आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी पुढे यायला हवे
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत यांचे विचार
बेळगाव : भाषिक वनवास हा तुरुंगवासाइतकीच भयावह असतो आणि ज्यांची अशी मुस्कुटदाबी होते, त्यांनाच त्याची कल्पना असते. चित्त आणि विश्व यांना जोडणारा सेतू म्हणजे भाषा होय. अशा भाषेचा प्रामुख्याने मातृभाषेचा त्याग करण्याची सक्ती करणे हे एक प्रकारचे दमन असून, व्यक्तीस्वातंत्र्याचा तो संकोच आहे. म्हणूनच आपण आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी पुढे यायला हवे, असे विचार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. एसकेई सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी कला आणि महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर एसकेईचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, प्राचार्य डॉ. अभय पाटील, प्राध्यापक पी. डी. गावडे, चिखली येथील डॉ. प्रकाश दुकले, कवयित्री लता ऐहोळे आदी उपस्थित होते. कृष्णात खोत म्हणाले, मराठी भाषेसाठी एकत्र येणे ही केवळ सांस्कृतिक नव्हे तर ती एक राजकीय कृतीसुद्धा आहे. भाषा हे एक हत्यार असून, भाषेसाठी युद्धे झाली आहेत. भाषा भगिनीभाव आपल्याला जपता आला पाहिजे. म्हणजे आपल्या मातृभाषेबरोबर इतर भाषांचा आपल्याला आदर असायला हवा. एखाद्या भाषेला विरोध करणे हा दांभिकपणा असून ते ढोंग ओळखता आले पाहिजे आणि व्यक्तीला व्यक्त होण्याचा अधिकारही असायला हवा.
बोलीभाषा टिकायला हव्यात
भाषा पूर्वी हुंकाराची त्यानंतर हावभावाची भाषा होती. लेखकाला अशा हालचालींची भाषा कळायला हवी. आज आपल्याला दृश्य माध्यम अधिक आवडते. पण सर्व काही एखाद्या चिपमध्ये साठवून ठेवण्याची सवय लागली तर स्मृतीसंचय नष्ट होईल. आपल्या स्मृतीचा संकोच होईल आणि आपल्याला भविष्यकाळात हे परवडणारे नाही. बोली भाषा ही तितकीच महत्त्वाची असून या भाषेत बोलणाऱ्यांना प्राणी, पर्वत, झाडे, जीवजंतू यांचे नैसर्गिक ज्ञान असते. त्या बोलीभाषा टिकायला हव्यात. तसेच ती भाषा बोलणारी माणसेही टिकायला हवीत. भाषा प्रेम आणि करुणा शिकविते. ती बोलण्यामुळे जैविक होते आणि म्हणूनच तिचा व्यवहारात सातत्याने उपयोग व्हायला हवा, असे ते म्हणाले.
सामंजस्य कराराचे प्रातिनिधिक स्वरुपात उद्घाटन
या गौरव दिनानिमित्त सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी-विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. वारकरी मंडळीही सहभागी झाली होती. दिंडीमध्ये विविध ग्रंथ ठेवण्यात आले होते. दिंडी मुख्य व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक पी. डी. गावडे यांनी केले. सुकन्या गोजेकर व हर्षदा डांगे यांनी कृष्णात खोत व प्रकाश दुकले यांचा परिचय करून दिला. प्रा. एस. वाय. प्रभू यांच्या हस्ते कृष्णात खोत यांचा व डॉ. अभय पाटील यांच्या हस्ते डॉ. प्रकाश दुकले यांचा सत्कार केला. यानंतर आरपीडी मर ाठी विभाग व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ यांच्यातील सामंजस्य कराराचे प्रातिनिधिक स्वरुपात उद्घाटन झाले. यावेळी डॉ. प्रकाश दुकळे यांनी या करारांतर्गत आता शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ जे उपक्रम हाती घेईल, त्यामध्ये आरपीडीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल व संघ नेहमीच तुमच्यासोबत असेल, अशी ग्वाही दिली. यानंतर एस. वाय. प्रभू यांनी अध्यक्षीय समारोप केला. दुसऱ्या सत्रापूर्वी प्रा. माधुरी शानभाग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सत्रातील वक्त्या लता ऐहोळे यांचा परिचय नेहा जाधव हिने करून दिला.
मराठी म्हणजे भजनाचा ठेका अन् काळजाचा ठोका
त्या म्हणाल्या, मराठी म्हणजे भजनाचा ठेका आणि काळजाचा ठोका आहे. या भाषेला सौंदर्य देण्याचे काम स्त्राrगीतांनी केले आहे. आयुष्य समृद्ध करण्यासाठी कविता उपयोगी ठरते. ती जीवनात रंग भरते. तसेच वेदनेचा काही काळ विसर पडावा, वेदनेची धार बोथट व्हावी म्हणून कविता उपयुक्त ठरते. यावेळी त्यांनी नारायण सुर्वे यांची ‘एवढं पत्रात लिवा’ ही कविता सादर केली. तसेच विठ्ठल-रखुमाई यांच्या संवादावर आधारित कविता सादर केली.
‘विठ्ठलदेव बोलं, देव बोलं,
माझ्या पोथीचं कुठं गं पान’
रुक्मिणीदेवी बोले,
‘जना बिगर नव्हतं कोणं’.
तसेच ‘धागा’ ही कविता त्यांनी गाऊन दाखविली.
‘तुझ्यामाझ्या भवताली आहे नात्याचे रिंगण,
नाही तुटायचे असे वेड्यामायेचे बंधन’,
तसेच ‘बाप’ या कवितेतून
‘माझ्या डोळ्यातली आस,
कोणी मायेने पुसताना,
उरी हुंदका दाटतोया,
गोष्ट बापाची सांगताना’
या व अनेक कविता सादर केल्या. या सत्राचे अध्यक्ष प्रसाद पंडित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अभय पाटील यांनी सर्वांना भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या. लता कणबरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनुष्का जाधव व आरती पाटील यांनी केले.
साहित्यकृतीचे प्रदर्शन
या भाषादिनाच्या निमित्ताने वि. वा. शिरवाडकर, विं. दा. करंदीकर, वि. स. खांडेकर यांच्या साहित्यकृतीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते व विशेष कट्टा तयार करण्यात आला होता.
Home महत्वाची बातमी आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी पुढे यायला हवे
आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी पुढे यायला हवे
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत यांचे विचार बेळगाव : भाषिक वनवास हा तुरुंगवासाइतकीच भयावह असतो आणि ज्यांची अशी मुस्कुटदाबी होते, त्यांनाच त्याची कल्पना असते. चित्त आणि विश्व यांना जोडणारा सेतू म्हणजे भाषा होय. अशा भाषेचा प्रामुख्याने मातृभाषेचा त्याग करण्याची सक्ती करणे हे एक प्रकारचे दमन असून, व्यक्तीस्वातंत्र्याचा तो […]