किशोरवयीन मुलामुलींसाठी वसंत हंकारे यांची कार्यशाळा!
मल्हारपेठच्या ग्रा.पं.सदस्या स्वाती चौगले यांची माहिती; मुलांना वास्तवतेची जाण करून देणारी कार्यशाळा
कोल्हापूर प्रतिनिधी
सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल, टेलिव्हिजनचे आहे. यामुळे आपली किशोरवयीन मुले व मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. या गोंधळलेल्या स्थितीतून त्यांना सावरण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा १४ ते २१ वयोगटातील मुले चांगले विचार आत्मसात करतील, तेव्हाच समाजातील चित्र बदलेल. आणि अनुचित प्रकार कुठेतरी थांबतील. त्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (८ मार्च) सुप्रसिद्ध व्याख्याते तथा समजप -बोधनकार वसंत हंकारे यांची मल्हारपेठ येथे विनामुल्य कार्यशाळा आयोजित केली आहे, अशी माहिती मल्हारपेठच्या ग्रामपंचायत सदस्या स्वाती कृष्णात चौगले यांनी दिली.
चौगले म्हणाल्या, मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण व नैसर्गिक कौशल्य यांना उजाळा देणारी, मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडीया यांच्या विळख्यात अडकत चाललेल्या सध्याच्या पिढीला योग्य मार्ग दाखवणारी ही कार्यशाळा आहे. सोशल मिडियाचा वापर योग्य पध्दतीने कसा करायचा याचे आत्मचिंतन करायला लावणारी आणि आत्मविश्वास प्रबळ करण्यासाठी, आत्मप्रतिमा स्वच्छ, सकारात्मक व प्रभावशाली करण्यासाठी योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणारी ही कार्यशाळा आहे. पौगंडावस्थेत शरीरात प्रचंड बदल होत असतात, मनाची अवस्था देखील बदलत असते. या काळात मुलामुलींना प्रामुख्याने शारिरीक आकर्षण वाटत असते. पण यावेळी आपले भविष्य घडविण्यासाठी मुलांनी आपल्या मनावर कशाप – कारे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, याबाबत सखोल मार्गदर्शन करणारी आणि आई, बाबा आणि कुटुंबासमवेत नाते दृढ करणारी ही एकमेव कार्यशाळा आहे.
माझे पती, ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया संवाद’चे विशेष प्रतिनिधी कृष्णात चौगले यांच्या संकल्पनेतून मल्हारपेठ येथील ‘जय हनुमान’ क्रीडांगणावर सकाळी १० वाजता या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळातील मुले, मुली, शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वाती चौगले यांनी केले आहे.