पुण्यनगरीत अवतरला वैष्णवांचा मेळा

माउली व तुकोबांच्या पालख्यांचे भक्तिभावात स्वागत पुणे /  प्रतिनिधी टाळ, चिपळ्यांचा घणघणाट, मनामनात भक्तिरस निर्माण करणारा मृदंगनाद, अभंगावर डोलणारे वारकरी, हवेत फडफडणाऱ्या भगव्या पताका, डोक्मयावर तुळशी वृंदावन, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशी माळा आणि मुखी ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष….अशा भावभक्तिपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे रविवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पालखी मार्गावरील […]

पुण्यनगरीत अवतरला वैष्णवांचा मेळा

माउली व तुकोबांच्या पालख्यांचे भक्तिभावात स्वागत
पुणे /  प्रतिनिधी
टाळ, चिपळ्यांचा घणघणाट, मनामनात भक्तिरस निर्माण करणारा मृदंगनाद, अभंगावर डोलणारे वारकरी, हवेत फडफडणाऱ्या भगव्या पताका, डोक्मयावर तुळशी वृंदावन, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशी माळा आणि मुखी ज्ञानोबा, तुकोबांचा जयघोष….अशा भावभक्तिपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे रविवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पालखी मार्गावरील रांगोळ्यांच्या पायघड्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या सोहळ्याचे पुणेकरांनी उत्साहात स्वागत केले.
पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकर दरवषी आतूर असतात. यंदाही पालखी दर्शनाची ओढ पुणेकरांना लागली होती. पालख्यांच्या स्वागतासाठी पालखी मार्गावर पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. दरवषीप्रमाणे यंदाही दोन्ही पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची आदर्शवत स्वयंशिस्त अनुभवायला मिळाली. पाटील इस्टेट चौकात पालख्यांचे आगमन होताच पुणेकरांनी पुष्पवृष्टी करीत मोठ्या भक्तिभावात पालख्यांचे स्वागत केले. या वेळी जमलेल्या भक्तांनी तसेच वारकऱ्यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नामाचा जयघोष केला. या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.
शहरात सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ सुरू होता. दुपारनंतर पाऊस थांबला. मात्र ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. मात्र, उत्साह कायम होता. तुकोबांची पालखी आकुर्डीहून, तर माऊलींची पालखी आळंदीतून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. वारकरी टाळ-मृदंगांच्या घणघणाटासह अभंगांच्या तालावर आनंदाने नाचू-डोलू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. सायंकाळी 5.5 वाजता रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ पाटील इस्टेट चौकात पुणेकरांच्या दृष्टिपथास पडला. तुकोबांची पालखी आणि रथातील पादुका दिसताच भाविक कृतकृत्य झाले. काहींना पादुका दर्शनाचे भाग्य लाभले. तुकोबांच्या आगमनानंतर माउलींच्या पालखी दर्शनासाठी भक्तांना सुमारे पावणे दोन तास वाट पाहावी लागली. सायंकाळी 6.50 वाजता आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून माउली प्रकटले अन् भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माऊलींच्या पादुकांवर माथा टेकविण्यासाठी एकच झुंबड उडाली. पादुकांचे दर्शन काहींनाच प्राप्त झाले. मात्र, धन्यत्वाचा अनुभव सर्वांनीच घेतला.
पाटील इस्टेट चौकात तुकोबा व ज्ञानेश्वर माउलींच्या रथावर फुलांची उधळण करण्यात आली. वारकऱ्यांचा हा भक्तिप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्ता मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौक येथे विसावला. तेथे ज्ञानोबा-तुकारामचा एकच गजर झाला. पालख्यांच्या दर्शनासाठी पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. टिळक चौकातही पालख्यांचे स्वागत करणारी रांगोळी साकारण्यात आली होती. संपूर्ण पालखी मार्गावर पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत दंग झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे; तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे रात्री उशिरा विसावली. पुण्यात दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असणार आहे.