाद अर्धशतक (82) झळकविले. इंग्लंडतर्फे वोक्सने 4 बळी तर अॅटकिनसन, शोयब बशीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिल्या सामन्यात विंडीजचा डावाने मोठा पराभव करून आघाडी घेतली. त्यानंतर नॉटींगहॅमच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर उभा केला. पण विंडीजने इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले. विंडीजने 5 बाद 351 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 5 गडी 106 धावांची भर घालत तंबूत परतले. विंडीजच्या पहिल्या डावात 457 धावा झाल्या. हॉजने 19 चौकारांसह 120, अथांझेने 1 षटकार आणि 10 चौकारांसह 82, डिसिल्वाने 3 षटकार आणि 10 चौकारांसह 82, शमार जोसेफने 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 33, लुईसने 2 चौकारांसह 21, होल्डरने 4 चौकारांसह 27, कर्णधार ब्रेथवेटने 8 चौकारांसह 48 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे वोक्सने 84 धावात 4, अॅटकीनसन व शोयब बशीर यांनी प्रत्येकी 2 तसेच स्टोक्स व वूड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजचा पहिला डाव शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी उपहारावेळी संपुष्टात आला.
41 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकात सलामीचा क्रॉले 3 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर डकेट व पॉप यांनी चहापानापर्यंत संघाची पडझड होऊ दिली नाही. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 108 धावांची भागिदारी केली. डकेट 68 चेंडूत 9 चौकारांसह 61 तर पॉप 62 चेंडूत 6 चौकारांसह 48 धावावर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 88.3 षटकात सर्वबाद 416,
विंडीज प. डाव 111.5 षटकात सर्वबाद 457 (ब्रेथवेट 48, लुईस 21, अथांझे 82, हॉज 120, होल्डर 27, डिसिल्वा 82, शमार जोसेफ 33, अवांतर 19, वोक्स 4-84, अॅटकिनसन 2-107, शोयब बशीर 2-108, वूड 1-71, स्टोक्स 1-61), इंग्लंड दु. डाव चहापानापर्यंत 22 षटकात 1 बाद 116 (डकेट खेळत आहे 61, पॉप खेळत आहे 48, क्रॉले 3, अवांतर 4).