वसंतराव चव्हाण : जिल्हा परिषदेची विजयी मिरवणूक सुरू असतानाच आला होता आमदारकीसाठी फोन
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी हैदराबादच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.कोणत्याही प्रकारची चर्चा नसताना काँग्रेसनं पहिल्यांदाच वसंत चव्हाण यांना लोकसभेचं तिकिट देण्यात आलं होतं.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसला अशोक चव्हाणांशिवाय विजय मिळू शकतो, हे दाखवून दिलं.
वसंतराव चव्हाणांनी भाजपला कसं चितपट केलं? त्यांची राजकीय कारकीर्द आणि एकूणच राजकीय प्रवास कसा होता? हे जाणून घेऊयात.
भाजपकडून अशोकराव असतानाही जिंकून आले
अशोक चव्हाण यांचं नांदेडमध्ये मोठं प्रस्थ आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये दोन पिढ्यांपासून चव्हाण कुटुंबीयांचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपसोबत गेले. त्यामुळं या लोकसभा निवडणुकीत नांदेडची जागा जिंकण्यापासून भाजपला कोणीही रोखू शकत नाही असं वातावरण तयार झालं होतं.
काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली. वसंतराव चव्हाण यांचा नायगाव, बिलोली, देगलूर या भागात दांडगा जनसंपर्क होता. पण, नांदेड शहर परिसरात त्यांची तशी शक्ती नव्हती.
त्यात अशोकराव चव्हाण सोडून गेल्यामुळं नांदेड काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला होता. पक्षाची स्थिती वाईट होती. भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन खासदार प्रताप चिखलीकर यांचा विजय पक्का असल्याचं म्हटलं जात होतं.
पण, वातावरण भाजपच्या बाजूनं असलं, तरी वसंतराव चव्हाणांनी 80 हजार मतांनी चिखलीकरांचा पराभव केला.
नांदेडमधला मतदार हा ‘अशोकरावांचा’ नसून ‘काँग्रेस’चा आहे दाखवून दिले
अशोकराव चव्हाण यांच्या अनुपस्थितीत किंबहुना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवूनही वसंतराव चव्हाणांनी जिल्ह्यात काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणले.
नांदेडमधले मतदार हे अशोकराव चव्हाणांचे आहेत की, काँग्रेसचे? असा एक प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झालेला होता. पण, वसंतराव चव्हाण यांच्या विजयानं या प्रश्नांचं उत्तर मिळालं होतं.
नांदेडमधला मतदार हा अशोकराव चव्हाणांचा नसून काँग्रेसचा आहे, अशी चर्चा या विजयानंतर मोठ्या प्रमाणावर सुरू झाली.
“अशोकराव चव्हाणांशिवाय जिल्ह्यात काँग्रेसला विजय मिळू शकतो हे वसंतराव चव्हाणांच्या विजयानं दाखवून दिलं. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये आहेत की नाही, याचा काहीही फरक पडला नाही,” असं नांदेडचे पत्रकार योगेश लाठकर सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना लाठकर म्हणाले की, ‘‘2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून वसंतराव चव्हाण यांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळं प्रचारातही त्यांच्यावर मर्यादा होत्या. पण तशा स्थितीतही त्यांनी प्रचार केला. काँग्रेसचे बडे नेतेही प्रचारासाठी नांदेडमध्ये आले नाहीत.”
“उलट भाजपकडून पंतप्रधान मोदींपासून ते अमित शाह, नितीन गडकरी अशा सगळ्या बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. तरीही वसंतराव चव्हाण यांनी भाजपला चितपट करून दाखवलं. हीच काँग्रेससाठी खूप मोठी गोष्ट होती, तर अशोकराव चव्हाणांसाठी मोठा धक्का होता,’’ असंही लाठकर म्हणाले.
वसंतराव चव्हाण निवडून आले. राहुल गांधी यांनी लोकसभेत त्यांचं स्वागतही केलं. पण, खासदारकीचे अवघे दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं.
याच महिन्यात 15 ऑगस्टला त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली. वाढदिवसाच्या दहा दिवसानंतरच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती? यावरही एक नजर टाकुयात.
वसंतराव चव्हाण यांचं कुटुंब मोठं आहे. वसंतराव यांचे वडील बळवंतराव चव्हाण हेही आमदार होते. ते शरद पवारांचे निकटवर्तीय होते.
वसंतराव चव्हाणांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला आणि त्यांचा राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला.
त्यांनी अगदी स्थानिक पातळीवरून ग्राम पंचायत निवडणुकीतून राजकारण सुरू केलं. 1978 पासून ते नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले. पुढं 1990 ते 1995 या काळात नांदेड जिल्हा परिषदेचं सदस्यपद त्यांनी भूषवलं.
त्यानंतर 2002 मध्ये त्यांना पुन्हा त्यांना नांदेड जिल्हा परिषदेत संधी मिळाली. पण त्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच विधान परिषदेवर त्यांची आमदार म्हणून निवड झाली.
राष्ट्रवादीकडून 2008 पर्यंत ते विधान परिषदेवर आमदार होते. शरद पवारांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पण, 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली आणि वसंतरावांनी अपक्ष निवडणूक लढवली.
या मतदारसंघाचे ते पहिले आमदार ठरले. पुढे 2014 मध्ये त्यांना काँग्रेसनं त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्यांनी मोदी लाटेतही त्यांनी दुसऱ्यांदा मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवलं.
पण, वसंतराव चव्हाण यांची महाराष्ट्राच्या विधानभवनात आमदार म्हणून एंट्री होण्याचा किस्साही रंजक आहे.
कशी झाली विधानभवनात एंट्री?
वसंतराव चव्हाणांनी 2002 मध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्यात ते चांगल्या मताधिक्यानं निवडून आले.
विजयी मिरवणूक सुरू असतानाच त्यांना मुंबईवरून एक संदेश आला, हा संदेश होता त्यांना थेट आमदारकी मिळाल्याचा.
जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या वसंतराव चव्हाणांची थेट राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानभवनात एंट्री झाली.
पण त्याचं कारण हे वसंतरावांचे वडील बळवंतराव चव्हाण होते, असं नायगावचे सकाळचे पत्रकार प्रभाकर लाखपत्रेवार सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना लाखपत्रेवार म्हणाले की, “बळवंतराव चव्हाण यांनी 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या शब्दासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची जागा जनता पक्षासाठी सोडली होती.
“एवढंच नाही तर, जनता पक्षाचे उमेदवार गंगाराम ठक्करवार यांना निवडून आणण्यासाठीही त्यांनी काम केलं होतं.
“त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या या कामगिरीचे गिफ्ट म्हणून बळवंतरावांच्या चिरंजीवांना म्हणजेच वसंतराव चव्हाण यांना आमदारकी दिली होती,” असंही लाखपत्रेवार यांनी सांगितलं.
त्यानंतर त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आणि काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)
Published By- Priya Dixit