देशात तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
11 राज्यांतील 93 जागांवर निवडणूक : तेराशेहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवार 7 मे रोजी 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकंदर 1,352 उमेदवार रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला अधिकार बजावता येणार आहे. या टप्प्यात संपूर्ण गुजरात राज्यात मतदान होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी मताधिकार बजावतील. तिसऱ्या टप्प्यानंतर लोकसभेच्या 543 पैकी 283 जागांवर मतदान पूर्ण होणार आहे. पुढील चार टप्पे 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी होणार आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
देशात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात आधी 10 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 94 जागा होत्या, मात्र 21 एप्रिल रोजी सुरतमधून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर आणि 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचवेळी, जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे अनंतनाग-राजौरी मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता राजौरीमध्ये सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे. तसेच मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणारे मतदान लांबणीवर टाकल्यानंतर ते आता तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी होत असल्यामुळे मंगळवारी देशभरात एकंदर 93 मतदारसंघात मतदान होत आहे. बैतुल मतदारसंघातील बसप उमेदवाराच्या मृत्यूनंतर मतदान पुढे ढकलण्यात आले होते.
तिसऱ्या टप्प्यात एकूण 1,352 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 1,229 पुरुष आणि 123 (9 टक्के) महिला आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, 244 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. 392 उमेदवारांकडे 1 कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे. 244 उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले असून 172 जणांवर खून, बलात्कार असे गुन्हे दाखल असल्याचे नामांकन अर्जावरून स्पष्ट झाले आहे. 38 उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोघांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी 17 उमेदवारांविरुद्ध द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. तसेच 392 म्हणजेच 29 टक्के उमेदवार करोडपती आहेत. त्यांच्याकडे सरासरी 5.66 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
तिसऱ्या टप्प्यात कर्नाटक, मध्यप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली/दमण आणि दीव येथे मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ज्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील केले जाईल अशा लोकांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश आहे. ते गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. मध्यप्रदेशमध्ये विदिशामधील शिवराजसिंह चौहान, गुना शिवपुरीतील ज्योतिरादित्य सिंधिया आणि राजगडमधील दिग्विजय सिंह आदी दिग्गज नेतेही याच टप्प्यात आपले भवितव्य आजमावतील. याशिवाय उत्तर प्रदेशातील मुलायम कुटुंबातील डिंपल यादव, अक्षय यादव आणि आदित्य यादव यांच्या भवितव्याचाही फैसला मंगळवारी होणार आहे.
Home महत्वाची बातमी देशात तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
देशात तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
11 राज्यांतील 93 जागांवर निवडणूक : तेराशेहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवार 7 मे रोजी 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकंदर 1,352 उमेदवार रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून […]