शेळ्या-मेंढ्यांना रोगप्रतिबंधक लस
मे अखेरीस मोहीम : रोगाला आळा घालण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण
बेळगाव : शेळ्या-मेंढ्यांना ओल्या चाऱ्यातून होणाऱ्या रोगाला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत मे अखेरीस प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. घरोघरी जावून सर्व शेळ्या-मेंढ्यांना लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खात्याने केले आहे. अलिकडच्या दोन वर्षांत जनावरांना विविध रोगाची लागण होवू लागली आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटकाही बसू लागला आहे. यंदा वळीव पाऊस जोरदार होवू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र ओल्या चाऱ्याची उगवण होवू लागली आहे. या चाऱ्यातून शेळ्या-मेंढ्यांना रोगाची लागण होत असते. यासाठी खबरदारी म्हणून खात्याकडून आंत्रविषार (ईटी) लसीकरण दिले जाणार आहे. जिल्ह्यात 14 लाख 59 हजार 420 शेळ्या-मेंढ्यांची संख्या आहे. त्यामध्ये शेळ्या 7 लाख 57 हजार 679 तर मेंढ्या 7 लाख 1 हजार 741 आहेत. विशेषत: धनगर बांधवांकडे मेंढ्यांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व शेळ्या-मेंढ्यांना लस दिली जाणार आहे.
पावसामुळे माळरानावर ओल्या चाऱ्याची उगवण होऊ लागली आहे. या चाऱ्यातून शेळ्या-मेंढ्यांना विषबाधा होत असते. परिणामी शेळ्या-मेंढ्या दगावण्याचे प्रमाणही अधिक असते. यासाठी खबरदारी म्हणून खात्याने मे अखेरपासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. ही मोहीम सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातूनही राबविली जाणार आहे. एकही शेळी अथवा मेंढी लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजीही घेतली जाणार आहे, अशी माहिती खात्याने दिली आहे. जिल्ह्यात 1 लाख 40 हजारांहून अधिक शेळ्या-मेंढ्यांची संख्या आहे. मात्र विविध नैसर्गिक आणि इतर कारणांमुळे यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो. काहीवेळा चाऱ्यातूनही विषबाधेचे प्रकार घडत असतात. हे टाळण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांना लस दिली जाणार आहे. ऋतुमानात बदल झाल्यानंतर रोगाची लागण होत असते. रोगापासून दूर ठेवण्यासाठीच प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे.
धनगर बांधवांनीही सहकार्य करावे
जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाचा पुरवठा करण्यात आला आहे. याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व शेळ्या-मेंढ्यांना लसीकरण केले जाणार आहे. शेतकरी आणि धनगर बांधवांनीही यासाठी सहकार्य करावे.
– डॉ. यरगट्टी-प्रभारी सहसंचालक
जिल्ह्यातील तालुकानिहाय शेळ्या-मेंढ्यांची संख्या
तालुका शेळ्या मेंढ्या
अथणी 34790 94787
बैलहोंगल 19669 16684
बेळगाव 40912 31117
चिकोडी 88993 54520
गोकाक 97865 76559
हुक्केरी 83381 69633
कागवाड 7672 13214
खानापूर 926 9374
कित्तूर 5483 7506
मुडलगी 29763 49372
निपाणी 67244 19707
रायबाग 98163 138386
रामदुर्ग 98640 67722
सौंदत्ती 84178 53160
एकूण 757679 701741