‘बाझबॉल’चा मुकाबला करण्यासाठी आमच्याकडे ‘विराटबॉल’ : गावस्कर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हैदराबादमध्ये 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या बहुचर्चित ‘बाझबॉल’ पद्धतीचा मुकाबला करण्यासाठी भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी ‘विराटबॉल’चा पुरस्कार केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजीने अत्यंत आक्रमक शैली स्वीकारलेली असून त्यांचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम हे स्वत: खेळत असताना जो आक्रमक दृष्टिकोन पत्करायचे त्याच्याशी याची सांगड घातली जाते. विराट कोहली […]

‘बाझबॉल’चा मुकाबला करण्यासाठी आमच्याकडे ‘विराटबॉल’ : गावस्कर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हैदराबादमध्ये 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडच्या बहुचर्चित ‘बाझबॉल’ पद्धतीचा मुकाबला करण्यासाठी भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी ‘विराटबॉल’चा पुरस्कार केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजीने अत्यंत आक्रमक शैली स्वीकारलेली असून त्यांचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम हे स्वत: खेळत असताना जो आक्रमक दृष्टिकोन पत्करायचे त्याच्याशी याची सांगड घातली जाते.
विराट कोहली ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे आणि तो ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता आमच्याकडे ‘बाझबॉल’चा मुकाबला करण्यासाठी ‘विराटबॉल’ आहे, असे गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा काढलेल्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या बाबतीत फक्त 152 धावांनी दूर असलेला कोहली हा या मालिकेत भारताच्या फलंदाजीचा मुख्य आधार असेल. त्याच्या नावावर 113 सामन्यांत 29 अर्धशतके आणि 30 शतके आहेत.
रुपांतर म्हणजे अर्धशतकांपेक्षा जास्त शतके नावावर असणे. कोहलीकडे जितकी अर्धशतके आहेत तितकीच शतके आहेत. याचा अर्थ त्याचा रुपांतरण दर चांगला आहे, असे गावस्कर म्हणाले. इंग्लंडने भारताविऊद्धची मायदेशातील त्यांची मागील मालिका बरोबरीत राखली होती. तथापि, 2012-2013 च्या हंगामात इंग्लंडविऊद्ध स्वीकाराव्या लागलेल्या 1-2 अशा पराभवानंतर कसोटी मालिकेत अपराजित राहिलेला यजमान भारत हा एक मजबूत प्रतिस्पर्धी आहे.
कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विनसारख्या अनुभवी फिरकीपटूच्या नेतृत्वाखालील भारताचा फिरकी मारा आणि इंग्लंडची आक्रमक फलंदाजीची रणनीती यांच्यात जोरदार झुंज पाहायला मिळेल. भारताकडे रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे अन्य चांगले फिरकीपटूही आहेत. इंग्लंडने गेल्या 1-2 वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये नवीन दृष्टिकोन स्वीकारला आहे. हा एक आक्रमक दृष्टिकोन आहे, ज्यात फलंदाज गोलंदाजांवर हल्ला करू पाहतात. परिस्थिती कशीही असो, त्यांना फक्त आक्रमक क्रिकेट खेळायचे असते. हा दृष्टिकोन भारताच्या फिरकीपटूंच्या विरोधात चालतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल, असे गावस्कर पुढे म्हणाले.