बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला

शेख हसीना यांच्याविरोधातील निकालापूर्वी भडका : 32 ठिकाणी बॉम्बस्फोट, अनेक बसेस जाळल्या; ढाकामध्ये निमलष्करी दल तैनात वृत्तसंस्था/ ढाका बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या निकालापूर्वी बांगलादेशात हिंसाचार भडकला आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार बुधवारपासून बॉम्बस्फोट आणि जाळपोळीचे सत्र सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसात 32 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले असून अनेक बसेस जाळण्यात आल्या आहेत. तथापि, या […]

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला

शेख हसीना यांच्याविरोधातील निकालापूर्वी भडका : 32 ठिकाणी बॉम्बस्फोट, अनेक बसेस जाळल्या; ढाकामध्ये निमलष्करी दल तैनात
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या निकालापूर्वी बांगलादेशात हिंसाचार भडकला आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार बुधवारपासून बॉम्बस्फोट आणि जाळपोळीचे सत्र सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसात 32 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले असून अनेक बसेस जाळण्यात आल्या आहेत. तथापि, या हिंसाचारात किती जीवितहानी झाली याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुह्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी निकाल देणार आहे. या निकालापूर्वीच बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराचा भडका उडाला आहे. 2024 च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकवल्याचा आरोप हसीना यांच्यावर आहे.
हसीना यांचा पक्ष ‘अवामी लीग’ने देशभरात लॉकडाऊनची मागणी केली आहे. प्रत्युत्तरादाखल बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि बांगलादेश जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी ढाकाच्या अनेक भागात रस्त्यावर उतरून काही ठिकाणी रॅली काढल्या. वाढत्या हिंसाचारामुळे राजधानी ढाकासह प्रमुख शहरांमधील शाळा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. राजधानीत निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.
माझ्याविरुद्धचा खटला हा तमाशा : हसीना
गेल्यावर्षी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये शेकडो लोकांची हत्या आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी फेटाळले आहेत. आपल्याविरुद्ध सुरू असलेला खटला हा खोटा तमाशा आहे. त्यांच्या हुकूमशाही सरकारविरुद्धच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दडपण्यासाठी सुरक्षा दलांना नि:शस्त्र निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  संयुक्त राष्ट्राच्या मते या हिंसाचारात 1,400 लोकांचा मृत्यू झाला होता. या मुद्यावर हसीना यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या खटल्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. युनूस सरकार खरोखरच प्रामाणिक असेल तर त्यांनी माझ्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात खटला चालवावा, असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.