गवळीवाड्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

भाजप नेते सदानंद पाटील यांच्याकडून गवळीवाड्यातील समस्यांची पाहणी : वीजपुरवठा, रस्त्यांचा अभाव, रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य खानापूर : तालुक्यातील नंदगडजवळील जंगलातील गवळीवाडा हा सर्व मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याने गवळीवाड्यावरील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना जंगलातून शिक्षणासाठी 5 कि. मी. जंगलातून चालत येऊन नंदगड येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. तर अंगणवाडी नसल्याने लहान […]

गवळीवाड्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

भाजप नेते सदानंद पाटील यांच्याकडून गवळीवाड्यातील समस्यांची पाहणी : वीजपुरवठा, रस्त्यांचा अभाव, रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य
खानापूर : तालुक्यातील नंदगडजवळील जंगलातील गवळीवाडा हा सर्व मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याने गवळीवाड्यावरील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना जंगलातून शिक्षणासाठी 5 कि. मी. जंगलातून चालत येऊन नंदगड येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. तर अंगणवाडी नसल्याने लहान बालकांना सरकारी योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सदानंद पाटील यांनी जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर यांच्यासमवेत गवळीवाड्याला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली आणि गवळीवाड्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
बसची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची जंगलातून पायपीट
नंदगडपासून 5 कि. मी. वर तट्टेश्वर मंदिराच्या पायथ्याशी गवळीवाडा वसाहत आहे. या ठिकाणी गवळी लोकांची 25 घरे आहेत. काही वर्षापूर्वी या गवळी लोकांनी स्वत: जमीन खरेदी करून आपली वसाहत वसविली आहे. यापूर्वी ही गवळी वसाहत घनदाट जंगलात होती. या लोकांचा जनावरे पाळणे हाच मुख्य व्यवसाय आहे. या गवळीवाड्यावर 25 मुले असून ही मुले नंदगड येथील आनंदगड तसेच जेसीएस शाळेत शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी बसची सुविधा नसल्याने हे विद्यार्थी जंगलातून पाच कि. मी. चालत येऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना धोकादायक रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे.
अंगणवाडी नसल्याने थेट पहिलीच्या वर्गात प्रवेश
पावसात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होत असून काही ठिकाणी पाणीही असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पायी प्रवास करावा लागत आहे. तसेच गवळीवाड्यावर शून्य वयापासून ते सहा वर्षापर्यंत दहा बालके असून या ठिकाणी अंगणवाडीची सोय नसल्याने त्यांना पौष्टीक आहार तसेच इतर शासकीय योजनांपासून मुकावे लागत आहे. तसेच थेट पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यात येतो. यामुळे या लहान बालकांचेही कुपोषण होत आहे. तसेच गवळीवाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने गवळीवाड्यावरील लोकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सोलारवरून वीजपुरवठा : मोलमजुरीवर उपजिविका
गवळीवाड्यावर वीजपुरवठा नसल्याने जीवन जगणे कठीण बनले आहे. शासनाने रॉकेल पुरवठाही बंद केल्याने रात्री अंधारातच जीवन कंठावे लागत आहे. या ठिकाणी शासनाने सोलार पॅनल बसविले आहेत. मात्र अद्याप या सोलारमधून वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. तसेच पाण्याची सोय नसल्याने गवळी लोकांनी स्वत:च्याच खर्चानी कूपनलिका खोदून यावर हातपंप बसविला आहे. हे गवळी लोक आपल्या उपजीविकेसाठी जनावरे पाळत असून इतरांच्या शेतात मोलमजुरी करून आपली उपजिविका करत आहेत. या संपूर्ण गवळीवाड्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. याबाबतची माहिती जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लैला शुगर्सचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांना दिली. सदानंद पाटील यांनी या गवळीवाड्याची सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करून गवळीवाड्यावरील समस्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक क्रम घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्रकार तसेच शंकर पाटील, सदानंद पाटील, संजय कारलगेकर व इतर सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते.