मस्क गुजरातमध्ये प्लांट सुरू करणार?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क भारतामध्ये कार निर्मिती कारखाना सुरू करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात या महिन्यामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. अमेरिकेतील टेस्ला कंपनीला भारत सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांची आयात करण्यासोबतच दोन वर्षात निर्मिती प्लांट स्थापित करण्यासाठी परवानगी देईल असे म्हटले जात आहे. उद्योगपती एलॉन […]

मस्क गुजरातमध्ये प्लांट सुरू करणार?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क भारतामध्ये कार निर्मिती कारखाना सुरू करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात या महिन्यामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सांगितली जात आहे.
अमेरिकेतील टेस्ला कंपनीला भारत सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांची आयात करण्यासोबतच दोन वर्षात निर्मिती प्लांट स्थापित करण्यासाठी परवानगी देईल असे म्हटले जात आहे. उद्योगपती एलॉन मस्क यांना गुजरात हे राज्य पसंत पडले असून त्याच ठिकाणी मस्क यांना आपला कारखाना उभारायचा आहे.
कुठे होणार कारखाना
गुजरात राज्यामध्ये साणंद, ढोलेरा आणि बेचराजी या ठिकाणी टेस्ला कंपनीचा कारखाना होईल असेही म्हटले जात आहे. सदरच्या नव्या कारखान्यामधून देशांतर्गत आणि निर्यातीच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्सची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. टेस्ला भारतामध्ये कारखाना सुरू करणार असे गेल्या कित्येक महिन्यांपासून ऐकायला मिळत होते.
अट मान्य होणार
सरकारने नियमावलीप्रमाणे टेस्लाला अटी मान्य करण्याबाबत सांगितले होते. यासंदर्भात सरकारने नियमावलीत सवलत देण्याची शक्यताही वर्तवली आहे. टेस्ला कंपनी पूर्णपणे तयार झालेल्या कार्सच्या आयातीवर 15 ते 20 टक्के आयात करात सवलत मागते आहे. या सवलतीची मागणी भारताकडून मान्य होण्याची  दाट शक्यता दिसून येते आहे.
भारतात येणार मस्क
दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क हे या वर्षी भारत भेटीवर येणार आहेत असे त्यांनी मध्यंतरी म्हटले होते. नव्या कारखान्याच्या शुभारंभप्रसंगी त्यांचे आगमन होण्याचेही बोलले जात आहे. त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे भारतामध्ये निर्मिती कारखान्यासाठी 16000 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीकडून केली जाणार आहे. या अंतर्गत टेस्ला कंपनी भारताकडून 1.2 लाख कोटी रुपयांचे वाहनांचे सुटे भाग खरेदी करण्याची योजना करत आहे.