खाणबंदीचे कारस्थान कोणी रचले?

विरियातो यांच्या आरोपाला ‘इंडिया’ नेच उत्तर द्यावे : समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे आव्हान पणजी : राज्यातील खाणी बंद करण्यासाठी माजी मंत्री ज्योकीम आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांनी पर्यावरणप्रेमी क्लॉऊड आल्वारिस यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी पुढे काढले, या काँग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या आरोपाला आता इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीच उत्तर द्यावे, […]

खाणबंदीचे कारस्थान कोणी रचले?

विरियातो यांच्या आरोपाला ‘इंडिया’ नेच उत्तर द्यावे : समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे आव्हान
पणजी : राज्यातील खाणी बंद करण्यासाठी माजी मंत्री ज्योकीम आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांनी पर्यावरणप्रेमी क्लॉऊड आल्वारिस यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी पुढे काढले, या काँग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या आरोपाला आता इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीच उत्तर द्यावे, असे आव्हान समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले. काल रविवारी भाजपच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फळदेसाई बोलत होते. यावेळी प्रवक्ता गिरीराज पै वेर्णेकर, भाजप महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती बांदोडकर उपस्थित होत्या.
आरोप खरे मानावेत काय?
मंत्री फळदेसाई म्हणाले, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या आरोपांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये खाणी बंद करण्यासाठी रचलेल्या कारस्थानाबाबत आरोप करण्यात आलेले आहेत. याविषयी इंडिया आघाडीतील घटक असलेले गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनीही अजून उत्तर दिलेले नाही. त्यामुळे विरियातो यांनी केलेले आरोप आम्ही खरे मानावेत का? असा सवालही फळदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
सरदेसाई यांचेही स्पष्टीकरण नाही
कॅप्टन विरियातो यांनी केलेल्या आरोपांची ऑडियो क्लीप मंत्री फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत वाजवून दाखवली. विरियातो यांनीही या ऑडियो क्लिपमधील आवाज आपला नसल्याचे स्पष्ट केलेले नाही. कटकारस्थानासाठी ज्यांच्या घरी बैठक झाली असा आरोप करण्यात आलेला आहे, ते गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनीही अजून याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे विरियातो यांचे आरोप खरे आहेत, असे मानतो आणि याला इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही फळदेसाई यांनी केली. आरती बांदोडकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्कोतील सभेत गोमंतकीयांची मने जिंकलेली आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच 50 हजार लोकांची उपस्थिती भाजपच्या विजयाची साक्ष देते. पंतप्रधान मोदी यांनी झुवारी नदीच्या नवीन पुलापासून ते मोपा व दाबोळी विमानतळापर्यंतच्या सर्व गोष्टींचा उल्लेख सभेत केला आहे. कोविडसारख्या संकट काळात पर्यटनस्थळ म्हणून गोव्याला प्राधान्यक्रमाने लस उपलब्ध केल्याचे आवर्जून सांगितले. यातूनच गोमंतकीयांच्या रक्षणाची साक्ष मोदींच्या वक्तव्यांवरून येते, असेही त्या म्हणाल्या.
मोदींच्या सभेने काँग्रेस भयभीत : वेर्णेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वास्कोतील सभेला सुमारे 50 हजार लोकांची उपस्थिती पाहून काँग्रेस भयभीत झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी हे गोव्यात केवळ पर्यटनासाठी येतात, असा आरोप भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी गोव्यात आले नाहीत आणि आता निवडणुकीच्या प्रचारालाही येत नाही, याबाबत उत्तर द्यावे, असे आव्हान वेर्णेकर यांनी पाटकर यांना दिले. विरियातो यांनी ऑडियो क्लीपमध्ये केलेल्या आरोपानुसार, माजी मंत्री ज्योकीम आलेमाव, आमदार विजय सरदेसाई यांनीच पर्यावरणप्रेमी क्लॉऊड आल्वारिस यांना त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी पुढे काढले आणि खाणबंदीचा आदेश न्यायालयाकडून आला, असा आरोपही वेर्णेकर यांनी केला.