वळिवाचे शहरात आगमन; दमदार हजेरी नाहीच

उष्म्यात पुन्हा वाढ, दमदार पावसाची सर्वांनाच अपेक्षा बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी सकाळपासूनच घामाच्या धारा अंगातून वाहत होत्या. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर साडेतीनच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर शहरासह उपनगरांमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र म्हणावा तसा जोर नसल्यामुळे सायं. 4.30 नंतर पुन्हा उन पडले. त्यामुळे […]

वळिवाचे शहरात आगमन; दमदार हजेरी नाहीच

उष्म्यात पुन्हा वाढ, दमदार पावसाची सर्वांनाच अपेक्षा
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी सकाळपासूनच घामाच्या धारा अंगातून वाहत होत्या. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर साडेतीनच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर शहरासह उपनगरांमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र म्हणावा तसा जोर नसल्यामुळे सायं. 4.30 नंतर पुन्हा उन पडले. त्यामुळे आणखी उष्म्यात वाढ झाली होती. उष्म्यामुळे दिवसभर अंगाची लाहीलाही होत होती. वाढलेल्या उष्म्यामुळे थंड पेयांचा आधार घ्यावा लागला. याचबरोबर कार्यालयातही एसी किंवा फॅनचा आधार घेऊनच गारवा घ्यावा लागला. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले. दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. मात्र शहरात पावसाला म्हणावा तसा जोर नसल्यामुळे हवेत गारव्याऐवजी उष्माच निर्माण झाल्याचे दिसून आले. वळिवाचा पहिलाच पाऊस असल्यामुळे फेरीवाले, भाजीविक्रेत्यांना आडोसा शोधावा लागला. त्यामुळे काहीशी तारांबळही उडाली होती. पावसाचा शिडकावा होत असल्याने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांनाही आडोसा शोधावा लागला. पाण्याची टंचाई असल्यामुळे आता वळिवावरच साऱ्यांची भिस्त आहे. जोरदार वळीव पाऊस कोसळला तर काही प्रमाणात पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वळिवाच्या पावसाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. रात्रभरही उष्मा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र पहिल्याच वळिवाने अपेक्षा भंग केली आहे.
देवगिरी परिसरात जोरदार पाऊस
तालुक्याच्या उत्तर भागामध्ये असलेल्या देवगिरी, कडोली, बंबरगा, अगसगे  परिसरात जोरदार पाऊस झाला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह या परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
शाहूनगरात वीज पडून नारळाच्या झाडाला आग
नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी शाहूनगर येथे घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही काळ स्थानिक नागरिकांची धावपळ उडाली. शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. याचवेळी साई कॉलनी, शाहूनगर येथील शंकर गुंडू राऊत यांच्या परसातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. काही क्षणात झाडाच्या शेंड्याने पेट घेतला. हा प्रकार पाहण्यासाठी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.