बजेटमधून मोदी झळाळी आणणार काय?
नुकत्याच झालेल्या सात राज्यातील विधानसभेच्या 13 पोटनिवडणूकांत भाजपचे बारा वाजले. पूर्णपणे जोर लावूनदेखील अवघ्या दोन जागा सत्ताधारी पक्षाला मिळाल्या. लोकसभेत बहुमत मिळवू न शकलेल्या भाजपला हा लागोपाठ दुसऱ्या महिन्यात दुसरा झटका होय. आता केवळ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने केवळ अयोध्याच नाही तर तिने बद्रीनाथदेखील जिंकलेले आहे. दुसरीकडे पक्षाचा गड असलेल्या उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध बेबनाव सुरु झालेला आहे. भाजपमध्ये सुरु झालेल्या या अचानक घडामोडी निश्चितच शुभशकुन नाहीत. एका अजब परिस्थितीतून भाजप जात आहे. अनपेक्षितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रँड कमकुवत झाला आहे. गमतीची गोष्ट अशी की मोदी यांचे ‘एक्स’ या समाज माध्यमावर विक्रमी दहा कोटी अनुयायी झाले आहेत. जगातील नेत्यात अशा प्रकारे त्यांचा ‘नंबर एक’ क्रमांक लागला आहे. पण जमिनीवरच्या राजकारणात भाजपची निश्चित पिछेहाट सुरु झाली आहे. समाज माध्यमावर ‘राहुल गांधी’ सर्वात जास्त ‘सर्च’ होत आहे. कालचा ‘पप्पू’ आज नेता बनलेला आहे. लोकसभा निवडणूकीनंतरदेखील लोकांचा भाजपबाबतचा खराब मूड बदललेला नाही. तो बदलण्यासाठी मोदी किती गंभीर आहेत अथवा कसे याचे प्रतिबिंब अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सादर करत असलेल्या 2024-25च्या अर्थ संकल्पातून दिसणार आहे. बजेटमधून मोदी झळाळी आणणार काय? हा कळीचा प्रश्न आहे. या अर्थसंकल्पात मोदी जादूची कांडी फिरवून विविध घटकांना परत आकर्षित करण्याचा डाव खेळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. ‘खुल जा सिम सिम’ प्रमाणे अलिबाबाची गुहा जशी उघडली जायची तसा कोणता मंत्र मोदी उच्चारणार व गरिबी, बेरोजगारी आणि विषमता कमी करण्यासाठी पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर या चार राज्यांच्या निवडणूका लवकरच होत आहेत. त्यापैकी किमान दोन राज्ये तरी भाजपला जिंकणे आवश्यक आहे. नाहीतर काही खरे नाही. बाका प्रसंग आहे.
‘मोदी की गॅरंटी’ चे लोकांनी वाभाडे काढलेले आहे. गैरभाजप सरकारांनी सादर केलेल्या व लोकांमध्ये प्रिय झालेल्या योजनांना मोदी यांनी ‘रेवडी’ म्हणून हिणवले होते. आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असेच जणू निवडणुकीतील हे निकाल सत्ताधाऱ्यांना सांगत आहेत. भाजपबरोबर एकनिष्ठ राहून त्याला साथ देणाऱ्या मध्यमवर्गाला आतातरी मोदी आपल्याला काहीतरी देतील अशी अपेक्षा आहे. सेवानिवृत्त मंडळींचादेखील ब्रँड मोदी बनवण्यात मोठा सहभाग आहे. त्यांच्या हाती निराशाच आलेली आहे. पाच वर्षात दुप्पट उत्पन्न करून देण्याचे वचन मोदींनी शेतकरी वर्गाला दिले होते. तो देखीलफसवला गेलो असे मानत आहे. अग्निविरमुळे युवा खुश नाही. ‘अंबानी-अदानी
शिवाय कोणीच खुश नाही’ असे शालजोडीतील मारले जात आहेत. राजकारण हे नेहमी बदलत राहते. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे भाजपला दणका बसला आहे त्याने पक्षाची नैया डुबू लागली आहे अशी भीती निर्माण झाली आहे.
भाजपमधील असंतुष्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी तर साक्षात पंतप्रधानांवर पोटनिवडणूक निकालानंतर निशाणा साधला आहे. जर भाजपला टायटॅनिक जहाजाप्रमाणे जलसमाधी घ्यायची असेल तर त्याकरता मोदी अतिशय उपयुक्त आहेत अशी बोचरी टीका त्यांनी केलेली आहे. गेल्या दोन वर्षात युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल आयात करून जवळजवळ 90,000 कोटी रुपये वाचवले पण त्यातील एक दमडा देखील सामान्य नागरिकाला तेलाचे भाव कमी करून दिला गेलेला नाही.
अजूनही चढ्या भावातच तेल खरेदी करणे त्याला भाग पडत आहे अशी वाढती टीका भाजपाला झेलावी लागत आहे. ‘आम आदमी को क्या मिला?’ असे या टीकेचे स्वरूप आहे. महागाई भयंकर वाढत आहे अशा तक्रारी वाढत असताना जून महिन्यात व्होलसेल प्राइस इंडेक्स 3.6 टक्के वाढून पंधरा महिन्यात त्याने उच्चांक गाठला ही काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. वस्तू आणि सेवा कर हा ‘गब्बर सिंग टॅक्स’ झालेला आहे ही विरोधकांची टीका दिवसेंदिवस खरी वाटू लागली आहे. या टॅक्सखाली गरीबच भरडला जात आहे. पंतप्रधान असा दावा करत आहेत की गेल्या 4-5 वर्षात अभूतपूर्व रोजगार
निर्माण झाला आहे. हा सारा प्रकार म्हणजे ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’
अशा प्रकारचा तर नाही ना ही शंका यायला वाव आहे. गेल्याच आठवड्यात
गुजरातच्या भरुचमध्ये केवळ 11 जागांच्या भरतीसाठी शेकडो तरुण आले आणि
त्यामुळे जणू चेंगराचेंगरी झाली असे चित्र वृत्तवाहिन्यांनी दाखवले. मुंबई विमानतळावर भरतीसाठी हजारो तरुणांनी उडवलेली झुंबड काय दाखवते? एकेकाळी भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार राहिलेले एक युवा भाजपाईनी
तरुणांना आपलेसे करून घेणारा कोणता कार्यक्रमच भाजपकडे नाही आणि त्यामुळे
18 ते 25 या वयोगटातील तरुणांना केवळ राहुल गांधी हेच नेता वाटत आहेत असं जाहीर भाष्य करून सत्ताधारी पक्षातील खदखद दाखवलेली आहे. मोदींना
मानणाऱ्या तरुणाईची कमी नाही पण ‘इव्हेंट मॅनॅजमेण्ट’ च्या धर्तीवर
चाललेल्या भाजपला त्यांना नीट मार्गावर वळवता येत नसल्याने त्यांच्यात
भ्रमनिरास होत आहे असे या युवा भाजपाईने स्पष्ट केले आहे. काही
वर्षांपूर्वी टीव्हीवरील चर्चेत भाजपची बाजू हिरीरीने मांडणारा हा युवा
नेता कुठेतरी काहीतरी फार मोठं चुकत आहे असे पोटतिडिकीने सुचवत आहे.
जादूची कांडी फिरवली आणि सगळे काही ठिक झाले हे केवळ परिकथेत होत असते. आजकालच्या अस्थिर राजकारणात भाजपला वारंवार धक्के बसायला जी सुरुवात झालेली आहे त्यातून वेळीच बोध घेतला तरंच जगन्नाथाचा हा रथ चालू शकेल. सत्ताधारी रालोआच्या एका छोटेखानी पक्षाच्या अपना दलाच्या एकमेव खासदार असलेल्या केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी ‘केंद्रातील सरकार हे
आघाडीचे सरकार आहे मोदी सरकार नव्हे’ अशी जाहीर वाच्यता करून भाजपने
मित्रपक्षांशी बऱ्यापैकी वागावे असेच जणू सूचित केलेले आहे.
या पोटनिवडणूकांनी एकीकडे ममता बॅनर्जींना बंगालमध्ये जास्त स्थिर केले
तर हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसने त्याचे सरकार उलथवण्याचे मनसुबे
केवळ उधळवले एवढेच नव्हे तर त्याला आक्रमक बनवले. उत्तराखंडमध्ये भाजपची
रणनीती पूर्णपणे फसली आणि काँग्रेसचे दोन आमदार निवडून आल्याने तेथील
भाजपाईच बंडखोर होऊ लागले आहेत.
हिंदूंचे सर्वात मोठे गुरु मानले जाणारे साक्षात शंकराचार्यदेखील सरकार विरुद्ध आक्रमक झालेले आहेत. केदारनाथ धाममधून 228 किलो सोन्याची झालेली चोरी काही सामान्य गोष्ट नाही तिचा छडा का लावला गेला नाही. या घोटाळ्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद सरस्वती यांनी विचारून भाजपची पाचावर धारण केलेली आहे.
उत्तर प्रदेशात कावड यात्रा दरम्यान योगी सरकारने जे मुस्लिमविरोधी वादग्रस्त पाऊल उचलले आहे त्यावर तीन मित्र पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. केंद्राने नुकतेच जम्मू आणि काश्मीरमध्ये नायब राज्यपालाला एव्हढे जास्त
अधिकार दिले आहेत त्यातून भाजप तेथील संभाव्य निवडणुकांमध्ये आपल्याला कितपत यश मिळेल याबाबत साशंक आहे असा संदेश गेलेला आहे. स्थानिक राजकारणात भाजपचे बाहुले समजले जाणारे गुलाम नबी आझाद यांनादेखील या घटनेने व्यथित केले आहे हे विशेष.
तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून एक महिना उलटला तरी कोणत्याच क्षेत्रात या नवीन सरकारला अजून छाप सोडता आलेली नाही. उलट एकामागून एक भलत्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षात या सरकारने केवळ घोषणाबाजीशिवाय केले तरी काय असे विरोधक विचारू लागले आहेत. लोकांना बऱ्याच शंका येऊ लागल्या आहेत. आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी सरकारला कसे लोळवायचे याची रणनीती बांधली आहे. सरकारला सळो की पळो करण्यासाठी ते सिद्ध झालेले आहेत. या अर्थसंकल्पाद्वारे मोदींच्या कसोटीची घडी जवळ आलेली आहे.
सुनील गाताडे
Home महत्वाची बातमी बजेटमधून मोदी झळाळी आणणार काय?
बजेटमधून मोदी झळाळी आणणार काय?
नुकत्याच झालेल्या सात राज्यातील विधानसभेच्या 13 पोटनिवडणूकांत भाजपचे बारा वाजले. पूर्णपणे जोर लावूनदेखील अवघ्या दोन जागा सत्ताधारी पक्षाला मिळाल्या. लोकसभेत बहुमत मिळवू न शकलेल्या भाजपला हा लागोपाठ दुसऱ्या महिन्यात दुसरा झटका होय. आता केवळ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने केवळ अयोध्याच नाही तर तिने बद्रीनाथदेखील जिंकलेले आहे. दुसरीकडे पक्षाचा गड असलेल्या उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध बेबनाव सुरु झालेला आहे. भाजपमध्ये सुरु झालेल्या […]