आर्थिक सुधारणांच्या विरोधात अर्जेंटीनामध्ये हिंसक निदर्शने

वृत्तसंस्था /ब्युनॉस आयर्स अर्जेंटीनामध्ये अध्यक्ष जेवियर मिलेई यांच्या आर्थिक सुधारणा विधेयकाच्या विरोधात निदर्शने होत आहेत. सिनेटमध्ये बुधवारी विधेयक सादर होताच राजधानी ब्युनॉस आयर्समध्ये लोक रस्त्यांवर उतरले. लोकांनी काँग्रेस (संसद)बाहेर निदर्शने केली आहेत. यादरम्यान निदर्शकांना हटविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर, रबर बुलेट आणि पाण्याचा मारा केला, तर निदर्शकांनी पेट्रोल बॉम्ब फेकत दगडफेक केली आहे. निदर्शकांनी ‘देश विकाऊ नाही’ […]

आर्थिक सुधारणांच्या विरोधात अर्जेंटीनामध्ये हिंसक निदर्शने

वृत्तसंस्था /ब्युनॉस आयर्स
अर्जेंटीनामध्ये अध्यक्ष जेवियर मिलेई यांच्या आर्थिक सुधारणा विधेयकाच्या विरोधात निदर्शने होत आहेत. सिनेटमध्ये बुधवारी विधेयक सादर होताच राजधानी ब्युनॉस आयर्समध्ये लोक रस्त्यांवर उतरले. लोकांनी काँग्रेस (संसद)बाहेर निदर्शने केली आहेत. यादरम्यान निदर्शकांना हटविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर, रबर बुलेट आणि पाण्याचा मारा केला, तर निदर्शकांनी पेट्रोल बॉम्ब फेकत दगडफेक केली आहे. निदर्शकांनी ‘देश विकाऊ नाही’ अशा घोषणाही दिल्या आहेत. निदर्शकांनी बॅरिकेडिंग तोडत संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. निदर्शनांमध्ये विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनीही भाग घेतला. झटापटीत 20 पोलिसांसमवेत अनेक जण जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी हिंसक निदर्शनांप्रकरणी 18 जणांना अटक केली आहे. तर जखमी खासदारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अर्थव्यवस्था सुधारण्याचा हेतू
अर्जेंटीना सध्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अध्यक्ष मिलेई यांनी संसदेत विधेयक सादर केले आहे. याच्या अंतर्गत देशात आर्थिक आणीबाणी घोषित करणार असल्याचे म्हटले गेले आहे. याचबरोबर निवृत्तीवेतनात कपात आणि कामगारांचे अधिकार कमी करण्याची तरतूद आहे. या प्रस्तावाला डावे पक्ष, कामगार संघटना आणि सामाजिक संघटना विरोध करत आहेत. संबंधित विधेयक संसदेच्या प्रतिनिधिगृहात फेब्रुवारीत मांडले गेले होते. एप्रिल महिन्यात प्रतिनिधिगृहात विधेयकाला संमती मिळाली होती. तर वरिष्ठ सभागृहात बुधवारी विधेयक मांडले गेले, तेथे विधेयकाच्या समर्थनार्थ आणि विरोधात समान 36 मते पडली. तर सिनेट अध्यक्ष  व्हिक्टोरिया यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले.