बांगलादेशातून घरी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथे काय अनुभव आला?

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरक्षण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे तिथे शिकण्यासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी आता मायदेशी परतत आहेत.

बांगलादेशातून घरी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथे काय अनुभव आला?

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरक्षण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे तिथे शिकण्यासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी आता मायदेशी परतत आहेत.

 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, आतापर्यंत 700 हून अधिक विद्यार्थ्यांना भारत परत आणण्यात आलं आहे. बांगलादेशात अडकलेल्या आणखी भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार बांगलादेशच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करतं आहे.

बांगलादेशात राहणारे अनेक भारतीय भारताच्या सीमेपर्यंत पोहोचत आहेत.

बांगलादेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी भारत सरकारनं आपत्कालीन फोन नंबर देखील सुरू केले आहेत.

शुक्रवारी बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेश सरकारनं देशव्यापी कर्फ्यू लावला होता. हा कर्फ्यू रविवारी सकाळपर्यंत लागू राहणार आहे. तिथे इंटरनेट सेवा आणि दूरसंचार सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

 

बीएसएफचे डीआयडी म्हणाले बांगलादेशच्या त्रिपुराला लागून असलेल्या सीमेवरील मार्गानं आतापर्यत 150 विद्यार्थी भारतात परतले आहेत.

बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग चे महासचिव म्हणाले की रविवारी सकाळपर्यत शूट अॅट साईट म्हणजे दिसताच गोळी घालण्याचे आदेश लागू राहतील.

 

बांगलादेशात आरक्षण विरोधी आंदोलनात आतापर्यंत शंभर हून जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेकजण जखमी झाले आहेत.

 

या निदर्शनांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणावर रागावलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

 

या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्यात यावं आणि गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जाव्यात.

 

सध्याची परिस्थिती काय आहे?

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या आरक्षणाविरोधात विद्यार्थी निदर्शनं करत आहेत. सोमवारपासून ही निदर्शनं सुरू आहेत. मात्र गुरुवारी झालेल्या निदर्शनांच्या वेळेस हिंसाचारात मोठी वाढ झाली.

 

शुक्रवारी विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर शनिवारी बांगलादेशातील अनेक शहरांमधील रस्ते ओस पडले आहेत. सुरक्षा दलांकडून तिथे गस्त घातली जाते आहे.

 

काही ठिकाणी किरकोळ चकमकी झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत.

 

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील रामपुरा भागातील एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की इथे रस्त्यांवर उतरलेल्या हजारो निदर्शकांवर पोलिसांनी गोळीबार केला आहे.

 

या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. एका निदर्शकाचं म्हणणं आहे की “निदर्शनं करणारे लोक म्हणजे जणूकाही पक्षीच आहेत, या पद्धतीनं पोलीस लोकांवर गोळीबार करत आहेत.”

निदर्शनांमुळे बांगलादेशात ‘हाय सेक्युरिटी अलर्ट’ लागू करण्यात आला आहे.

 

ढाक्यामध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. फोन बंद आहेत. अनेक ठिकाणी बस आणि रेल्वे सेवा देखील थांबवण्यात आल्या आहेत.

 

संपूर्ण बांगलादेशात शाळा आणि विद्यापीठसुद्धा पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत.

 

बीबीसी प्रतिनिधी चार्ल्स हाविलॅंडनं सांगितलं की पोलिसांचं म्हणणं आहे की “ढाक्यामध्ये हजारो लोकांची पोलिसांबरोबर झटापट झाली. त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. जवळपास 150 पोलिसांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.”

 

निदर्शकांचं म्हणणं आहे की “बॉर्डर गार्ड्स ने तरुणांवर गोळीबार केला होता. एका ठिकाणी तर पोलिसांनी आपल्या गाडीतून एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर फेकला होता.”

 

आतापर्यंत समोर आलेल्या बातम्यांनुसार, “निदर्शकांचं नेतृत्व करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.”

 

मायदेशी परतलेले भारतीय काय म्हणाले

बीबीसीचे सहयोगी पत्रकार पिनाकी दास यांनी बांगलादेशातून मायदेशी परतणाऱ्या काही भारतीय विद्यार्थ्यांची अगरतला-अंखौरा चेकपोस्टवर भेट घेतली.

 

यातील बहुतांश जण त्रिपुराच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशच्या ब्राह्मणबेरिया जिल्ह्यात परतणारे विद्यार्थी होते.

 

हे विद्यार्थी ब्राह्मणबारिया वैद्यकीय महाविद्यायलयात शिकण्यासाठी गेले होते.

 

ते सांगतात, ब्राह्मणबारिया वैद्यकीय महाविद्यालयाव्यतिरिक्त याच जिल्ह्यातील घाटुरा वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे 36 विद्यार्थी देखील याच मार्गाने भारतात परतले आहेत.

 

हरियाणाची प्रकृती ही विद्यार्थिनी बांगलादेशातील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचं शिक्षण घेते आहे.

ती म्हणाली, “सध्या तिथली परिस्थिती ठीक आहे. आम्हाला वसतिगृहातच राहण्याच्या आणि बाहेर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संपर्क करण्यास सांगण्यात आलं होतं.”

 

तिने सांगितलं की स्थानिक प्रशासन आणि महाविद्यालयाच्या प्रशासनानं त्यांना मदत केली.

 

ती पुढे म्हणाली, “महाविद्यालयाच्या व्हॅनमधून त्यांनी आम्हाला काही अंतरावर सोडलं. त्यानंतर पोलिसांच्या गाड्या आमच्याबरोबर येत होत्या. आम्ही इथपर्यत सुरक्षितपणे पोहोचावं यासाठी ते सुरक्षा पुरवत होते.”

ब्राह्मणबारिया वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारा मेघालयचा सृजन सेन सांगतो, “आमच्या महाविद्यालयातील परिस्थिती वाईट नव्हती. मात्र बाहेर परिस्थिती वाईट आहे. आमच्या सीनियर्सनी आम्हाला बाहेर जाण्यास मनाई केली होती. आम्हाला पासपोर्ट मिळाला म्हणून आम्ही परत आलो. आणखी इतर लोक देखील भारतात परतत आहेत.”

 

“तिथे जवळपास 80 भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. आम्ही दूतावासाशी बोललो होतो आणि आमचे पासपोर्ट नंबर त्यांना पाठवले होते. दूतावासातील कर्मचारी कदाचित त्यांना घेऊन येतील.”

 

आसामचा राहुल सांगतो, “महिनाभर आधीच आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही तिथे ज्या वसतिगृहात राहत होतो, तिथली परिस्थिती वाईट नव्हती. तिथे आम्ही सुरक्षित होतो. वसतिगृहात आमच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था होती. मात्र दोन-तीन दिवस आधीच महाविद्यालयानं नोटिस दिली होती की महाविद्यालय अनिश्चित काळासाठी बंद राहील. या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणतीही माहिती नव्हती.”

“मात्र फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. त्यामुळे आम्हाला घरी फोन करता आला नाही. आम्ही घाबरून गेलो होतो. मात्र महाविद्यालयानं पासपोर्ट परत केल्याबरोबर लगेचच आम्ही परत आलो.”

 

तर आसामचा रायमा सिमरेगा म्हणाला, “महाविद्यालय बंद आहे. महाविद्यालय कधी सुरू होणार याची आम्हाला कल्पना नाही. तिथे इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही भारतात परत आलो.”

 

ब्राह्मणबारियाहून परतणाऱ्या शकीबुल हक यानं सांगितलं की “हा सीमेजवळ असणारा जिल्हा आहे. आमच्याकडे भारतीय सिम कार्ड होतं. त्यामुळे आम्हाला भारतीय दूरसंचार सेवेचे नेटवर्क मिळत होतं.”

 

“महाविद्यालयाच्या गच्चीवरून आमच्या फोनला नेटवर्क मिळत होतं. याचाच वापर करून आम्ही भारतीय दूतावासात संपर्क केला आणि त्यांच्याकडून मदत घेतली. यानंतर आम्ही तिथून भारतात परतलो. महाविद्यालयानं देखील यात आमची मदत केली.”

बीएसएफचे डीआयजी राजीव अग्निहोत्री यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, “बांगलादेशातील सध्याची परिस्थितीमुळे बांगलादेशातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकणारे भारतीय विद्यार्थी मायदेशी परत येत आहेत.”

 

“शुक्रवारी आणि शनिवारी जवळपास 150 भारतीय विद्यार्थी त्रिपुराच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत. आगामी दिवसांमध्ये इथे आणखी विद्यार्थी येतील अशी आम्हाला आशा आहे.”

 

“बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी, इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षितपणे मायदेशी परतावं यासाठी काम करत आहेत.”

 

भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं की बांगलादेशात होत असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

 

निवेदनता म्हटलं आहे की बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ढाक्यात असणारे उच्चायुक्त आणि चितगाव, राजशाही, सिलहट आणि खुलना इथं हजर असणारे सहाय्यक उच्चायुक्त तिथे राहणाऱ्या भारतीयांना परत आणण्याच्या कामात मदत करत आहेत.

 

उच्चायुक्त आणि सहाय्यक उच्चायुक्त तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक ती पावलं उचलत आहेत. जेणेकरून भारत-बांगलादेश सीमेवर बॉर्डर क्रॉसिंग पॉईंटवरून भारतीय नागरिक सुरक्षितरित्या मायदेशी परत येऊ शकतील.

याव्यतिरिक्त भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय नागरी उड्डाण, इमिग्रेशन, बंदर आणि बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी देखील समन्वय साधत आहेत.

 

परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आतापर्यत 778 भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गांनी भारतात परत आणण्यात आलं आहे. याशिवाय ढाका आणि चितगाव विमानतळांद्वारे हवाई मार्गानं जवळपास 200 विद्यार्थी परतले आहेत.

 

भारताचे उच्चायुक्त आणि सहाय्यक उच्चायुक्त, बांगलादेशातील वेगवेगळ्या विद्यापीठात राहणाऱ्या 4,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत. ते विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करत आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात असं देखील म्हटलं आहे की नेपाळ आणि भूतान मधील विद्यार्थ्यांना देखील भारतात परतण्याची परवानगी दिली जाते आहे.

 

भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी उच्चायुक्त आणि सहाय्यक उच्चायुक्त बांगलादेशच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. बंदरांद्वारे समुद्री मार्गानं परतत असताना रस्त्यानं प्रवास करत असताना जिथे आवश्यकता असेल, तिथे सुरक्षा एस्कॉर्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय ढाक्यात असणारे उच्चायुक्त, बांगलादेशचे नागरी उड्डाण अधिकारी आणि व्यावसायिक विमानसेवा कंपन्यांच्या देखील संपर्कात आहेत. ढाका आणि चितगाव दरम्यान सुरळीतपणे हवाई सेवा सुरू राहावी आणि भारतीय नागरिकांना मायदेशी परतताना त्याचा वापर करता यावा यासाठी उच्चायुक्तांचे हे प्रयत्न आहेत.

याआधी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल म्हणाले होते की बांगलादेशमध्ये राहणारे सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहेत.

 

ते म्हणाले, “बांगलादेशात जवळपास 8,500 भारतीय विद्यार्थी आणि जवळपास 15,000 भारतीय नागरिक आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत दूतावास सजग आहे आणि भारतीय नागरिकांना सांगण्यात आलं आहे की उच्चायुक्तालयाच्या संपर्कात रहा.”

 

निदर्शनांमागचं काय आहे कारण?

1971 च्या बांगलादेश मुक्तियुद्धात लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांसाठी बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. या आरक्षणाला बांगलादेशातील विद्यापीठांमधील विद्यार्थी विरोध करत आहेत.

 

1971 ला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युद्ध लढणाऱ्यांना बांगलादेशात मुक्ति योद्धा म्हटलं जातं.

 

बांगलादेशात एक तृतियांश सरकारी नोकऱ्या मुक्ति युद्धात लढलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी राखीव आहेत. याच आरक्षणाच्या विरोधात मागील काही दिवसांपासून विद्यापीठातील विद्यार्थी निदर्शनं करत होते.

विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आरक्षणाची ही व्यवस्था भेदभावाची आहे. गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या पाहिजेत.

 

2018 मध्ये बांगलादेशात ही व्यवस्था रद्द करण्यात आली होती. मात्र ढाका उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना पुन्हा आरक्षण लागू करण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासूनच या आरक्षणाला विरोध सुरू झाला.

 

बुधवारी पंतप्रधान शेख हसीना यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर ही निदर्शनं हिंसक झाली. शेख हसीना यांनी आंदोलकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की न्यायालयाच्या माध्यमातून ‘न्याय’ नक्की मिळेल.

 

आरक्षणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी त्यांचं हे आवाहन नाकारलं आणि ‘पूर्ण बंदा’चं आवाहन केलं. त्यानंतर बांगलादेशात विविध ठिकाणी हिंसक निदर्शनं सुरू झाली.

 

Published By- Priya Dixit

 

 

 

Go to Source