आम्ही बिघडलो……2

शिक्षणाने आमचं नेमकं काय झालंय याबद्दल बोलताना भगवान रजनीश यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली आहे. एका गावात एका कुत्र्याचे कुटुंब राहात होतं. ते त्यांच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी दिल्लीला पाठवायचं ठरवत होते. गावातली सगळी कुत्री एकत्र आली. त्या मुलाचा मोठा सत्कार केला गेला, अभिनंदन केलं, कौतुक करून त्याला दिल्लीकडे रवाना केलं. या गावातून दिल्लीपर्यंत पोहोचायला त्याला […]

आम्ही बिघडलो……2

शिक्षणाने आमचं नेमकं काय झालंय याबद्दल बोलताना भगवान रजनीश यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली आहे. एका गावात एका कुत्र्याचे कुटुंब राहात होतं. ते त्यांच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी दिल्लीला पाठवायचं ठरवत होते. गावातली सगळी कुत्री एकत्र आली. त्या मुलाचा मोठा सत्कार केला गेला, अभिनंदन केलं, कौतुक करून त्याला दिल्लीकडे रवाना केलं. या गावातून दिल्लीपर्यंत पोहोचायला त्याला दोन महिने लागतील असं तज्ञ लोकांनी सांगितलं आणि हा निघाला.
जाता जाता नवीन काहीतरी बघेल, काहीतरी शिकेल, हा उद्देश त्यांच्या मनात होताच. आपल्या समाजात यात्रेला जाणारे रॅली काढणारे देशभर फिरणारे अनेक नामवंत लोकं आपण पाहतोच पण या कुत्र्याचं काय झालं कोणास ठाऊक? तो पंधरा दिवसाच्या आतच दिल्लीला पोहोचला. त्याला विचारलं तेव्हा कळलं की तो निघाल्यानंतर त्याला प्रत्येक गावातल्या कुत्र्यांनी पळवून लावलं आणि इतके ते भुंकत मागे लागले की पळता पळता दिल्ली केव्हा आली ते त्याचं त्यालाच कळलं नाही.
आता दिल्लीत आल्यानंतर तिथे त्याची व्यवस्था अर्थातच केलेली नव्हती कारण तो ठरलेल्या तारखेच्या आधी आला होता. परंतु त्याचा हा धीटपणा पाहून त्याला मात्र अनेक राजकारणी लोकांनी आपल्या गटात सामील करून घेतलं. आपण दिल्लीला कशासाठी आलो हे मात्र तो विसरून गेला. जसं या कुत्र्याच्या बाबतीत झालं तसंच आमचंसुद्धा होत असतं. आम्हाला सगळ्यांना आई-वडील त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मोठेपणाप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात आणि आम्ही त्या सगळ्या मुलांबरोबर मुलं काय म्हणतील? कोण आपल्या अंगावर ओरडेल? कोण आपल्याला नावं ठेवेल. ह्या विचाराच्या नादातच आपण भराभर पुढच्या इयत्ता पास होऊन पुढे जात असतो आणि पास झाल्यानंतर लक्षात येतं की आपण इथपर्यंत कशासाठी आलोय? हेच विसरून गेलोय. आपली अवस्था त्या कुत्र्यासारखी होते कारण हे शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी, आपल्या आई-वडिलांना मान सन्मान, कर्तव्य, पूर्ण होईल अशी नोकरी आपण त्यांच्या आवडीने स्वीकारतो.
अशावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने काय शिकायचे हे राहूनच गेलेलं असतं. अशावेळी आम्ही घडणार की बिघडणार याचा विचारच केला गेलेला नसतो. बरेचदा समाजामध्ये आपल्या लक्षात येतं की डॉक्टरचा मुलगा चित्रकार होतो, गाणाऱ्याची मुलगी इंजिनियर होते किंवा आयएस ऑफिसर होते. अशावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. पण हेच जास्त योग्य आहे. ज्याला जे आवडेल ते मिळणे म्हणजे जगणं. पुण्यातले गाडगीळ सोनाराचे काम करतात. तर सांगलीचे अभ्यंकर चपला बनवतात. ज्याला जे आवडेल ते काम आपण स्वीकारायला हवं आणि जमेल ते काम शिकायला मिळायला हवं. असं शिक्षण आज-काल उपलब्ध होऊ लागलंय.
शिक्षणाबरोबर आनंदाची जगण्याची संधी देणारं शिक्षण हवं. जे आम्ही शिकतो ते रोजच्या जगण्यात वापरता यायला हवं, नाहीतर आपण बघतोच की अनेक कॉमर्स ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना चेकसुद्धा भरता येत नाही. अशी अनेक ठिकाणची उदाहरणं पाहिल्यानंतर लक्षात येतं की आम्ही फक्त दुसऱ्यांशी स्पर्धा करत जगत आलोय. पण आम्हाला असं शिक्षण हवं की जे आमच्यातल्या स्वत:च्या गुणवत्तेशी स्पर्धा करायला शिकवेल. त्यावेळी खऱ्या अर्थाने तेव्हा आम्ही खरे सुशिक्षित होऊ आणि आम्ही बी ..पडलोय असं अभिमानाने सांगू…