उत्तरकाशी बोगद्यात 15 मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग, अजून किती खोदकाम करावं लागणार?
उत्तरकाशी येथील सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी डोंगर माथ्यावरून व्हर्टिकल ड्रिलिंग म्हणजेच उभं ड्रिलिंग सुरू करण्यात आलं आहे.
त्याचवेळी बोगद्यात पडलेल्या ढिगाऱ्याच्या आतून सुरू असलेलं खोदकाम थांबवण्यात आलं आहे.
हैदराबादहून आणलेल्या प्लाझ्मा मशीनद्वारे काम सुरू केलं असून आत अडकलेला ऑगर मशीनचा एक भाग कापून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याविषयी बोगद्याबाहेर पत्रकार परिषद आयोजित करून माहिती देण्यात आली. यावेळी उत्तराखंड सरकारचे सचिव आणि या ऑपरेशनचे नोडल अधिकारी नीरज खैरवाल आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद उपस्थित होते.
नीरज खैरवाल म्हणाले, “आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत ऑगर मशीनचे अडकलेले ब्लेड कापून बाहेर काढणे अपेक्षित आहे.”
महमूद अहमद म्हणाले, “आम्ही कालपासून आणखीन 2-3 पर्यायांवर काम सुरू केलं आहे. आम्ही एसजेव्हीएनएल ला 1-1.2 मीटर व्यासाचं व्हर्टीकल ड्रिलिंग करायला सांगितलं आहे.”
ते म्हणाले की, “आम्ही आमच्या भूगर्भशास्त्रज्ञांसोबत काही ठिकाणं शोधून काढली आहेत जिथे ड्रिलिंग आणखीन चांगलं होऊ शकतं. आतापर्यंत सुमारे 15 मीटर खोदकाम पूर्ण झालं आहे. आमचा अंदाज आहे की एकूण 86 मीटर ड्रिलिंग करावं लागेल. येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होईल.”
बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने आडवं खोदकाम करण्याबाबत महमूद अहमद म्हणाले की, हे काम दोन दिवसांनी म्हणजेच 28 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
ते म्हणाले, “ही एक मोठी प्रक्रिया आहे. आडवं ड्रिलिंग यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे 15 दिवसांची मुदत आहे. जर ते 180 मीटर अंतरावर असेल, तर आम्ही दररोज 12 मीटर वेगाने काम करू. आम्हाला एक ड्रिफ्ट टनेल बांधायचा आहे, त्याचं डिझाईन तयार झालं आहे आणि त्याला मंजुरीही मिळाली आहे.”
उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू असून त्यांना लवकरच बाहेर काढले जाईल अशी आशा व्यक्त केली जातेय.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, बोगद्यात अडकलेल्या मजुरांना काढण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा मशीन मागवले आहे.
शनिवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत हे मशीन वापरले जाण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, ऑगर मशीन तुटल्यानंतर प्लाझ्मा मशीनद्वारे ड्रिलिंग केले जाईल. त्याद्वारे एका तासात चार मीटपर्यंत खोदकाम करता येते.
प्लाझ्मा मशीनद्वारे काम सुरू केल्यानंतर मजुरांना काही तासांमध्ये बाहेर काढले जाईल, असा दावा त्यांनी केला.
धामी यांच्या मते, बोगद्यातील मजुरांना काढण्यासाठी सर्व पर्यायांवर काम केलं जात आहे. त्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंगचं कामही सुरू करण्यात आलं आहे.
हे ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानही याबाबत काळजीत आहेत.
“केंद्रीय संस्था, राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची पथकं मजुरांना बाहेर काढण्याच्या या मोहिमेत एकत्रितपणे काम करत आहेत. आम्ही लवकरच यशस्वीरित्या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळवू,” असं धामी म्हणाले.
मुख्यमंत्री धामी यांनी दिलेल्या माहितीनुसार , त्याठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. पण तरी गरज लागेल ते लगेचच मागवले जात आहे.
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, बोगद्याच्या बाहेर काही अंतरावरच 10 बेडचे हॉस्पिटल, 40 अॅम्ब्युलन्स, 20 डॉक्टर आणि 35-40 सपोर्ट स्टाफ सज्ज आहेत. तर सुमारे 50 किलोमीटर अंतरावर 41 बेडचं एक रुग्णालय तयार करण्यात आलं आहे.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याचा शनिवार (25 नोव्हेंबर) हा 14 वा दिवस आहे.
शनिवारी (25 नोव्हेंबर) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद हसनैन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, “उत्तरकाशी बोगद्यातून 41 कामगारांना काढायला आणखी किती वेळ लागेल हे ठामपणे सांगता येणार नाही. हिमालयातला डोंगर फोडताना अनेक अडचणी येतात. जसं युद्ध सुरू झाल्यावर ते कधी संपेल हे सांगता येत नाही. तसंच हे काम आहे. ”
त्याआधी मदतकार्याच्या 12 व्या दिवशीच कामगारांपर्यंत पोहोचू असं सरकारने सांगितलं होतं. पण मार्गात काही अडथळे आल्याने कामाचा वेग मंदावला.
12 नोव्हेंबर रोजी बोगदा कोसळल्याने 41 मजूर त्यात अडकले आहेत. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
गुरुवारी मोहीम पूर्ण झाली असती पण…
महमूद अहमद यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गुरुवारीच (23 नोव्हेंबर) कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी आशा होती परंतु अडचणींमुळे तसे होऊ शकले नाही.
बचाव मोहिमेदरम्यान टीमला ढिगाऱ्यात एक धातूचा पाइप सापडला त्यामुळे पुढे जाणे शक्य नव्हते.
त्यांनी सांगितले की, “गुरुवारी 1.8 मीटरपर्यंत आत गेल्यावर बोगद्याच्या छतावरील पाईप अडथळा म्हणून आढळला. यामुळे आम्ही ऑगर मशीन पुन्हा आणून काम करावे लागले.
सिलक्यारा बोगद्याच्या बचाव कार्यात गुंतलेले उत्तराखंड सरकारचे सचिव नीरज खैरवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पण पाईप खराब झाल्यामुळे कामाची गती मंदावली आहे.
गुरुवारी बोगद्याच्या आत 1.8 मीटरचा पाइप टाकण्यात आला होता, पण जागेअभावी पाइप पुढे जाऊ शकला नाही आणि पाईपचा 1.2 मीटरचा भाग कापावा लागला. औगर मशीन व्यवस्थित काम करत आहे.
बचावकार्य करणारी टीम किती दूर पोहोचली?
बोगद्यात किती अंतरापर्यंत बचाव कर्मचारी पोहोचू शकले आहेत, याची माहिती देताना सय्यद हसनैन म्हणाले, “बोगद्यात आम्ही 48 मीटर पुढे पोहोचलो होतो. पण पाईप वाकल्यामुळे त्यातील 1.2 मीटर भाग कापावा लागला. सध्या आम्ही बोगद्यात 46.8 मीटरपर्यंत पोहोचलो आहोत.”
शुक्रवारी सकाळपासूनच डॉक्टरांचे पथक आणि डझनभर लाइफ सपोर्ट सिस्टिमसह रुग्णवाहिका बोगद्याच्या बाहेर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
मंगळवारी बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये सर्व कामगार सुरक्षित दिसत होते.
अन्नासोबतच त्यांच्यामध्ये लाइफ सपोर्ट पाईपद्वारे कॅमेरा पाठवण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्याबद्दलची माहिती मिळू शकेल.
बचाव कार्य अंतिम टप्प्यात
याआधी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे.
हे ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
धामी म्हणाले, “पीएम मोदी सतत कामगारांची संपूर्ण माहिती घेत आहेत आणि उपायांवर चर्चा करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व एजन्सी बचाव कार्यासाठी एकत्र काम करत आहेत.”
पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर कुळबे यांनीही काही अडथळे न आल्यास बचाव पथक शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कामगारांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
बोगद्यातील कामगारांचे नातेवाईक काय म्हणाले?
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले आपले पती विरेंद्र लवकर बाहेर यावेत, यासाठी त्यांची पत्नी रजनी चातकासारखी वाट पाहतेय.
उत्तरकाशीच्या सिलक्यारा गावात बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या यादीत विरेंद्र किस्कूही आहेत.
विरेंद्र मुळचे बिहारच्या बांका जिल्ह्यातील आहेत.
बोगद्याची घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतर विरेंद्र यांचे मोठे भाऊ देवेंद्र किस्कू बिहारहून उत्तरकाशीला पोहोचले.
सध्या ते बोगद्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका खोलीत राहतायत.
विरेंद्र यांची पत्नी रजनीही तिथेच राहतात.
दोघेही विरेंद्र यांच्याशी बोलण्यासाठी बोगद्याजवळ जात असतात.
“विरेंद्रची आम्हाला खूप काळजी लागली आहे. त्याला पाहण्यासाठी आम्ही आमच्या घरापासून इतके लांब आलो आहोत. विरेंद्रलाही आमची काळजी वाटत आहे,” असं देवेंद्र सांगतात.
बोगद्याजवळ जाऊन पत्नी रजनी आणि भाऊ देवेंद्र दोघे मिळून विरेंद्र यांना रोज धीर देत आहेत.
“विरेंद्र आम्हाला विचारतो, दादा आम्हाला बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? आम्ही म्हणतो इथे दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला लवकरच बाहेर काढलं जाईल. तुम्ही काळजी करू नका”
देवेंद्र पुढे म्हणतात, “मला दिसतंय की प्रशासनातील लोक जमेल तितक्या वेगाने काम करत आहेत. सुरुवातीला जेव्हा मशीन्समध्ये बिघाड झाला तेव्हा आम्हाला काळजी वाटली होती. पण आता असं वाटतंय की सगळं ठीक होत आहे.”
विरेंद्र यांची पत्नी रजनीही उत्तरकाशीत आहेत. त्याही आपल्या पतीशी बोलतात.
विरेंद्र यांनी त्यांनास सांगितलं की ते रात्री रोटी खातात आणि सकाळी ताजी खिचडी खातात.
पण विरेंद्र एकदा बाहेर आले की त्यांनी हे काम करू नये असं पत्नी रजनी यांना वाटतं.
“माझे पती सुखरूप बाहेर पडल्यावर त्यांनी हे काम करू नये. दुसरं काहीतरी काम करावं असं आम्हाला वाटतंय.”
भाऊ देवेंद्र यांचंही तेच मत आहे. “तो (देवेंद्र) उत्खनन ऑपरेटर म्हणून काम करतो. तो हे काम इतरत्र कुठेतरी उघड्यावर करू शकतो. त्याने बोगद्यात काम करू नये, अशी कुटुंबाची इच्छा आहे. पण शेवटी तो बाहेर कधी येणार हे हाच मोठा प्रश्न आहे”
त्याचवेळी बोगद्यात पडलेल्या ढिगाऱ्याच्या आतून सुरू असलेलं खोदकाम थांबवण्यात आलं …