रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत दुसरा टी-20 वर्ल्डकप जिंकेल का?

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत दुसरा टी-20 वर्ल्डकप जिंकेल का?

अखेर आज टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जातो आहे.अमेरिकेतल्या आव्हानात्मक खेळपट्ट्या, खराब हवामान, साखळी सामन्यांमध्ये तुलनेने दुबळ्या संघांनी दिलेली आव्हानं आणि उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी सुपर-8 मध्ये झालेल्या रोमहर्षक स्पर्धेवर मात करून दक्षिण आफ्रिका आणि भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

 

अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही पराभव बघितला नाही. 2007 ते 2022पर्यंत झालेल्या एकाही टी20 विश्वचषकात असं घडलं नव्हतं.

 

एवढंच नाही तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातला पहिला असा खेळाडू बनेल, जो पहिल्या आणि नवव्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सहभागी होईल.

 

पण रोहित शर्मा एवढ्यावरच समाधान मानणार नाही.

 

भारतीय संघातील ‘पाच पांडव’

2007चा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करत होता. एक तरुण खेळाडू म्हणून रोहित शर्माने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

 

2007च्या भारतीय संघात एकही मोठा खेळाडू नसताना धोनीने ज्या पद्धतीने भारताला विश्वचषक मिळवून दिला होता ते अविश्वसनीय होतं आणि तरुण रोहितने धोनीला ही कामगिरी करताना जवळून बघितलं होतं.

 

आता 37 वर्षांचा असणाऱ्या रोहित शर्मासाठी कदाचित हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताच्या क्रिकेट इतिहासातील यशस्वी कर्णधारांच्या यादीत स्वतःच नाव समाविष्ट करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल

रोहितच्या संघात विराट कोहली, जसप्रीत बुमराह पासून टी20 प्रकारात यशस्वी ठरलेल्या सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव सारख्या खेळाडूंची तगडी फौज आहे.

 

या संघात एका बाजूला हार्दिक पंड्याच्या रूपात एक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे तर दुसरीकडे त्याच्या सोबतीला रवींद्र जडेजासारखा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडूही आहे.

 

जडेजा, रोहित आणि कोहलीची सुरुवात जवळपास एकत्रच झाली होती आणि आता क्रिकेट करियरच्या शेवटच्या टप्प्यातही हे खेळाडू मैदानात खांद्याला खांदा लावून लढत आहेत.

 

कोहली आणि जडेजा यांच्यात एक साम्य असंही आहे की या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी एकदाही टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळलेला नाही. तर जडेजा आणि रोहित यांच्यातील साम्य असं आहे की या दोघांनीही कधीच एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकलेला नाही.

आज (29 जून)ला बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानात जर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक जिंकू शकला तर आधुनिक भारतीय क्रिकेटमधल्या पाच पांडवांसाठी (कोहली-रोहित-जडेजा-बुमराह-पंड्या) त्यांचं नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर करण्याची ही पहिली आणि शेवटची संधी देखील ठरू शकते.

 

या स्पर्धेचा विचार केला तर विराट आणि जडेजाला या स्पर्धेत फारशी कमाल करता आलेली नाही. बहुतांश सामन्यांमध्ये विराटची बॅट शांतच होती आणि जडेजालाही काही विशेष करता आलेलं नसलं तरी क्रिकेट जाणणारा एकही माणूस असं म्हणणार नाही की अंतिम सामन्यात हे दोन्ही खेळाडू काहीच करू शकणार नाहीत.

 

या दोन्ही खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीचा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की त्यांच्यावर टीका होते तेंव्हाच हे दोघेही उसळी मारून वर येतात. तसेच मोक्याच्या क्षणी आणि मोठ्या सामन्यांमध्ये विराट आणि जडेजाला कमाल करून दाखवण्याची सवय आहे.

अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर कोणता संभ्रम आहे?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघातील अंतिम अकरा जणांची निवड करताना काहीसा संभ्रम मात्र नक्कीच असणार आहे. हे खरं आहे की, ज्या संघाने याआधी सामने जिंकले आहेत त्या संघात बदल करण्याची इच्छा टीम इंडियामध्ये दिसून आलेली नाही.

 

आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारा फलंदाज म्हणून नाव कमावलेल्या शिवम दुबेला त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाहीये.

 

अशा परिस्थितीत संजू सॅमसनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे.

पण संजू सॅमसनला संघात घेतल्याने एक डावखुरा फलंदाज कमी होऊ शकतो, गोलंदाजीत फारसा फरक पडणार नाही कारण या स्पर्धेत शिवम दुबेने फक्त एकच ओव्हर टाकली आहे.

 

त्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघातल्या फलंदाजांनी दुबेची चांगलीच धुलाई केली त्यामुळे रोहित शर्माने पुन्हा एकदा चेंडू शिवमच्या हाती देण्याची हिंमत दाखवली नाही.

 

शेवटी प्रश्न तोच आहे की रोहित शर्मा महेंद्रसिंह धोनी सारखा धाडसी निर्णय घेऊ शकेल की नाही? कारण 2007च्या अंतिम सामन्यापूर्वी धोनीने वीरेंद्र सेहवागच्या जागी तरुण आणि आक्रमक युसूफ पठाणला सलामीला पाठवलं होतं. आता असा निर्णय रोहित घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

विराट सलामीला उतरणार की बदल होणार? सस्पेन्स कायम

दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर परत आणण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा तर बनवणार नाही ना?

 

हे खरे आहे की स्पर्धेच्या सुरुवातीलाच रोहित शर्माने असं सांगितलं होतं की सलामीची जोडी सोडली तर कोणताही फलंदाज कुठेही खेळायला तयार आहे.

 

त्यामुळे आता एवढ्या महत्त्वाच्या आणि अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड विराटला त्याच्या पारंपरिक जागेवर फलंदाजीला पाठवू शकतील का? हेही बघावं लागणार आहे.

 

तिसऱ्या क्रमांकावर असाधारण फलंदाजीचा इतिहास असलेला विराट कोहली जर तिसऱ्या क्रमांकावर उतरला तर कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी नियमित सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या जागी यष्टीरक्षक ऋषभ पंत सलामीला उतरू शकतो.

विश्वचषकाच्या आणि ऋषभ पंत भारतासाठी पाचव्या क्रमांकावर खेळत होता पण या स्पर्धेत त्याने अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे.

 

ऋषभ डावखुरा फलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये डावाची सुरुवात करण्याचा अनुभव आहे त्यामुळे अंतिम सामन्यात भारताकडून सलामीला उतरणं त्याच्यासाठी तेवढं अवघड असणार नाही.

 

भारतीय संघाच्या गोलंदाजीत बदल होईल का?

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाजीसमोर असणारा कमकुवतपणा पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाकडून लेग स्पिनर युझवेंद्र चहलला संधी देण्याचा विचार होऊ शकतो का?

 

युझवेंद्र चहलला खेळवण्याची इच्छा आकर्षक वाटू शकते पण हा निर्णय मांजराच्या गळ्यात घंटी बांधण्यासारखाही ठरू शकतो. जडेजाला संघातून वगळण्याचा विचारही होऊ शकतो का?

 

हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या दोनच वेगवान गोलंदाजांना खेळवण्याचा विचार होऊ शकतो का? या विश्वचषकात भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असलेल्या आणि डावखुऱ्या गोलंदाजीने भारतीय गोलंदाजीला विविधता प्रदान करणाऱ्या अर्शदीप सिंगला संघातून वगळण्याचं धाडस केलं जाऊ शकतं का? कदाचित असं होणार नाही

या सामन्याच्या निकालात हवामान आणि खेळपट्टी पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

 

बार्बाडोसच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा चेंडू गयानासारखा वळणार नाही आणि त्रिनिदादसारखा चेंडू असमान उसळणारही नाही. अंतिम सामन्यासाठी फलंदाजीला पोषक खेळपट्टी बनवली जाण्याची शक्यता आहे.

 

जर अँटिग्वाच्या खेळपट्टीसारखी ही खेळपट्टी असेल तर आयपीएल सामन्यांचा थरार इथे अनुभवता येऊ शकतो. अशा खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडू शकतात.

 

जय शहा यांची भविष्यवाणी

आता शेवटी दबक्या आवाजात सुरु असलेली एक चर्चा सांगतो आणि ती चर्चा अशी की मागच्या एक दशकापासून भारतीय संघाला निर्णायक सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची मालिका किमान आजतरी खंडित होईल का?

 

क्रिकेटमध्ये चोकर्सचा शिक्का बसलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ, इतिहासाला मागे टाकून नवा इतिहास घडवू शकेल का? हे सांगणं खूपच कठीण आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी काही महिन्यांपूर्वी केलेलं भाकीत हा निव्वळ योगायोग ठरू शकतो.

 

जय शहा म्हणाले होते की, 29 जून रोजी रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी विश्वचषक जिंकतील आणि ते बार्बाडोसच्या व्हीव्हीआयपी बॉक्समधून भारतीय संघाचं प्रोत्साहन करताना दिसून येतील.

 

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 

 

Go to Source