कॉग्निटिव्ह टेस्ट म्हणजे काय? त्यातून बायडन आणि ट्रम्प यांच्याबद्दल काय कळू शकतं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस नाट्यमय होत चालली आहे.प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये जो बायडन यांची कामगिरी अपेक्षेनुसार न झाल्यानं आता त्यांच वय, त्यांची मानसिक क्षमता या गोष्टींवर चर्चा होऊ लागली आहे. त्यातून बायडन आणि ट्रम्प यांच्या …

कॉग्निटिव्ह टेस्ट म्हणजे काय? त्यातून बायडन आणि ट्रम्प यांच्याबद्दल काय कळू शकतं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस नाट्यमय होत चालली आहे.

 

प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये जो बायडन यांची कामगिरी अपेक्षेनुसार न झाल्यानं आता त्यांच वय, त्यांची मानसिक क्षमता या गोष्टींवर चर्चा होऊ लागली आहे. त्यातून बायडन आणि ट्रम्प यांच्या संज्ञानात्मक चाचण्या (cognitive tests) घेण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

 

संज्ञानात्मक चाचणी काय असते, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो, राष्ट्राध्यक्षांच्या बाबतीत या चाचणीचे महत्त्व किती आणि या चाचण्यांना अमेरिकेचे राज्यघटनेतील कायदेशीर स्थान काय? या गोष्टींचा ऊहापोह करणारा हा लेख.

 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सध्या उमेदवारांचं वय आणि मानसिक आरोग्य हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

 

राष्ट्राध्यक्ष जो बायडन (81) आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प (78) यांच्यासंदर्भात हा मुद्दा भूतकाळातदेखील गाजला असताना, गेल्या महिन्यात प्रेसिडेन्शियल डिबेटमधील बायडन यांच्या कमकुवत कामगिरीनंतर आता हा मुद्दा महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. अ

 

मेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची दिशा यामुळे बदलू शकते.

 

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांची जर राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली तर ते दुसरे सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरतील.

 

एबीसी न्यूज (ABC News)ला दिलेल्या मुलाखतीत जो बायडन यांनी संज्ञानात्मक चाचणी (Cognitive test) करण्यासाठी वचनबद्ध राहण्यास नकार दिला.

 

ते म्हणाले की त्यांची “दररोज संज्ञानात्मक चाचणी” होते आणि त्यांच्या डॉक्टर्सचं म्हणणं आहे की त्यांना त्याची आवश्यकता नाही.

 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की त्यांनी संज्ञानात्मक चाचण्या (cognitive tests) पूर्ण केल्या आहेत. यातील एक चाचणी ते राष्ट्राध्यक्ष असताना झाली होती तर दुसरी अलीकडेच झाली आहे. ते पुढे म्हणाले की त्यांनी यशस्वीरित्या दोन्ही चाचण्या पार पाडल्या आहेत.

 

संज्ञानात्मक चाचण्या (cognitive tests) काय असतात, या चाचण्या करण्यामागचा उद्देश काय असतो आणि या चाचण्यामध्ये पास होणं किती अवघड असतं याबद्दल जाणून घेऊया.

 

संज्ञानात्मक चाचणीत काय होतं?

मेंदू किती चांगल्या रितीनं कार्यरत आहे किंवा किती कार्यक्षम आहे हे मोजण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या आणि तपासण्या आहेत.

 

क्लिव्हलॅड क्लिनिकनुसार, या चाचण्यांमधून विशिष्ट आजार शोधला जात नाही किंवा त्याचं निदान केलं जात नाही. मात्र निदान करण्यासाठी काही अतिरिक्त चाचण्यांची आवश्यकता आहे का? याचे संकेत या चाचण्यांमधून मिळतात.

 

सर्वसामान्यपणे, जर एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती, व्यक्तिमत्त्व बदल किंवा तोल सांभाळणं यासारख्या गोष्टींमध्ये समस्या येत असेल किंवा ती व्यक्ती स्वत:ची पुनरावृत्ती करत असतील, भूतकाळातील काही गोष्टींचं त्याला विस्मरण होत असेल किंवा एखादी माहिती समजून घेण्यात अडचण येत असेल तर संज्ञानात्मक चाचणी किंवा तपासणीची हमी दिली जाऊ शकते.

 

सॅनफोर्ड मेडिसिन नुसार, संज्ञानात्मक चाचण्यांमध्ये मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंट (Montreal Cognitive Assessment) (MoCA)ही सर्वांत जास्त प्रमाणात केल्या जाणाऱ्या चाचण्यांपैकी एक आहे.

 

ही चाचणी म्हणजे ‘ज्या लोकांमध्ये काही कमतरता असल्याची शंका आहे, अशा लोकांमधील संज्ञानात्मक कौशल्यांचे (cognitive skills) मूल्यमापन’ पटकन करण्याची पद्धत आहे.

 

या मूल्यमापनात अभिमुखता, स्मरणशक्ती, लक्ष, वस्तूंना नाव देण्याची क्षमता आणि तोंडी आणि लेखी आदेशांचे पालन करणे या गोष्टींची चाचणी होते. ही चाचणी ऑनलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे.

 

ज्या व्यक्तीला संज्ञानात्मक समस्या नाहीत अशा व्यक्तीसाठी ही चाचणी सोपी असते. मात्र जे मानसिकदृष्टया त्या वेळी सक्षम नाहीत किंवा जे मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत अशांसाठी ही चाचणी अधिक कठीण असते.

 

झियाद नासरेडाइन हे कॅनडातील न्यूरोलॉजिस्ट या संज्ञानात्मक चाचणीचे जनक आहेत.

 

झियाद नासरेडाइन यांनी बीबीसीला सांगितलं की ‘माझ्यामते बायडन यांच्यासाठी ही चाचणी चांगली असू शकते. अमेरिकन नागरिकांना निश्चिंत करण्यासाठी ही गोष्ट योग्य ठरेल. त्याचबरोबर जर बायडन यांना काही समस्या असलीच तर त्या दृष्टीनं देखील ही चाचणी करणं योग्य ठरेल.’

 

(न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू आणि चेतासंस्थेशी संबंधित आजारांवर उपचार करणारे डॉक्टर)

 

संज्ञानात्मक चाचणी कशी असते?

संक्षिप्त स्वरूपात होणाऱ्या संज्ञानात्मक चाचण्यांमध्ये डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिक रुग्णांना शिकण्याशी आणि स्मरणशक्तीशी संबंधित विविध प्रकारचे प्रश्न विचारतात.

 

तर विस्तारानं किंवा सखोलपणे करण्यात येणाऱ्या वैद्यकीय मूल्यमापनामध्ये संज्ञानात्मक चाचण्यांबरोबरच शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल परीक्षा (मेंदू आणि चेतासंस्थेशी संबंधित) आणि रुग्णाचा वैद्यकीय इतिहास (भूतकाळातील सर्व आजार, समस्या) यांचा समावेश असतो.

 

सखोलपणे किंवा विस्तृतपणे करण्यात येणाऱ्या संज्ञानात्मक चाचण्यांमधून, जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांच्याही संज्ञानात्मक क्षमतेचे चित्र स्पष्ट होऊ शकते, असे डॅन मुंगस म्हणाले. ते कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डेव्हिस अल्झायमर्स डिसीज रिसर्च सेंटरचे सहयोगी संचालक आहेत.

 

बऱ्याचवेळा डॉक्टर किंवा तज्ज्ञ मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंट (MoCa) सारख्या संक्षिप्त स्वरूपाच्या चाचणीनं सुरूवात करतात. जर या चाचणीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले किंवा अपेक्षेपेक्षा कमी कौशल्ये आढळली तर मग ते अधिक व्यापक स्वरूपाच्या चाचणीकडे वळतात.

 

अधिक सखोल किंवा विस्तृत चाचण्यांद्वारे भाषा, कार्यकारी क्षमता (म्हणजे नियोजन करून कोणतंही काम वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे पार करून उद्दिष्ट साध्य करण्याचे कौशल्य) आणि दृश्य-स्थानिक क्षमता (दृश्ये समजण्याची, आठवण्याची आणि वस्तूंच्या एकमेकांमधील संबंधांना जाणून घेण्याची क्षमता) यांचे मूल्यमापन केले जाते.

 

उदाहरणार्थ डॉक्टर किंवा तज्ज्ञ रुग्णाला एखादी कथा वाचून दाखवू शकतो. त्यानंतर रुग्णाला त्या कथेतील काही भाग आठवण्यास सांगितलं जातं. यातून रुग्णाची स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता तपासली जाते.

 

रुग्णाला विविध शब्द, चित्रातील वस्तूंची नावं किंवा विशिष्ट अक्षरानं सुरू होणाऱ्या वस्तूंची नाव आठवण्यास सांगितलं जाऊ शकतं.

 

रुग्णाला प्रश्न विचारण्याखेरीज, संज्ञानात्मक क्षमतेत घट होण्याची लक्षणे ओळखण्यासाठी डॉ. मुंगस, जे लोक रुग्णासोबत नियमितपणे वेळ घालवतात अशा लोकांशी बोलण्यास सांगतात.

 

डॉ. मुंगस म्हणाले की एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांमध्ये काळानुरूप बदल झाला आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. ते पुढे सांगतात की फक्त एकदाच मूल्यमापन केल्यानं दिशाभूल होऊ शकते.

 

“एखाद्या व्यक्तीची सुरूवात कुठून झाली म्हणजे आधी त्याची क्षमता किती होती हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आधी त्याची जी क्षमता होती त्यापेक्षा जर त्याच्या क्षमतेत घसरण होत असेल तर ते वाईट चिन्हं आहे,” असं ते म्हणाले.

 

मात्र ते नोंदवतात की संज्ञानात्मक चाचण्या म्हणजे सर्वकाही नाही.

 

“एखादी साधी संज्ञानात्मक चाचणीद्वारे एखादी व्यक्ती चांगला राष्ट्राध्यक्ष होणार आहे हे कळेल, या कल्पनेला काहीही अर्थ नाही. मी माझ्या संपूर्ण कारकीर्दभर संज्ञानात्मक चाचण्या करतो आहे,” असं डॉ. मुंगस म्हणाले.

 

बायडन आणि ट्रम्प यांच्या वयावरून ते या चाचण्यांमध्ये पास होण्याच्या शक्यतेबद्दल आपल्याला काय कळतं?

 

65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या संज्ञानात्मक क्षमतांचे मूल्यमापन करण्याची शिफारस अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीने (AAN)केली आहे.

 

असे ठरवण्यामागचे कारण म्हणजे जसजसे माणसाचे वय वाढते तसतसे त्याच्या शरीराची झीज होत जाते आणि तो कमकुवत होत त्याची क्षमता घटण्याची शक्यता वाढते, असं डॉ. नासरेडाइन यांनी बीबीसीला सांगितलं.

 

वयाच्या 75 व्या वर्षांपर्यंत, 25 टक्के रुग्णांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संज्ञानात्मक विकार असतील, असा इशारा त्यांनी दिला.

 

“असं अनेकदा होतं की संज्ञानात्मक विकार किंवा कमकुवतपणा असतो आणि काहीवेळा तर त्याच्या अस्तित्वाची लोकांना कल्पनाच नव्हते,” असं डॉ. नासरेडाइन सांगतात. इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे डॉ. नासरेडाइन राष्ट्राध्यक्षांना भेटलेले नाहीत आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षांवर उपचार देखील केलेले नाहीत.

 

ते पुढे म्हणाले, मागील वर्षभरात जो बायडनमध्ये झालेला बदल त्यांच्या लक्षात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी राष्ट्राध्यक्ष हळूहळू चालतात, ते हळू आवाजात भाषण करतात. त्याचबरोबर त्यांचा आवाज देखील क्षीण होत चालला आहे. ते पुटपुटल्यासारखं बोलतात आणि काही शब्दांचा अस्पष्ट उच्चार करतात.

 

जो बायडनच्या ज्या वयाचे आहेत त्या वयात फार थोड्या लोकांवर इतक्या कामाचा ताण असतो किंवा इतका दबाव असतो. त्यामुळे या वयात एखादी व्यक्ती सामान्यपणे काम कसं करत असेल हे सांगणं कठीण आहे, असं ते नमूद करतात.

 

“आधीच्या वर्षांमध्ये मला बायडन यांच्यात ही घसरण दिसलेली नाही. फक्त मागील वर्षभरात मला हे दिसलं आहे,” असं ते सांगतात.

 

डॉ. नासरेडाइन यांनी नमूद केलं की ट्रम्प हे जो बायडन यांच्यापेक्षा फक्त तीनच वर्षांनी लहान असूनसुद्धा अधिक दक्ष, कणखर किंवा सक्षम वाटतात.

 

25 वी घटना दुरुस्ती: राष्ट्राध्यक्षांना स्मृतिभ्रंभ किंवा अल्झायमरचा आजार असल्यास काय?

जर राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू झाला किंवा “राष्ट्राध्यक्ष आपल्या अधिकारांचा वापर करण्यास आणि कर्तव्ये पार पाडण्यास अक्षम असतील”, तर उत्तराधिकारी आणि त्यासाठीची पद्धत याबद्दल अमेरिकेच्या राज्यघटनेतील 25 व्या घटना दुरुस्ती मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

या घटना दुरुस्तीत नमूद करण्यात आलं आहे की राष्ट्राध्यक्षांना पदावरून दूर करण्यात आल्यास, राष्ट्राध्यक्ष अक्षम झाल्यास, त्यांचा मृत्यू झाल्यास किंवा राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा दिल्यास या घटनादुरुस्तीतील तरतुदीचा वापर करण्यात यावा.

 

अमेरिकेचे ख्यातनाम राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत ही घटनादुरुस्ती मंजूर करण्यात आली होती. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही घटनादुरुस्ती हा एक वादाचा विषय बनला आहे.

 

ट्रम्प यांच्या कार्यकाळात, राष्ट्राध्यक्ष आपले कार्य करण्यास सक्षम आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार वैद्यकीय तज्ज्ञांना मिळावेत यासाठी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून मिळतील का या मुद्द्यावर अमेरिकन खासदारांनी जोर दिला होता.

 

दुसऱ्या एका प्रकरणात ट्रम्प यांच्यावरच 25 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी होण्याबाबत डेमोक्रॅटिक खासदारांनी तयारी दर्शवली होती.

 

2021 मध्ये अमेरिकेत कॅपिटल हिलवर (Capitol Hill) दंगल झाली होती. (कॅपिटल हिल मध्ये अमेरिकन सरकार, अमेरिकन कॉंग्रेस, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या संस्थांच्या इमारती आणि कार्यालये आहेत.)

 

त्या दंगलीनंतर डेमोक्रॅटिक खासदारांनी संसदेत एक ठराव मंजूर केला होता. ज्यामध्ये ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यासाठी तत्कालीन उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी 25 वी घटनादुरुस्ती लागू केली होती.

 

पण वरील दोन्ही प्रयत्नातून काहीच हाती लागले नव्हते.

 

तर उप-राष्ट्राध्यक्षांकडे येईल देशाचे नेतृत्व

जो बायडन यांच्या प्रेसिडेन्शियल डिबेटमधील कामगिरीनंतर, काही रिपब्लिकन्सनी बायडन यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांकडे हे कलम लागू करण्याची मागणी केली आहे.

 

घटनादुरुस्तीतील कलम 4 मध्ये म्हटलं आहे की जर उप-राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्य किंवा काँग्रेस जर मानत असेल की राष्ट्राध्यक्ष त्यांच्या अधिकारांचं आणि कर्तव्याचं पालन करण्यास सक्षम नाहीत तर अशावेळी उप-राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळू शकतात.

 

मानसिक आरोग्याच्या घसरण झाल्यासंदर्भात हे कलम किंवा ही घटनात्मक तरतूद कधीही वापरण्यात आलेली नाही किंवा तपासली गेलेली नाही.

 

 

 

Go to Source