योगाबरोबर भरड धान्याचा प्रसार

उद्या राज्यभरात होणार योगदिवस : बाराही तालुक्यांत होणार आयोजन,सरकार भरड धान्याचा करणार प्रसार,माध्यान्ह आहारात भरड धान्याचा वापर पणजी : राज्यातील सर्व विद्यालयांमध्ये योग शिकविण्याची तयारी सरकारने चालवली आहे. तसा प्रस्ताव शाळांकडून आल्यास योग प्रशिक्षकाची व्यवस्था सरकारकडून केली जाईल. यंदाही राज्यात 21 जून रोजी एकाचवेळी योगदिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त भरडधान्याचा प्रचार सरकारकडून केला जाणार […]

योगाबरोबर भरड धान्याचा प्रसार

उद्या राज्यभरात होणार योगदिवस : बाराही तालुक्यांत होणार आयोजन,सरकार भरड धान्याचा करणार प्रसार,माध्यान्ह आहारात भरड धान्याचा वापर
पणजी : राज्यातील सर्व विद्यालयांमध्ये योग शिकविण्याची तयारी सरकारने चालवली आहे. तसा प्रस्ताव शाळांकडून आल्यास योग प्रशिक्षकाची व्यवस्था सरकारकडून केली जाईल. यंदाही राज्यात 21 जून रोजी एकाचवेळी योगदिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त भरडधान्याचा प्रचार सरकारकडून केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी मंत्रालयात योगदिनाच्या आयोजनासंबंधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, विविध खात्यांचे संचालक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, यावर्षी योगदिनाचे आयोजन राज्यात मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे. बाराही तालुक्यांत एकाचवेळी योगदिनाचे कार्यक्रम केंद्रीय आयुष खाते व राज्याचे क्रीडा खात्यामार्फत घेण्यात येतील. 21 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता ताळगावच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर मुख्य कार्यक्रम घेण्यात येईल. मुख्यमंत्री व इतर महनीय व्यक्ती उपस्थित राहतील. तालुक्यांत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना आमदार व मंत्री हे स्वत: हजर असतील. राज्यातील विविध विद्यालये, सामाजिक संस्था, पतंजली योग समिती तसेच कुंडई तपोभूमी यांचाही योगदिनासाठी सहभाग लाभणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यालयात विद्यार्थ्यांना योग शिकविण्याची सरकारची तयारी आहे. योगासनाचा एक तास घेण्यास कोणतीच हरकत नाही. योग शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. सध्या राज्यात 250 ते 300 ठिकाणी योग क्लासेस घेण्यात येत आहेत. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना योग शिकविण्यासाठी करून घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
निरोगी जीवनासाठी भरडधान्याचा प्रसार
राज्यातील जनतेला निरोगी आयुष्य लाभावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून भरडधान्याचा प्रसार सरकारमार्फत केला जाणार आहे. योगदिनाच्या निमित्ताने भरडधान्याचे प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वरी (वरीचे तांदुळ) याचाही समावेश असेल. शाळांतील मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारात भरडधान्याचा समावेश केला जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.