गांडूळ खत प्रकल्प संकटात
देखभालीअभावी टाक्यांची दुर्दशा, ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष
बेळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय हमी रोजगार योजनेंतर्गत गांडूळ खत प्रकल्पासाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र प्रकल्पच सुरू नसल्याने टाक्या रिकाम्या पडल्या आहेत. गांडूळ खात्याच्या टाक्यांमध्ये झाडे, झुडपे वाढून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे गांडूळ खत प्रकल्प संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतींमध्ये 25 गांडूळ खत टाक्या बांधल्या जाणार होत्या. यापैकी काही ग्राम पंचायतींकडून बांधण्यात आल्या आहेत तर काही ग्राम पंचायतींमध्ये हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नाही. 2018 मध्ये 586, 2019 मध्ये 239, 2020 मध्ये 289, 2021 मध्ये 954 तर 2022 मध्ये 152 गांडूळ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. काही ग्राम पंचायतींनी टाक्या बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मात्र अद्यापही काही ग्राम पंचायतींकडून अंमलबजावणी झाली नाही. ग्राम पंचायत पातळीवर केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी या टाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सद्यपरिस्थितीत केरकचरा सोडून या टाक्यांमध्ये झाडे, झुडपेच वाढली आहेत. त्यामुळे गांडूळ खताच्या प्रकल्पात झाडे, झुडपे दिसू लागली आहेत. शेती उत्पादन वाढीसाठी गांडूळ खत उपयोगी आहे. मात्र राज्य सरकारने राबविलेला हा प्रकल्प देखभालीअभावी अडचणीत आला आहे. ग्राम पंचायत पातळीवर योग्य देखभाल होत नसल्याने गांडूळ खताच्या टाक्या रिकाम्या पडून आहेत. काही शेतकऱ्यांना गांडूळ खताच्या टाक्या बांधून देण्यात आल्या आहेत. मात्र देखभालीअभावी या टाक्याही खराब झाल्या आहेत. सरकारने यासाठी 27 हजार रुपयांचे अनुदान दिले होते.
खत निर्मितीचा उद्देश
जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीला गांडूळ खत प्रकल्पासाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र ग्राम पंचायतींकडून देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यातून गांडूळ खत निर्माण करणे हाही उद्देश या प्रकल्पाचा आहे.
– हर्षल भोयर, जि.पं.सीईओ
गांडूळ खत प्रकल्पासाठी निर्माण केलेल्या टाक्या
तालुके निर्माण करण्यात आलेल्या टाक्या
अथणी 62
बेळगाव 83
बैलहोंगल 170
चिकोडी 280
गोकाक 199
हुक्केरी 198
कागवाड 4
खानापूर 42
कित्तूर 108
मुडलगी 7
निपाणी 2
रामदुर्ग 348
रायबाग 458
सौंदत्ती 460
एकूण 2421