कणबर्गी येथे पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

महापौरांची तातडीने घटनास्थळी धाव : दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड : पाणीपुरवठ्यावर परिणाम बेळगाव : हिडकलपासून शहराला जोडण्यात आलेली पाण्याची मुख्य पाईपलाईन कणबर्गी येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन उन्हाळ्यातच ही घटना घडल्याने महानगरपालिका आणि एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धाव घ्यावी लागली. त्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली. तरीदेखील मोठ्या प्रमाणात […]

कणबर्गी येथे पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

महापौरांची तातडीने घटनास्थळी धाव : दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड : पाणीपुरवठ्यावर परिणाम
बेळगाव : हिडकलपासून शहराला जोडण्यात आलेली पाण्याची मुख्य पाईपलाईन कणबर्गी येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन उन्हाळ्यातच ही घटना घडल्याने महानगरपालिका आणि एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धाव घ्यावी लागली. त्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली. तरीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. महापौर सविता कांबळे यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट दिली. यावर्षी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाईपलाईनची दुरुस्ती करणे तसेच शहरांमध्ये असलेल्या पाण्याच्या गळत्या दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. पाणीपुरवठा दाबावर देखील लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ऐन उन्हाळ्यातच पाईप फुटून पाणी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. कणबर्गी येथे मुख्य पाईपलाईनलाच गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. मुख्य पाईपलाईनलाच गळती लागल्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. कणबर्गी येथे पाईप फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याची माहिती महापौर सविता कांबळे यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी त्या ठिकाणी भेट दिली. अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना पाण्याची गळती तातडीने बंद करण्याची सूचना केली. याचबरोबर इतर ठिकाणी पाण्याच्या गळती असतील तर त्या देखील दुरुस्त कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
दोन दिवस पाणीपुरवठ्यात व्यत्यय
कणबर्गीनजीक जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात दोन दिवस व्यत्यय येणार आहे. उत्तर भागातील कणबर्गी, केएचबी कॉलनी, श्रीनगर, चन्नम्मा सोसायटी, महांतेशनगर सेक्टर 5, 6, 7, 8, 9, 10, उज्ज्वलनगर, अमननगर, गांधीनगर, अलारवाड, बसवनकुडची, देवराज अर्स कॉलनी, अशोकनगर, सुभाषनगर, कंग्राळी बी.के., यासह दक्षिण भागातील राणी चन्नम्मानगर पहिला, दुसरा क्रॉस, मजगाव, अनगोळ, भारतनगर, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, नानावाडी, मृत्यूंजयनगर, राजारामनगर, कपिलेश्वर कॉलनी भागातील पाणीपुरवठा ठप्प होणार आहे.